पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव : प्रकाशवाटा
लेखक : डॉ. प्रकाश आमटे
प्रकाशक : समकालीन
मूल्य : ₹ २००/-
प्रकाश आमटे ह्यांचे आत्मवृत्त आणि हेमलकशा ह्या लोकबिरादरी प्रकल्पाचा जन्म ! असा विषय घेऊन हे पुस्तक आपल्या समोर येते आणि त्यांच्या आयुष्यातील एक-एक टप्प्याचा प्रवास आपल्यासमोर फेर धरतो.
हे पुस्तक वाचताना थक्क करणारा त्यांचा प्रवास आणि पुस्तकाचे नाव तंतोतंत जुळतं. छोट्या संकटात काही लोकं कोलमडून पडतात पण इथे मात्र त्यांच्या आयुष्यात संकटांची मालिका आहे आणि तरी सुद्धा ह्या प्रकल्पाचा प्रवास आणि त्यासाठी झटणारे असंख्य हात आपल्याला जाणीव करून देतात ते आपण स्वतः समाजासाठी काहीतरी करावं ह्याची ! हे पुस्तक मी ठाण्यात घेतले. दुकानात आत्मवृत्त पाहिले की, माझ्या ताफ्यात ते सामील होतेच, हा शिरस्ता आहे. ते वाचल्याशिवाय दुसरं आत्मवृत्त खरेदी न करण्याचा एक अलिखित नियम करून घेतल्यामुळे वाचन करून नोट्स काढणं महत्वाचं असतं, माझ्यासाठी तर शास्त्र असतं ते ! आणि म्हणूनच एकाच महिन्यात दोन पुस्तक वाचून संपली. एक नॉस्त्रादेमस आणि आता हे !
मी देव पाहिलेला नाही पण डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे ह्यांना कर्जतमध्ये एका कार्यक्रमात पाहिले होते आणि तेव्हाच त्यांची मुलाखत ऐकली, साहजिकच देवाचा वावर आहे, ह्यावर मी शिक्कामोर्तब केले आणि हे पुस्तक खरेदी केले. सॉरी ! पुस्तक नाही तर माझ्या आयुष्यात ही एक स्फूर्तीची वाट आहे, जी घेऊन जाते आत्मविश्वासाकडे आणि तिथून जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मात्र आपण भोगलेली संकटं किती कस्पटासमान होती, हे जाणवते.
ह्या पुस्तकात छोट्या छोट्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे जेणे करून आपल्या आयुष्याशी सांगड घालताना आपल्या अंधाऱ्या आयुष्यात अनेक वाटा आपल्याला सापडतील म्हणूनच त्याचे मुखपृष्ठ तसं आहे. त्यातील एक मुद्दा म्हणजे प्रकाश सरांचे कुटुंब शाकाहारी तरी सुद्धा प्राण्यांसाठी त्यांना घरात मांस ठेवावे लागे आणि ते काम म्हणजे जिवंत प्राणी न मारता, मेलेल्या प्राण्याचे मांस साफ करून डिझेलवर चालणाऱ्या फ्रिजमध्ये ठेवावे लागे. ह्यातून भूतदया नेमकी कशी असावी ? ह्याचा साक्षात्कार होतो. डॉक्टरी पेश्यापासून ते बोअरवेल दुरुस्ती पर्यंत केलेली कामं पाहता, ह्यांना आयुष्यात नेमकं काय अवघड असेल ? हाच प्रश्न मला सतावत होता. त्यांचे हे आत्मवृत्त वाचताना मला पदोपदी माझ्या आईच्या पिताश्रींची आठवण येत होती. आज ते ह्या जगात नाहीत पण त्यांनीसुद्धा आयुष्यात अशाच प्रकारे सर्वच कामे केली होती. ही लोकं म्हणजे भन्नाट रसायन असतात, ह्यांच्याकडे सर्वच प्रश्नांवर उत्तर असतात, हे ही खरे !
ह्या पुस्तकात डॉ. प्रकाश आमटे सर म्हणता की, "सगळ्याच गोष्टी दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहायच्या नसतात. आपल्या पध्दतीने आयुष्य जगताना आपले अनुभवही आपणच घ्यायचे असतात. त्याच्या बऱ्यावाईट परिणामांची जबाबदारीही स्वतःच घ्यायची असते आणि हे सगळं तक्रार न करता सहज स्वीकारलं तर मिळणारं समाधान वेगळंच असतं, हे तत्व मला हेमलकशाने शिकवलं." हा सार आहे ह्या पुस्तकाचा ! आदिवासींचे जगणं सोपं व्हावं म्हणून हा प्रकल्प जन्माला आला. त्यांचे वडील म्हणजे बाबा आमटे ह्यांनी जसं आनंदवन उभं केलं त्यांच्याच मदतीने आणि प्रेरणेने हेमलकशा उभं राहिलं. हा प्रवास वाचताना त्यांनी संकटांना दिलेले तोंड म्हणजे हे पुस्तक ! ह्या प्रकल्पात पुढे शाळा, कॉलेज आणि सर्वच काही आलं परंतु काहीच नसताना त्यांनी विश्वनिर्मिती केली, ही साधी बाब नव्हे. इथे हे सर्व होत असताना मोनॅको सरकार ह्या कामाची दखल घेतं आणि त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले जाते इथे मात्र आपल्या सरकारला उशीरा जाग येते. असो !
आदिवासी आणि त्यात कुष्ठरोगी म्हटलं तर समाज नेमकं काय करतो हे आपल्याला पक्क माहीत आहे पण ह्या बाबतीत आमटे ह्यांच्या कुटूंबाचा खूप वेगळा दृष्टकोन होता जो आपल्याला आपणा सर्वांना नसानसांत भिनवायला हवा ते म्हणतात, 'अज्ञानात माणूस सुखी' असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्यांच्या पुढच्या पर्यायांच्या वाटा आपण बंद करत असतो. त्यामुळेच संस्कृती टिकवण्याचा नावाखाली अज्ञानाचं समर्थन करणं कितपत योग्य आहे ? इथे मात्र मी निरुत्तर झालो. हे पुस्तक आपल्याला समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते आणि आपल्याच आयुष्यात आपण मार्गक्रमण करताना नव्याने प्रकाश देते.
काही लोकं शब्दाला जागतात तर काही लोकं नावाला ! आणि इथे विचाराल तर आमटे कुटुंबातील प्रत्येकाचे नाव त्यांचा अर्थ व ओळख व्यापक करत आहेत. ह्यात जेव्हा बाबा आमटे व साधनाताई ह्यांनी आपल्या अपत्यांची नाव प्रकाश व विकास ठेवले तेव्हा नक्कीच शब्दशः त्यांना काहीतरी जाणवले असेल. आज आनंदवनात बाबा म्हणजे वटवृक्ष तर कित्येक आदिवासींच्या व कुष्ठरोगींच्या पाठीशी बाबा बापाच्या भूमिकेत उभे राहिले आणि हे साधनेशिवाय शक्य नाही आणि म्हणूनच त्यांच्या पत्नीचे नाव साधनाताई आहे, असे मला वाटते. मुलगा विकासने डॉक्टर होऊन आनंदवनाचा विकास केला तर दुसरा मुलगा अष्टपैलू डॉक्टर प्रकाशने हेमलकशामध्ये कित्येक आदिवासींच्या आयुष्यात प्रकाश टाकला.
एकंदरीत काय तर ह्यातील प्रत्येक जण आदर्शवत आहे आणि म्हणूनच हे पुस्तक नाही तर माझ्या आयुष्याला वाटावाटांवर प्रकाश टाकून स्फूर्ती देणारं रसायन आहे.
No comments:
Post a Comment