महाराष्ट्रधर्म व त्याची व्यापकता....



महाराष्ट्रधर्म एक चित्तवेधक विषय ! आणि आपल्या इतिहासात ह्या शब्दाला खूप महत्त्व आहे कारण ह्या एकाच शब्दाचे गारुड बऱ्याच जणांच्या डोक्यावर आहे. मी म्हणेन इतिहासातील एक शक्तिशाली शब्द ज्याचा अर्थ खोल अगदी खोल होत जातो. मागील कित्येक वर्षे ह्यावर मी जमेल तशी शोधमोहीम घेऊन ह्याचा अर्थ समजून घेत होतो, नोट्स काढत होतो. तेव्हा कुठे काही प्रमाणात डोक्यात शिरला तोच आता ब्लॉग मार्फत मांडत आहे. भारतात असलेल्या राज्यराज्यांच्या इतिहासात फक्त महाराष्ट्र शब्दालाच धर्म हे विशेषण चिटकले आहे, आता तुम्ही म्हणाल, विशेषण ? हो हो वाचा तर पूर्ण ब्लॉग मग आपला अभिप्राय कळवा की राव !

विषय खोल आहे, त्यात धर्म बोलल्यावर बऱ्याच जणांची नाक मुरडतील. त्यात हिंदूंनी आपल्या स्वधर्माचा आदर बाळगला तर पुरोगामी आणि so called सेक्युलर ह्यांना नखापासून केसापर्यंत नुसती आग आग होईल; होऊ द्या, आपण महाराष्ट्रधर्म समजावून घेऊ कारण आपल्या इतिहासात महाराष्ट्रधर्माला एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.

पहिले धर्म ह्याचा शब्दशः अर्थ "धारणात् धर्म:" म्हणजेच 'जे धरते ते' किंवा 'जे टिकून रहाते ते' असा आहे. उदात्त विचार मनात आणण्यास व उदात्त जीवन जगण्यास जो स्फूर्ती देतो, तो धर्म ! धर्म हा मूळ जगाचा पाया आहे, (धर्मो विश्वस्य जगत प्रतिष्ठा:) असे नारायण उपनिषदातील वचन जे तंतोतंत खरंच आहे. त्याच प्रमाणे मनुस्मृतीमध्ये "धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षित:" ह्याचा अर्थ धर्म मारला गेला तर तो लोकांना मारील, पण जर त्याचे रक्षण केले तर तो लोकांचे रक्षण करेल. हा झाला धर्म ह्या संज्ञेचा ऊहापोह ! आता येऊया आपल्या मूळ विषयाकडे....

सर्व प्रथम "श्रीगुरूचरित्र" ह्या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक सरस्वती गंगाधर यांनी 'महाराष्ट्रधर्म' ही संज्ञा वापरली आणि ती तुमच्या आमच्या नसानसात भिनवली, समर्थ रामदास स्वामींनी ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात शिगेला पोहचलेली जी राजकीय चळवळ होती तेच मुळात धार्मिक चळवळीचे प्रतिबिंब होते. असे न्या. म. गो. रानडे म्हणतात. राजारामशास्त्री भागवत म्हणतात की, भगवद्गीतेत सांगितलेला भागवतधर्म हा महाराष्ट्रधर्माचा पाया होता. तर चि. वि. वैद्य म्हणतात की, महाराष्ट्रधर्म म्हणजे महाराष्ट्रात स्वराज्यस्थापना पूर्वक चालविलेल्या वैदिक वर्णाश्रम धर्म. हा महाराष्ट्रधर्म व्यापक स्वरूपाचा म्हणजे स्वराज्ययुक्त सनातन धर्म होता. पण ह्यातून महाराष्ट्रधर्म हा हिंदुधर्मापेक्षा वेगळा होता असा बोध होत नाही, हे ही नक्की !

वि. का. राजवाडेंनी ह्या विषयावर एक सोपे समीकरण मांडले, ते म्हणतात की,

हिंदूधर्म + धर्मस्थापना + गोब्राह्मणपतिपालन = स्वराज्यस्थापना + एकीकरण + धुरीधारण = महाराष्ट्रातील हिंदुधर्म

हे समीकरण जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा पहिल्या बाजूला जरी तीन संघटक असले तरी त्यांचे रूपांतर हिंदुधर्माचा पुनर्स्थापना असे एका घटकात येते. तर दुसऱ्या बाजूला लोकांच्या संघटित प्रयत्नांनी झालेली स्वराज्यस्थापना असे येते. अशा प्रकारे त्यांच्या मताप्रमाणे महाराष्ट्रधर्माचा अर्थ स्वराज्य स्थापना असा होतो. मराठ्यांच्या कर्तव्यांना राजवाडे महाराष्ट्रधर्म म्हणतात. थोडक्यात महाराष्ट्रधर्म ही संज्ञा स्वतंत्र हिंदू राज्य स्थापण्याबाबतची महाराष्ट्रीयांची कर्तव्ये याच अर्थाने वापरली होती, असे प्रतिपादन राजवाडे करतात.

ज्यावेळी महाराष्ट्रधर्माचा मूळ शोध जेव्हा मी गुरूचरित्रात घेतला तेव्हा असे आढळले की, बिदरचा मुस्लिम राजा हा श्रीनरसिंहसरस्वती यांचा अनुयायी झाला. तेव्हा हिंदू देवांच्या उपसना करण्याचा आरोप त्यावर ठेवण्यात आला, त्याला कारण होते श्रीनरसिंहसरस्वती हे त्या काळात दत्ताचा अवतार मानले जात होते. साहजिकच राजावर उपासनेबरोबर इस्लाम धर्माचा त्याग करणे हा आरोप केला गेला. ह्या अशा राजाला पाहून ब्राम्हण वर्ग आनंदित झाला व ते उद्गारले, "राजा ब्राम्हणांचा दास बनला, राज्याच्या दृष्टीने हे सुचिन्ह आहे. जेव्हा असा राजा असतो व जो महाराष्ट्रधर्माप्रमाणे वर्तन करतो तो खरोखर आपला द्वेष करणार नाही." अधिक माहितीसाठी तुम्ही श्रीगुरुचरित्राचा ५०वा अध्याय पहावा. ह्या शब्दाचे हे मूळ आहे, असे म्हणता येईल.

विविध दस्तावेज पडताळत असताना, कोकणावर म्लेंच्छांनी घातलेल्या धुमाकुळीचे वर्णन जेव्हा महिकावतीच्या बखरीत आपण वाचतो तेव्हा त्यात "महाराष्ट्रधर्म" हा विषय आढळतो. ह्याचे तपशीलवार वर्णन केशवाचार्य करतात, पहिला बिंबराज राज्य करत होता तेव्हापासून म्हणजे इस ११३८ पासून ते नायकोराव राज्य करीत असे पर्यंत म्हणजे इस १४४८ पर्यंत महाराष्ट्रधर्म क्रमाक्रमाने लोक सोडत होते. ही अधोगती फार मोठ्या प्रमाणात झाली होती व महाराष्ट्रधर्म लुप्त झाला. अशा प्रसंगी नायकोरावाची कुलस्वामिनी जोगेश्वरी त्याच्या स्वप्नात आली व महाराष्ट्रधर्माचे संरक्षण करण्याची आज्ञा केली असे राजवाडे संपादित महिकावतीच्या बखरीत मिळते.

तर असा ह्या महाराष्ट्रधर्मावर अभ्यास करताना जेव्हा मी छत्रपती शिवरायांपर्यंत पोहचतो तेव्हा समर्थांच्या ओळी आठवतात. महाराष्ट्रधर्म ह्या शब्दाचा उल्लेख समर्थांनी दोनदा केला एक छत्रपती शिवरायांसाठी खालीलप्रमाणे, ज्यात राजांनी महाराष्ट्रधर्माचे म्हणजेच हिंदूधर्माचे रक्षण केले, हे उघड आहे. 


देवधर्म गोब्राम्हण । यांचे करावया संरक्षण ।।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।।
या भूमंडळाचे ठायी । धर्म रक्षी ऐसा नाहीं ।।
महाराष्ट्रधर्म राहिला कांहीं । तुम्हा कारणें ।।

 

दुसरा उल्लेख शंभूराजांच्या बाबतीत समर्थांनी केलेला आढळतो. त्यात महाराष्ट्रधर्म हा राजकीय कल्पना असून तो आपल्या हिंदुधर्माहून वेगळा असल्याचे सूचक उल्लेख स्पष्ट केले आहेत. समर्थ म्हणतात,

मराठा तितुका मेळवावा । आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।।
ये विषयीं न करिता तकवा । पूर्वज हांसती ।।
आहे तितुके जतन करावे । पुढे आणिक मिळवावे ।
महाराष्ट्र राज्य वाढवावे । जिकडे तिकडे ।।

 

येथे शंभुराजांना उपदेशपर बोल आहेत, महाराष्ट्रधर्माचा प्रसार करण्यासाठी व मराठा राज्य वाढविण्यासाठी सर्व मराठ्यांना एकत्र आणण्याविषयी ते सांगत आहेत. समर्थांनी ही शैली समजून घ्यावी लागते तेव्हा कुठे अनेक महाराष्ट्रधर्म ह्या शब्दाची व्यापकता उमजते. इथे सुद्धा ह्या शब्दाचा प्रवास थांबत नाही.

 

महाराष्ट्रधर्माचा अभ्यास करताना जेव्हा मी शाहू महाराजांच्या काळात येतो तेव्हा त्यांचा चुलत भाऊ संभाजी निजामाला जाऊन मिळालेला होता. परमेश्वराच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांनी आपले राज्य मुसलमानांच्या हातून सोडवले ह्याचा उल्लेख करून, नंतर संभाजी ह्याने (शाहू महाराजांचा चुलत भाऊ) निजामाची मदत घेऊन महाराष्ट्रधर्म सोडल्याबद्दल दुःख व्यक्त केले.

शाहू महाराजांनी अजून एकदा महाराष्ट्रधर्माचा उल्लेख केला होता, इस १७३५ मध्ये फोंड्याच्या सावंताला त्यांनी इशारा दिला, "ब्राम्हणाची कबिला कैदेत ठेवणे हा महाराष्ट्रधर्म नाही." असे त्यांनी सूचित केले होते.

महाराष्ट्रधर्माचा शेवटचा उल्लेख मला इस १७४० मध्ये सापडला. वसईत पोर्तुगीजांनी जो धर्माच्या नावाने अत्याचार मांडला होता, ते पत्रातून तेथील रहिवासी बाजीरावांना कळवत आहेत. ते म्हणतात की, देवळे, पवित्र स्थळे व महाराष्ट्रधर्म नाश केला आहे.

अशाप्रकारे महाराष्ट्रधर्म हा शब्दाचा अभ्यास करत असताना, त्यात मला अनेक राजकीय, सामाजिक व नैतिक छटा दिसून आल्या. वरवर वाटणारी ही संकल्पना खूपच व्यापक होत होती. चिवट मराठ्यांनी राखलेला हा महाराष्ट्रधर्म आजही तुमच्या आमच्यात जिवंत आहे. अधिक काय तर महाराष्ट्रधर्म राहिला तो फक्त फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे !

जय शिवराय

लेख कसा वाटला हे Comment मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.

लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.

© सागर माधुरी मधुकर सुर्वे

 

संदर्भग्रंथ
१) मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था भाग १
२) Rise of Maratha Power - न्या. म. गो. रानडे
३) मनुस्मृती
४) गुरुचरित्र
५) चि. वि. वैद्य ऐतिहासिक निबंध, खंड १
६) मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड १ व ४ प्रस्तावना
७) Selection from the Satara Raja's & Peshwa's Diaries

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960