पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : नदी आणि स्त्रीत्व
लेखक : अँन फेल्डहाउस अनुवाद विजया देव
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन
मूल्य : ₹ ४५०/-
नाव जरी माझे सागर असले तरी नदीला मनात वेगळे स्थान आहे. हे पुस्तक मी दोनवेळा पुस्तक प्रदर्शनात घेतले होते पण नक्की काय असेल असा विचार करून पुन्हा ठेवले पण म्हणतात ना, पुस्तकं नशिबात असावी लागतात, तसंच झालं. दरवर्षी कोल्हापूरला गेलो की, भवानी मंडपात आवर्जून पुस्तक खरेदी करतो, तिथे पुन्हा हे पुस्तक दिसले आणि लागलीच खरेदी केले.
नदी, प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक ! हीच नदी गावाकडे असली की, कसे प्रसन्न वाटते. "नदीकाठी माझे टुमदार गाव" अहाहा भन्नाट वाटतं पण मग हीच नदी शहरात असेल तर खल्लास तिचे नशीबंच फुटकं ! असंख्य अत्याचार करून तिला मारून टाकतात आणि मग ती फक्त नावापुरती उरते प्रत्यक्षात तिचे होते गटार.... मनाला हे चटका लावणारे असते पण लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. चला तर हे पुस्तक जाणून घेऊया....
मुखपृष्ठावर महाराष्ट्रातील नद्यांचे धार्मिक महत्त्व असे जरी लिहिले असले तरी कृष्णा, गोदावरी, तापी, भीमा, पूर्णा व कोयना ह्यांच्याच काठांवर हे पुस्तक फिरत असते. बाकी नद्यांविषयी उल्लेख ह्या पुस्तकात मिळत नाही. ह्याच नद्यांच्या माहात्म्यावर लेखकाने सविस्तर प्रकाश टाकला आहे. तळटीपा इतक्या आहेत की, कुठल्याही ओळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही, हे कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच हे पुस्तक अनेक संदर्भांनी भरलेला एक परिपूर्ण ग्रंथ आहे, ह्यामध्ये नद्यांविषयी जितक्या आख्यायिका आहेत, त्या सर्वच ह्यात मांडल्या आहेत.
दिनांक २९ डिसेंबर २०१९ ला खंडाळा ते कर्जत via उल्हास नदीच्या काठावरून चालत आलो होतो. सुमारे २२ किमीची ही पायपीट करून कोंडाणे लेणी जवळ विसावलो, तो खास प्रवास नदीबरोबर केला होता, त्यामुळे नदी काय चीज आहे हे ओळखून होतो म्हणून हे पुस्तक जरा झटकन समजले.
ह्या पुस्तकात नदीदेवतांचे आधुनिक उत्सव असे जे प्रकरण आहे त्यात फक्त वाईच्या कृष्णामाईचा उत्सव आहे. मुळात ह्या प्रकरणाच्या नावावरून अपेक्षित होते की विविध नद्यांचा उत्सव असावा पण इथे मात्र आपला अपेक्षाभंग होतो. Overall हे पुस्तक वरील नमूद केलेल्या नद्यांचीच माहिती देते. नदी हा विषय धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून माहात्म्यावर आधारित असल्यामुळे ऐतिहासिक अशा गोष्टी क्वचित आढळतात पण नदीचे आपल्या आयुष्यात कसे उपकार आहेत, ही मात्र concept clear होते. एकंदरीत ज्याला फक्त विविध नद्यांचे माहात्म्य अभ्यासायचे आहेत त्यांना हे पुस्तक बरंच काही देईल पण भाषाशैली थोडीफार किचकट वाटू शकते.
ह्या पुस्तकामुळे मी इतर नद्यांच्या गोष्टींची सांगड घालत जेव्हा आमच्या उल्हास नदीपर्यंत आलो तेव्हा मात्र काही गोष्टी नव्याने उलगडल्या. हे पुस्तक पूर्ण केले आणि नदीच्या काठावर जाऊन नदीबरोबर आणि त्या त्या वास्तूंबरोबर चर्चा केली व काठांवर असलेल्या काही लोकदैवतांच्या ठिकाणांवरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या त्या इथे मला शब्दबद्ध करता येणार नाही. overall नद्यांविषयी अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाजवळ हे पुस्तक हवेच.
No comments:
Post a Comment