पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : नऊ मनोऱ्यांचा किल्ला
लेखक : कइस अकबर ओमर
स्वैर संक्षिप्त अनुवाद : निशा नंदकुमार बर्वे
प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन
मूल्य : ₹ २७५/-
संपूर्ण काबूलची वीज गेली होती, असे कधी होत नाही. ओमरच्या आईने मेणबत्ती टेबलावर ठेवली, खिडकीतून वारा घोंगावत आला, ज्योत थरथरली, पडदे सळसळले. बाहेरून येणाऱ्या लोकांचा आवाज आणखीनच वाढला होता..... अशा भन्नाट शब्द रचनांनी सजलेले पुस्तक म्हणजे नऊ मनोऱ्यांचा किल्ला....!
अफगाणिस्तानवर वाचायला घेतलेले हे माझे दुसरे पुस्तक ! पहिले होते, प्रतिभा रानडे ह्यांचे काबूल कंदहारकडील कथा ते सुद्धा भन्नाट आहे त्याचे परीक्षणसुद्धा इथे आपल्या ह्याच साईटवर वाचू शकता. असो ! तर मग ह्या लेखकाविषयी मी ऐकून होतो. त्यामुळे हे पुस्तक bucket list मध्ये कित्येक दिवस पडून होते साहजिकच पुस्तक खरेदी करताना online दिसले आणि लागलीच विकत घेतले आणि वाचताना प्रत्येक क्षण अनुभवला. कइस अकबर ओमर ह्याचे प्रत्यक्ष अनुभव म्हणजे हे पुस्तक आहे. सिंधुतील साम्राज्ये वाचताना मी जसा स्तब्ध झाला होतो तोच अनुभव मला ह्या पुस्तकाने दिला. कइसचे कुटुंब प्रचंड श्रीमंत होते, एका ओळीत सांगायचे झाले तर त्याचे आजोबा त्या काळात सेवानिवृत्त bank employee होते. खूप मान होता त्यांना ! त्यांचे राहते घर म्हणजे हवेली होती, आजूबाजूला असलेल्या बागेचा विचार करता, ती ५ एकरावर पसरली होती. ५०-६० लोकांचा गोतावळा सहज त्या हवेलीत राहायचा पण त्यांच्या देशात धर्मांध शक्तीने उचल खाल्ली आणि त्यांचा प्रवास अस्ताकडे झुकू लागला. सरते शेवटी राहत्या देशात ते निर्वासित झाले. ते घर सर्वांचे सुटले ते कायमचेच, ह्यापेक्षा काय दुःख ! पण कइस तुला एक कडक सलाम ! तुझे जीवन मला नेहमी आदर्शवत राहील आणि संकटात प्रेरणा देत राहील.
तुझे आजोबा जेव्हा जेव्हा भेटत होते तेव्हा ते माझे आजोबा वाटत होते कारण माझ्या आईचे वडील सुद्धा प्रचंड वाचनवेडे होते. तुला जसे त्यांच्या बरोबर गप्पा मारायला आवडायचे तोच अनुभव माझा सुद्धा होता. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक अनुभवाचा अथवा वाक्यांचा नंतर अर्थबोध व्हायचा. यार कइस, तुझे आजोबा गेले हे जेव्हा तू सांगितले तेव्हा आपसूक माझे सुद्धा डोळे भरले. खास आहे राव हे पुस्तक !
एका पेक्षा एक वाक्यांच्या रत्नराशी रचून हा नऊ मनोऱ्यांचा किल्ला उभा केला आहे. कइस बोलत होता आणि त्याचे अनुभव मला गुंग करत होते. सर्रकन अंगावर काटा उठत होता. त्याचे काही अनुभव तर घाम फोडतात घाम ! मध्येच कइसचे बाबा भेटतात. एक मुष्टियोद्धा ज्याने देशासाठी मेडल जिंकले होते. त्यांचे सुद्धा अनुभव अगदी खुमासदार गुंफले आहेत. त्यांची चाललेली धडपड आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी चाललेली स्थलांतरे खूप काही शिकवतात, त्यात ते म्हणतात, "दुखावलेले हात काही तरी करू शकतात पण दुखावलेले मन काहीच करू शकत नाही." तेव्हा आजूबाजूला असलेल्या परिस्थितीचा वेध आपल्याला घेता येतो. कइस आणि त्याचे कुटुंब खूप फिरले, त्यात ते बामयान प्रांतात विसावले, पैशाच्या चणचणीमुळे थेट बुद्धमूर्तीच्या मागच्या गुहेत त्यांनी बस्तान मांडले, तो अनुभव आणि त्याला भेटलेला बौद्ध भिक्षु त्या दोघांमधील वार्तालाप आणि त्यांच्याकडे पाहणारा तो स्थितप्रज्ञ बुद्ध, अहाहा खासच आहे. घटना मस्त रंगवली आहे यार ! मी सुद्धा भरून पावलो कारण ह्या पुस्तकासाठी योगायोगाने मी वापरलेला बुकमार्क ! तुम्ही फोटोत पाहू शकता. मला तर थेट ह्या बुद्धाबरोबर बामयान प्रांतात भटकून आल्यासारखे वाटले.
कइसचा चुलत भाऊ त्याचे टोपणनाव "वकील" त्याचे बाबा असेच गायब झाले तेव्हा एका घटनेत त्याला त्यांची आठवण येत होती, तो प्रसंग वाचताना डोळ्यांतील अश्रू कधी त्या पृष्ठावर ओघळले कळलेच नाही. म्हणूनच म्हटले की, हे पुस्तक म्हणजे अनुभवांची रत्नराशी आहे. कइसला कित्येक लोक भेटले, त्यांच्या सुद्धा ओळखी आपल्याशी होतात. हे पुस्तक तुम्हांला कुठेही नाराज करत नाही. संकटात उभारी घेण्याचे एक परिपूर्ण package आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ह्या पुस्तकातील मनात घर करणारी घटना म्हणजे आयुष्यात काय करायचे ? प्रत्येकाला हा प्रश्न एका वळणावर पडतो. तसाच कइसला सुद्धा पडला तेव्हा औट घटकेसाठी पण ऐकू व बोलू न शकणारी शिक्षिका त्याचे उत्तर देते आणि कइसचे आयुष्य बदलते. ग्रेट आहे हा अनुभव !
कइसने आणि त्याच्या बाबांनी ज्या वेदना भोगल्या आहेत ना, त्या वाचताना आपण सैरभर होतो. त्यात ते कित्येक वेळा मरणाच्या दारातून माघारी फिरले आहेत. हे सर्व सांगत असताना मध्येच कइसच्या तोंडून सॉक्रेटिस बोलतो, "वेदनेमधूनही एक आनंदाची अनुभूती मिळते...." म्हणूनच कइस निदान माझ्या आयुष्यात हिरो ठरला. हा शुष्क देश आज उभा राहण्याचा प्रयत्न करतोय पण धर्मांध शक्ती काही तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करत आहेत. त्यात आपल्या पिढीतील कित्येक कइस बळी जात आहेत. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे. एक भन्नाट अनुभवांची शिदोरी आपणांस मिळेल, हे नक्की !
ग्रेट आहे कइस आणि त्याचे बाबा कारण आज कइसची काबूलमध्ये मोठी कंपनी आहे. ह्याला म्हणतात यश ! जे कइसने अनेक खस्ता खाऊन मिळवले आहे.
No comments:
Post a Comment