पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : माणदेशाच्या वाटेवर
लेखक : सुजय खलाटे व अमित निंबाळकर
प्रकाशन : शिवतीर्थ
मूल्य : ₹ २५०/-
ह्या पुस्तकावर जरा मी सविस्तरचं लिहिणार आहे. त्याला कारण म्हणजे सुजयराव खास मित्र आहेत आणि हे पुस्तक सिद्ध करताना त्यांच्याशी बराचवेळा फोनवर बोलणे होत असे. त्यामुळे ही कलाकृती जेव्हा माझ्या हाती आली, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खास होता. चला तर सैर करूया माणदेशाची....
ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून माणदेशाची ओळख पटते तसेच ह्या पुस्तकात माणदेश, खटाव व फलटण इत्यादी ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक स्थळांची इत्नभूत महिती दिली आहे. लेखकांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांची माहिती घेऊन तसेच ऐतिहासिक साधनांमध्ये शोधून हा ग्रंथ तयार केला आहे. ह्या पुस्तकात फोटोंचे पृष्ठ glossy आहेत त्यामुळे जो फील येतो ना, अहाहा खास असतो तो !
आताच काही दिवसांपूर्वी वाचलेले काबुल कंदहारकडील कथा ह्या पुस्तकातील वाक्य सुजयरावांच्या पुस्तकाला तंतोतंत लागू पडते ते म्हणजे, "काही जागांचे खास माहात्म्य असते." माणदेश रुक्ष जरी असला तरी इतिहासाची हिरवळ अनुभवायची असल्यास हे पुस्तक वाचायलाचं हवं. माझ्या मते, सुजयराव तुमची मेहनत नक्कीच ह्या कलाकृतीतुन प्रतीत होत आहे. ह्या पुस्तकातील सर्वच प्रकरणं छान आहेत पण मला खास वाटले ते "ऐश्वर्यसंपन्न नगरी - औंध" हे प्रकरण भन्नाटरित्या मांडले आहे.मी स्वतः ते मंदिर आणि परिसर पाहिला म्हणून मला त्या गोष्टी पटकन उमजत गेल्या. इथे एक प्रश्न पडतो, तो म्हणजे दीपमाळ कोणत्या उत्सवाच्या वेळी प्रज्वलित करतात ? ते दिवस सांगितले तर लोकांना खास तेव्हा हजेरी लावता येईल. बरं असो !
फक्त भ्रमंती करण्यापेक्षा मी म्हणेन चिमूटभर अभ्यासाची जोड असली ना, म्हणजे ती भ्रमंती रुचकर होते आणि ह्याच चिमुटभरासाठी सुजयरावांची ही कलाकृती म्हणजेच "माणदेशाच्या वाटेवर" हे पुस्तक संग्रही ठेवायलाच हवे. कधी माणदेशी गेलात तर नक्कीच ही Dictionary घेऊन जा म्हणजे पडलेले प्रश्न झटकन सुटतील. ह्यात बरंच काही आहे; नकाशे, मंदिर संस्कृती, विविध फोटो, गडांचे अवयव ओळख इ. फक्त इतिहासाने हे पुस्तक भरलेले आहे का ? तर असेही नाही, त्यात माणदेश गाजवणारी लोकं पुस्तकाच्या शेवटी आपल्याला भेटायला येतात आणि शेवट गोड होतो.
माणदेश नेमका कसा ? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
No comments:
Post a Comment