पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : ग्रीकांजली
लेखिका : मीना प्रभु
प्रकाशन : पुरंदरे प्रकाशन
मूल्य : ₹ ३७०/-
Lockdown 3.0 चा काळ सुरू झाला आणि माझा निर्णय झाला की, बस् आता मस्त माझ्या ज्ञानसमाधी खोलीतून मनसोक्त फिरायचे ! पहिले प्रतिभा रानडेंबरोबर तीन दिवस काबूल कंदाहार फिरलो आणि मग दोन दिवस सुजयरावांबरोबर माणदेश फिरत राहिलो. त्यानंतर थेट मीना प्रभूंबरोबर ग्रीसला उड्डाण केले आणि मग सुरू झाली ग्रीकांजली......
हे पुस्तक मला पुण्यात बुकगंगामध्ये मिळाले, मला ह्या भूतलावरील दोन देशांविषयी लईच ओढ आहे. एक इजिप्त आणि दुसरा ग्रीस..... त्यामुळे दोन्ही देशांविषयी असलेली पुस्तकं लागलीच घेऊन टाकली. मागील सात दिवस पायाला भिंगरी लावल्यासारखे ग्रीस पालथे घातले. खास आहे राव ! मी जेव्हा आपली लेणी पाहतो तेव्हा फार फार तर २४०० वर्षे मागे जातो पण ग्रीस आपल्याला ५००० आणि त्या पेक्षा जास्त वर्षे मागे घेऊन जाते. प्रत्येक गोष्ट मीना प्रभुंनी खुमासदार मांडली आहे. फक्त खंत एकच आहे ती म्हणजे, ह्या पुस्तकात फोटो नाहीत. नाहीतर धमाल आली असती, त्यांचा लिखाणाचा व्याप कमी झाला असता आणि ते स्थळ व त्या संबंधी घटना झटकन समजलया असत्या, बरं असो !
ह्या पुस्तकात एक वाक्य आहे, आयुष्यातील काही अनुभव चिमटीने तर काही अनुभव बचक्यानं उचलायचे असतात. ज्जे बात हे पुस्तक नेमके बचक्यानं आपल्या देत राहते, हे नक्की ! ग्रीस फिरताना आपल्याला ग्रीकांचे देव झ्यूस, अपोलो, अथीना, पोसोडिन सर्वच भेटायला येतात कारण ठिकठिकाणी ह्यांची मंदिरं आहेत. त्यानंतर सॉक्रेटिस, प्लेटो, ऍरिस्टॉटल ह्या तत्त्ववेत्तांची भेट म्हणजे एक चाबूक अनुभव असतो. अरे हा अलेक्झांडर राहिला राव ! ह्या भाईला तुम्ही भेटले नाहीत तर ग्रीस तुम्ही पाहिलेच नाही, असा सरळ अर्थ होतो. ह्याची आख्खी फॅमिली आपले स्वागत करते. एका म्युझियममध्ये ह्याचा पुतळा इतका चिकना आहे ना, तर हा प्रत्यक्षात कसला भन्नाट दिसत असेल राव !
ग्रीसने जगाला लोकशाही आणि बरंच काही दिले पण एक सांगू बरंचसं तत्वज्ञान हे भारतातून आले, असे सॉक्रेटिसने लिहून ठेवले आहे. तेव्हा मात्र आपली कॉलर ताठ होते. प्रत्येक पुस्तकात भावणारी प्रकरणं असतात ह्यामध्ये एक अलेक्झांडरचे आणि दुसरे मॅरेथॉन कसं सुरू झाले ? हे प्रकरण अशी दोन प्रकरणं अगदी touching आहेत.
हे पुस्तक खास आहे. ग्रीस फिरायला जाताना जर हे घेऊन गेलात, तर ठिकठिकाणी आपल्याला गाईड करेल, ही कलाकृती ! कारण ज्ञानावाचून प्रवास म्हणजे पंखावाचून उडणे असं असते. तर मग प्रवासवर्णन आवडत असलेल्या लोकांना हे पुस्तक नक्की आवडेल. काही ठिकाणी थोडं निरस होते पण तेवढे चालतं ओ !
No comments:
Post a Comment