हा माझा लोकमान्यांवर दुसरा ब्लॉग आहे. पहिला ऑगस्ट २०१७ मध्ये टिळक, लोकल आणि मी…. अशा विषयावर लिहिला होता. ह्या साईटवर तोही वाचू शकता. त्यानंतर लोकमान्य बराच वेळ भेटले व चर्चाही बरीच रंगली. आज जर विचार केला तर बऱ्याच जणांसाठी लोकमान्य टिळक हे चिखली गाव व शेंगा-टरफले इतक्याच घटनांमध्ये सीमित आहेत. शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेचा आज शुभारंभ केला जातो, तीच तीच टिपिकल भाषणे ठोकून नंबर काढले जातात पण त्याही पलीकडे लोकमान्य आहेत, हे सोयीने सर्वच विसरलेले असतात. आज नेमक्या त्याच अपरिचित बाजूवर प्रकाश टाकायचा आहे. आपण कधी त्या बाजूंचा विचारसुद्धा केला नाही व ह्या जहालवादी नेत्याला जाणून घेतलेच नाही आणि म्हणुनच एक वेगळी बाजू मांडायचा प्रयत्न ह्या ब्लॉगमार्फत मला करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया शेंगा व टरफले ह्यांच्या पलीकडील लोकमान्य....
लोकमान्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईची व त्यांची शुद्धच हरपली होती. ते इतके अशक्त होते कि, जगतील कि नाही ? ह्याचीच साशंकता होती. साहजिकच बाळाला पहिल्यांदा रडायला तब्बल १५ मिनिटे गेली. टाळू पूर्ण भरला नव्हता व हातापायाच्या फक्त काड्या दिसत होत्या पण आईने धीर सोडला नव्हता, "माझा मुलगा सूर्यासारखा होईल.'' असे त्यांनी म्हटले आणि त्यांचे हे विधान सत्यात उतरलेले आपण पाहिलेच आहे. त्यांच्या आई मात्र हे ह्या सूर्याचे तेज पाहायला राहिल्या नाहीत. नियतीच्या डावात त्यांची आई लोकमान्यांच्या १०व्या वर्षी देवाघरी गेल्या. लहानपणी आलेल्या मोठ्या संकटात जे धीराने तोंड देतात तेच मोठेपणी आदर्श व्यक्ती होता, मला तरी असे वाटते.
त्याकाळी लवकर लग्न होत असत त्यामुळे जावयाला सासऱ्याने येणाऱ्या महिन्यांमध्ये विविध खेळाचे साहित्य भेट द्यायची प्रथा होती, त्यात विटी दांडू, भोवरा अशा तत्सम वस्तू असत पण टिळकांनी पुस्तकं मागून घेतली होती. पुस्तकांची कमालच अशी आहे राव ! पुस्तकवेडा बाळ ह्यांची आणखी एक घटना आपल्या मनात खोलवर रुजते. लोकमान्यांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्या वडिलांकडे संस्कृतमधील बाणभट्टाची कादंबरी वाचायचा हट्ट धरला. ज्जे बात.... मोठी लोक कशी मोठी होतात ? त्याचे हे द्योतक आहे. आजच्या काळात पोकेमन पकडायला नाहीतर Pug G खेळण्याचा हट्ट आजची मुलं करतात. काळ बदलला बाकी काय ? लोकमान्यांचा व्यासंग मोठा होता ते सतत वाचन, चर्चा आणि टिपणे काढण्यात मग्न असत. त्यात सुद्धा त्यांना भेटायला कोणीही कधीही येत असे तरी सुद्धा त्यांनी कधी कोणाची भेट नाकारली नाही कारण खोलीचा दरवाजा सतत उघडा असे, हि त्यात खासियत ! लोकमान्यांची मराठी, इंग्लिश व संस्कृत भाषेवर हुकूमत होती पण तुम्ही विश्वास ठेवणार नाही परंतु हे खरे आहे ते म्हणजे, लोकमान्यांना हिंदी विशेष येत नव्हते इस १९१९ साली लोकमान्य हिंदी शिकणार होते पण इस १९२० साली ते काळाच्या पडद्याआड गेले. बरं तर मग ह्या तीन भाषांव्यतिरिक्त वैदिक वाङमय बरेचसे जर्मन भाषेत आहे म्हणून त्यांनी जर्मन शिकली त्याचा त्यांना गीतारहस्य लिहिताना फार उपयोग झाला. जर्मन शिकण्यासाठी त्यांनी पुस्तकं वापरली कारण तेव्हा ते मंडालेच्या तुरुंगात कैदेत होते. परिस्थिती कोणतीही असो, काळाच्या पटलावर माणसाने नेहमी विद्यार्थी असावे म्हणजे आयुष्यातील संकटाशी नेटाने लढता येते. लोकमान्यांनी ते खरे करून दाखवले आहे. लोकमान्यांना यंत्रशास्त्राची अफाट आवड होती केसरीतील प्रिंटिंग प्रेस ते स्वतः दुरुस्त करत असत, लोकमान्य अष्टपैलू होते.
लोकमान्यांवर सतत नजर ठेवायला एक इंग्रजी पहारेकरी असे, जेव्हा टिळक घरी असत तेव्हा ते जोडे प्रवेशद्वाराजवळ बाहेर काढत असत म्हणून ते मंत्रिमंडळाला म्हणत की, "इंग्रजी पहारेकरी माझे जोडे सांभाळतो, असा मी पहिला भारतीय आहे." अहाहा हॅट्स ऑफ लोकमान्य.... लोकमान्यांना आजही पाहिले तरी तो करारीपणा आपल्याला जाणवतो. कॉलेजच्या पहिल्या वर्षी ते व्यायामात गढून गेले होते त्याला कारण होते शाळेत असताना सिंहगडावर त्यांची ट्रिप गेली होती, त्यात अशक्त बाळ अर्धा गड चढून झाल्यावर इतर मुलांप्रमाणे वाटेत विश्रांतीसाठी बसले पण जे लोक बसत नव्हते, त्यांचे विनोद त्यांना ऐकायला लागले म्हणून त्यांनी व्यायाम करून शरीर कमावले. ध्यास म्हणतात ना, तो हाच ! टिळक बुद्धिमान होते पण त्यांना स्कॉलरशिप का मिळत नाही ?असा प्रश्न त्यांच्या चुलत्याला पडत असे, त्यावर शिक्षकापेक्षा अफाट बुद्धिमत्ता असलेल्या बाळने दिलेले उत्तर खूप महत्त्वाचे आहे. टिळक म्हणाले, "स्कॉलरशिप मिळवण्यास अवघ्या विद्वत्तेची गरज आहे हि जी लोकांची समजूत आहे ती पुष्कळ अंशी चुकीची आहे. विद्वत्तेच्या बरोबर अथवा दोन पावले पुढेच काही गुण संपादावे लागतात ते म्हणजे प्रोफेसर साहेबांच्या कृपेची साधने ! ती साधने माझ्याजवळ नाहीत व ती संपादून स्कॉलरशिप मिळावी, अशी माझी इच्छा नाही. दुसरे स्कॉलरशिपसाठी विद्या नाही, विद्येकरिता स्कॉलरशिप नाही, अशी माझी समजूत आहे. असा समज ती देणाऱ्यांचा होईल तेव्हा आपोआपच मला मिळेल. तसे जो पर्यंत होत नाही तो पर्यंत मी घनपाठी आहे, जटापाठी आहे असे घरोघर सांगत फिरून पैसे मागणाऱ्या भिक्षुकाप्रमाणे कधी करणार नाही.''
लोकमान्य मंडालेहून आल्यानंतर मधुमेहाचे दुखणे जास्तच बळावले होते तेव्हा त्यांनी साखर व भात पूर्णपणे वर्ज्य केले व पथ्य कडक करून पथ्याचे पदार्थ ते आवडीने खात तेव्हा ते म्हणत, तुम्ही खाण्याकरिता जगता आणि मी जगण्याकरिता खातो, हे लिहिले आहे त्यांची कन्या सौ. मथूताई साने ह्यांनी ! जिभेवर ताबा होता म्हणून त्यांना आयुष्यातील शेवटची १० वर्षे व्यवस्थित कार्य करता आले. माझ्या मते, सर्वच बाबतीत जिभेवर ताबा असणे अत्यंत गरजेचे आहे. असो ! अजून एक घटना मी इथे सांगेन, ही घटना आहे, १९१५ सालातील ! लोकमान्य पुण्याहून अमरावतीस चालले होते. हा प्रवास confidential ठेवायचा असे सहकाऱ्यांनी ठरवले होते आणि त्याच दृष्टिकोनातून नासिकपर्यंत प्रवास झालासुद्धा ! पण पुढे ही बातमी सर्वांना कळली आणि प्रत्येक स्टेशनवर लोकमान्यांना पाहायला अलोट गर्दी लोटली, तेव्हा लोकांच्या भेटीसाठी रात्री लोकमान्यांना जागे राहावे लागले. तेव्हा ते बोलले की, "मोठेपणा सुखाचा नसतो हे त्यावेळी मला प्रत्यक्षच दिसले." लोकमान्य हे हिंदुस्थानाचे एकमेव "लोकमान्य" आहेत असे गांधीजी बोलले आहेत. लोक भरभरून प्रेम करत होते. टिळक जिथून जात असत तिथे लोक त्यांच्या स्वागतासाठी जमलेले असत मग रात्र असो कि दिवस ! लोकांना वेळेचेही भान राहत नसे. १९०७ साली सुरतेत व्याख्यानाच्या वेळी टिळकांवर कोणीतरी जोडा फेकला होता, १९१८ साली लोकमान्य पुन्हा सुरतला गेले होते तेव्हा तेथील लोकांनी सोन्या-चांदीची फुले व खरे मोती उधळले होते. टिळकांच्या भाषण व्यवस्थित ऐकू यावे म्हणून १३ मंच उभारले होते व प्रत्येक मंचासमोर ८-१० हजार लोक होते. असा नेता पुन्हा होणे नाही. राजद्रोहाचा दुसऱ्या खटल्याच्या प्रसंगी लोकमान्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली, तेव्हा मुंबईचा कापड बाजार सहा दिवस बंद होता असे इतिहासात मुंबईने कधीही अनुभवले नव्हते, अशी नोंद तेव्हाच्या वृत्तपत्रांनी केली आहे.
श्रीमद् रायगडावर १९०६ साली शिवोत्सव साजरा करण्यासाठी लोकमान्य महाडला समुद्रमार्गे गेले होते व वाटेत त्यांना तार आली कि, चिरंजीव अत्यवस्थ आहेत, तात्काळ परता म्हणून ! पण उत्सव संपवून आम्ही येऊ म्हणून लोकमान्यांनी तार केली. ते म्हणतात, पुढरीपणाचा वसा घेतलेल्या व्यक्तीला निर्धार व कर्तव्यनिष्ठा यांना खुंटीला टांगता येत नाही. नेता कसा असावा ? तर तो असा असावा. लोकमान्यांची स्थितप्रज्ञता काय होती हे त्यांनी लिहिलेल्या विविध लेख व पुस्तकं वाचल्यावर आपल्याला कळून येईल पण दुर्दैवाने लोकमान्य आज आपल्याला आठवतात ते फक्त जयंती आणि पुण्यतिथीला ! तेही टिपिकल भाषणं करून बक्षिसांचे क्रमांक काढले जातात. लोकमान्य टिळक म्हणजे एक व्यापक विषय आहे आणि तो विषय जर आपण आत्मसात केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला व समाजाला होईल.
टिळक जेव्हा आपल्याला सोडून गेले ना तेव्हा त्या १० दिवसांच्या सुतकात मुंबईत एकही चोरी झाली नाही तसेच अंदमानात कैद्यांनी सकाळचे जेवण घेतले नाही, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून ठेवले आहे. टिळक सर्वांचे होते त्याचे हे द्योतक आहे. पु. ल. देशपांडे यांनी एका लेखात म्हटले आहे कि, पुणे.. पुणे केव्हा झाले की लोकमान्य ज्या वेळेला होते त्या वेळेला व तेव्हा त्या पुण्याला पुणेपणाचा अर्थ होता. तर असा हा आपला क्रांतिकारक आपल्याला समजावा म्हणून हा त्यांच्या जयंतीनिमित्त लेखप्रपंच !
संदर्भग्रंथ
१) आठवणीरूप बाळ गंगाधर टिळक - विश्वनाथ गोखले
२) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - डॉ. सदानंद मोरे
लेख कसा वाटला हे comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
सागर माधुरी मधुकर सुर्वे
खूप छान माहिती सागर दादा
ReplyDeleteचिखली गाव, शेंगा-टरफले याच्या पलीकडील लोकमान्य टिळक मला आपल्या लेखाच्या माध्यमातून मला समजले
आपले खूप खूप धन्यवाद
सुंदर माहिती.
ReplyDelete