पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : अलिजबहाद्दर, महाराज माधवराव उर्फ महादजी शिंदे यांचे चरित्र व कारकीर्द
लेखक : बॅ. विष्णू रघुनाथ नातू
प्रकाशन : पार्श्व पब्लिकेशन
मूल्य : ₹ ४००/-
हा ग्रंथ आहे, जो औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुरू होतो आणि महादजी शिंदेंच्या उत्तरार्धात आपल्याला घेऊन जातो. असा व्यापक प्रवास ह्यात ससंदर्भ गुंफला आहे. छत्रपती शिवरायांनी ज्या हिंदवी स्वराज्याचा पाया महाराष्ट्रात घातला, त्या स्वराज्याचे मराठ्यांच्या साम्राज्यात रूपांतर करून आणि दिल्ली जिंकून महाराजा महादजी शिंदे सरकार ह्यांनी कळस चढवला आणि देशावर, दिल्लीवर राज्य करण्याची कुवत फक्त मराठ्यांमध्येच आहे, हे दाखवून दिले.
हे पुस्तक मला बुकविश्व ह्या वेबसाईटवर मिळाले. संदर्भासहित असलेले हे पुस्तक अफलातून आहे. मी वाचायला घेतले आणि जेव्हा पानिपत प्रकरणात आलो, तेव्हा पुन्हा ती जखम भळभळायला लागली. सदाशिवभाऊंनी जेव्हा पानिपतावर तळ दिला तेव्हा पासून पानिपत युद्धाच्या आदल्या दिवसापर्यंत छोट्यामोठ्या चकमकीत आपले १३४ सरदार मरण पावले. हे चटका लावतं राव !
ह्या ग्रंथात पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजींचे वजन कसे वाढत गेले ? त्यावर प्रकाश टाकला आहे. हा माणूस इतका कणखर होता की, पानिपतातून जेव्हा ते निसटले तेव्हा त्यांचा पाठलाग दोन पठाणांनी केला होता व त्या झटापटीत ते कायमस्वरूपी पायाने पंगू झाले, पण ह्या संकटावर मात करून पुन्हा दिल्ली काबीज केली आणि नजीबच्या घराण्याची धूळधाण केली. ज्जे बात ! शत्रूला असाच हाणायचा असतो, हे ही नक्की ! हा ग्रंथ वाचताना ते सर्व डोळ्यांसमोर अगदी उभे राहते. हा ग्रंथ समजून घेण्यासाठी पानिपत माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. अरे हा, त्यातही ते प्रसिद्ध पानिपत नको कारण ती कादंबरी आहे, त्यासाठी उदय स. कुलकर्णींचे solstice at Panipat हे मराठीत उपलब्ध असलेले पुस्तक वाचा कारण ते ससंदर्भ आहे.
ह्या पुस्तकात काही घटना अगदी दुखावतात, शिवप्रभूंनी उभे केलेले स्वराज्य नक्कीच साम्राज्यात बदलले, हे कौतुकास्पद आहे पण आपल्या मराठ्यांची एकी नव्हती मग होळकर - शिंदे वाद असो नाहीतर अहिल्याबाई आणि नानांचा वाद असो, नुकसान होत होते, ते आपल्या मराठेशाहीचे ! हे का समजत नव्हते ? एकवेळ तर अशी आली होती की, पुण्यातील सत्ताकेंद्र हलून मथुरा झाले असते कारण मथुरा महादजींचा बालेकिल्ला झाला होता. पुन्हा ह्या फालतू राजकारणात जीव जात होता तो मराठेशाहीचा..…
महादजी एकमेव मराठा सरदार आहेत, जे नर्मदेच्या पलीकडे १२ वर्षे राहिले. नुसतेच राहिले नाही तर राजपुतान्यापासून ते दिल्लीपर्यंतचा प्रदेश आणि छोट्यामोठ्या सर्व राजसत्तांना वज्रमुठीत आवळून ठेवले, कमाल आहे ना ! खास आहे, हे पुस्तक ! ज्यांना पानिपत म्हणजे सर्व संपले असे वाटते ना, त्यांना हे पुस्तक म्हणजे चपराक आहे आणि अभ्यासकांसाठी हे घबाड आहे. तर मग हे एक healthy पुस्तक वाचायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment