पन्हाळ्यातील पलायन आणि एका अनामिक मराठ्याचा पराक्रम....



कोल्हापूरचा पन्हाळा म्हणजे इतिहासातील सुवर्ण क्षणांनी नटलेला सह्याद्रीच्या रांगेतील शेवटचा गड ! साहजिकच ह्याचा मी माझ्या कुटुंबाबरोबर जेव्हा अभ्यासात्मक दौरा केला तेव्हा अनेक खाचाखोचा पाहिल्या आणि इथे ब्लॉगसुद्धा लिहिला पण तेव्हा पासून काही बऱ्याच अपरिचित गोष्टी त्यात नमूद करायच्या राहिल्या ज्या इथे आज करत आहे.

पन्हाळा पाहताना दिनांक १३ जुलै १६६० चा रणसंग्राम आठवतो त्यात छत्रपती शिवरायांनी खेळणा ऊर्फ विशाळगडाकडे पन्हाळ्यातून ६०० मावळ्यांना सोबत घेऊन यशस्वी धाव घेतली होती. बाजी प्रभूंनी घोडखिंड रोखून धरली आणि शिवछत्रपती ६१ किमी वरील विशाळगडाकडे सुखरूप पोहचले. हा इतिहास आपणा सर्वांना माहीत आहेच परंतु ह्याच पन्हाळ्याने अजून एक छत्रपतींचे ऐतिहासिक पलायन पाहिले आहे. (इथे पलायनाचा अर्थ पळपुटा असा नसून "सिर सलामत तो पगडी पचास" ह्या अर्थाने घ्यायचा आहे कारण प्रत्येक पलायनातून एक नवा इतिहास जन्माला आला आहे.)

ती दिनांक होती ११ मार्च १६८९ क्रूरकर्मा औरंगजेबाने शंभुराजांची कुरणानुसार हत्या केली आणि मराठ्यांचे स्वराज्य ढवळून निघाले. शिवप्रभूंच्या हस्ते स्थापन झालेली हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजे श्रीमद् रायगडाला इतिकादखानाचा वेढा पडायला सुरुवात झाली होती. गडावर राजमंडळी होती. येसूबाई, त्यांचा पुत्र शाहू आणि त्यांचा दीर म्हणजे शिवपुत्र राजाराम महाराज अशा खास मंडळींचे वास्तव्य होते त्यावेळी राजाराम महाराज अवघे १९ वर्षांचे होते. प्राप्त परिस्थितीत बेलाग रायगड सोडून राजधानीबाहेर पडून मुघलांशी संघर्ष चालू ठेवण्याचा सल्ला येसूबाईंनी दिला जो योग्य होता, सूत्र त्याप्रमाणे फिरली. राजाराम महाराज व त्यांच्या दोन राण्या ताराबाई व राजसबाई यांच्यासह गुप्तपणे श्रीमद् रायगड त्यांनी सोडला.

शत्रूस हुलकावणी देऊन जावळीच्या खोऱ्यातून प्रतापगड गाठला परंतु ही चाल लवकरच झुल्फिकारखानाच्या (इतिकादखान) लक्षात आली आणि त्याने लागलीच पाठलागासाठी फतेहजंगखानास पाठवले. तो पोहचेपर्यंत महाराजांनी लढाईची तयारी केली आणि इतिहासाला अपरिचित अशी मुघल व राजाराम महाराजांची पहिली लढाई दिनांक १० जून १६८९ ला प्रतापगडाच्या पायथ्याला पार ह्या गावी झाली. इथे लढाईचा निर्णय काय लागला ? हा विचार महत्वाचा नसून १९ व्या वर्षी केलेली लढाई महाराजांच्या स्वभावातील धाडस दाखवते. पुढे १० ऑगस्टला महाराजांनी प्रतापगड सोडला आणि वासोटा गाठला. पाठीवर मोगली फौजा धावतच होत्या. वासोटा सोडला आणि तिथून सज्जनगडावर समर्थांच्या समाधीचे त्यांनी दर्शन व कल्याणस्वामींचे आशीर्वाद घेतले आणि सज्जनगडावरून महाराज पन्हाळगडास आले.

औरंगजेबाची छावणी तुळापूरलाच होती. श्रीमद् रायगड शत्रूच्या ताब्यात जाण्याची चिन्ह दिसायला लागली होती. मुघल फौजांनी हिंदवी स्वराज्यात अतोनात नुकसान करायला सुरुवात केली होती. तरी सुद्धा शक्य तिथे मराठे लढत होते, ह्यातच साक्षात औरंगजेबाच्या छावणीवरच संताजी घोरपडेंनी छापा घातला आणि त्याच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस कापून नेले. रायगडला वेढा चालवण्याऱ्याला झुल्फिकारखानवर सुद्धा छापा घातला आणि पाच हत्ती पळवले. पराक्रम म्हणावा, तो हाच ! आणि म्हणूच वाटते की, १६३० ते १६८० म्हणजे छत्रपती शिवराय नव्हते तर १६८० ते १७०७ म्हणजे छत्रपती शिवराय.... यशस्वीतेचे सूत्र म्हणजे छत्रपती शिवराय आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध होते.

शिवछत्रपतींच्या नावाने केलेली ही प्रथम लढाईत प्रचंड यश आले म्हणून तिन्ही घोरपडे बंधू सप्टेंबर १६८९ ला पन्हाळ्यावर राजाराम महाराजांना मुजरा मारण्यासाठी हजर झाले. संताजी घोरपडेंना ममलकतमदार म्हणजे राज्याचा आधार, त्यांचे बंधू बहिर्जी घोरपडेंना हिंदुराव तसेच मालोजी घोरपडेंना अमीरुल-उमराव व विठोजी चव्हाण ह्यांस हिंमतबहाद्दर किताब दिला. तो पर्यंत मराठ्यांची दुसरी फौज धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली शंभूमहादेवाच्या डोंगर परिसरात रणमस्तखान व शहाबुद्दीनखान ह्यांना फटकवत होती, त्यांच्यावर यश मिळवून ते सुद्धा पन्हाळ्यावर राजारामांच्या दर्शनास आले. त्यांना जयसिंगराव हा किताब दिला. शंभूराजांच्या हत्येनंतर मराठेशाही संपली असे क्षणभरच औरंगजेबाला वाटले असेल पण मुळांत परिस्थिती उलट होती. मराठे आता त्वेषाने लढत होते आणि विजय मिळवीत होते. पन्हाळ्यावरून सूत्र हलत होती आणि म्हणूनच मुघल फौजा पन्हाळ्यावर चालून आल्या व गडाला वेढा पडला. इतिहासात हा वेढा खूप कमी लोकांना माहीत आहे.

पन्हाळा पुन्हा एकदा शत्रूच्या वेढ्यात सापडला. ह्यात एकच पर्याय होता तो म्हणजे राजाराम महाराजांनी जिंजीकडे जाऊन तिथून राज्य करावे पण प्रवास धोक्याचा होता कारण दक्षिणेत सर्वत्र मुघलांचे प्राबल्य होते. तरीसुद्धा जर राजाराम महाराज तिथे गेले तर औरंगजेबाला महाराष्ट्रात व कर्नाटकात दोन्हीकडे संघर्ष मोहिमा चालवाव्या लागतील ज्या खर्चिक व वेळकाढूपणाच्या ठरतील आणि त्याचा फायदा मराठ्यांना नक्कीच होईल. अशा बऱ्याच गोष्टी साध्य होणार होत्या. औरंगजेबाला ह्या सर्वांची कुणकुण लागली आणि त्याने कर्नाटक पर्यंत सर्व प्रदेशातील सरदारांना सावध करण्यासाठी निरोप पाठवले तर समुद्रमार्गे राजारामांनी जाऊ नये म्हणून बहादूरखान ह्या सरदाराने पोर्तुगीजांना सप्टेंबर १६८९ मध्येच पत्र लिहिले होते. सर्वच बाजू आता नाकाबंदीत होत्या.

दिनांक २६ सप्टेंबर १६८९ मध्यरात्रीचा सुमार राजाराम महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून ऐतिहासिक पलायन केले. मल्हार रामराव म्हणतो की, राजाराम महाराज व त्यांचे सोबती यांनी "लिंगायत वाण्याचा" वेष परिधान केला होता तर केशव पंडित लिहितो की, "पांथोचित वेष धारण" करून प्रस्थान केले. कसेही असले तरी राजाराम महाराज शत्रूच्या वेढ्यातून सुखरूप निसटले. केशव पंडिताने ह्यावर काव्यसुद्धा रचले आहे. त्यावरून सूर्योदयाच्या वेळी ते कृष्णेच्या तीरावर पोहचले. ह्याचा अर्थ असा होता की, शत्रूस चकविण्यासाठी पन्हाळगडावरून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता, पूर्वेचा मार्ग त्यांनी धरला. जसे आग्र्यातून निसटताना महाराजांनी युक्ती अवलंबली अगदी तशीच ! राजाराम महाराज आता कृष्णेच्या तिरावरून प्रवास करून अमापूर येथे पुन्हा नदी पार केली. शत्रूला हुलकावणी देण्यासाठी महाराजांनी असा मार्ग अवलंबला. गोकाक जवळ घटप्रभा तर सौंदत्तीजवळ मलप्रभा नदी पार केली. शत्रू पाठीवर होते. शिवप्रभूंचा जसा पाठलाग सिद्दीने केला होता आणि बाजीप्रभूंनी जसा त्याला रोखला अगदी तसाच ! शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले संताजी जगताप व रुपाजी भोसले हा महापराक्रमी सेनानी राजाराम महाराजांच्या संरक्षणास धावले. जशी बाजी प्रभूंनी खिंड थोपवून धरली तशी संताजी जगतापांनी तुंगभद्रेच्या अलीकडे तर म्लेंच्छ सैन्याने घेरले होते तेव्हा प्रचंड मोठं युद्ध तिथे झाले. रुपाजी व संताजी जगतापांनी हे सैन्य रोखून धरले. पुढे रुपाजी भोसलेसह महाराज पुढे निघाले. श्रीमद् रायगड बांधणाऱ्या टीममध्ये असणारे गिरगोजी यादव उंच उंच जवाहिराच्या गाठोड्या घेऊन महाराजांबरोबर निष्ठेने होते. त्यांच्याच तकरीतीत ह्याची उत्तम साक्ष मिळते.

पन्हाळ्यातून निघताना वाटेवर महाराजांनी सैन्य येऊन मिळत होते अतिशय उत्तम नियोजन करून ही मोहीम पार पाडली जात होती. सरते शेवटी महाराज बेदनूरच्या चनम्मा राणीच्या राज्यात पोहचले. हिंदू धर्म व संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचविण्याचे शिवप्रभूंचे कार्य तिला ठाऊक होते आणि म्हणूनच संकटग्रस्त मराठ्यांच्या राजाला मदत करणे हा आपला राजधर्म असल्याचे तिने मानले. या भावनेमुळे औरंगजेब बादशहाच्या संभाव्य क्रोधाची क्षिती न बाळगता तिने त्यांच्या प्रवासाची चोख व्यवस्था केली.

अशा प्रकारे राजाराम महाराज तुंगभद्रेच्या काठावर आले. तिथे एक छोट्याश्या बेटावर मुक्काम असताना अब्दुल्लाखानाचा छापा पाडला. ही घटना व ठिकाण इतिहासाला ज्ञात नव्हती, ते ताराबाईकालीन कागदपत्रांत खंड १ मध्ये काही कागद डॉ. जयसिंगराव पवारांना मिळाले व ही माहिती उजेडात आली. केशव पंडितांच्या नोंदीनुसार रुपाजी भोसलेंनी पुन्हा शत्रूला थोपवून धरले तर बहिर्जी घोरपडे राजारामांना घेऊन शिताफीने निसटले. इथे मात्र घात झाला, रुपाजी भोसले कैद झाले तर राजारामांचे वेष धारण केलेला एक अनामिक कैद झाला. अब्दुल्लाखान आनंदला राजाराम कैद झाले म्हणून त्याने लागलीच एक दूत औरंगजेबाकडे पाठवला. खरं तर त्या युद्धात सर्व पागोटे, पोशाख, पादत्राणे व शस्त्र टाकून राजाराम निघून गेले होते, असे साकी मुस्तेदखानाने लिहून ठेवले आहे.

सिद्दी जौहरच्या वेढ्यात छत्रपती शिवराय जसे निसटले तसेच राजाराम ह्या प्रसंगातून निसटले. जसे शिवा काशीद शिवराय बनून गेले अगदी तसेच इथे हा अनामिक राजाराम महाराज बनला होता. हा राजाराम खोटा आहे हे जेव्हा अब्दुल्लाखानाला कळले तेव्हा त्याने दुसरा दूतमार्फत औरंगजेबाला हे सर्व कळवले व बादशहाच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुढे राजाराम महाराज जिंजीकडे गेले पण इतिहासाला अभिमान वाटावा अशी घटना आज मात्र विस्मरणात गेली आहे. हिंदवी स्वराज्याच्या होमकुंडात उडी घेणाऱ्या शिवा काशीदांची परंपरा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतही त्या अनामिक मराठ्याने चालू ठेवली, ही मराठा इतिहासाला अभिमान वाटावा अशी घटना आहे म्हणून हा लेखप्रपंच !

संदर्भग्रंथ : डॉ. जयसिंगराव पवार लिखित शिवपुत्र छत्रपती राजाराम


लेख कसा वाटला हे Comment मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.

लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.

© सागर माधुरी मधुकर सुर्वे

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960