मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था भाग १, २, ३ व ४ - क. न. चिटणीस


 


पुस्तक परीक्षण


पुस्तकाचे नाव : मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था भाग १, २, ३ व ४


विषय : संकल्पना व प्रशासन


लेखक : क. न. चिटणीस


प्रकाशक : र. क. चिटणीस


मूल्य : ₹ १४०/-



मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था ह्या विषयाचे एकूण चार भाग आहेत, त्यातील संकल्पना व प्रशासन हा पहिला भाग आहे आणि त्याचे परीक्षण खाली देत आहे. ही सर्व पुस्तकं मला पुण्यात एका रद्दी सदृश्य दुकानात मिळाली.



आशियात विविध राजसत्ता नांदल्या त्यांनी विकसित केलेली राज्यव्यवस्था व त्याचे झालेले दूरगामी परिणाम असे अनेक विषय आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यात बरीच धक्कादायक माहिती मिळते. त्यात ११व्या शतकात बगदाद मध्ये काही महाविद्यालये उदयांस आली, खरंतर माझा विश्वासच बसला नाही कारण जिथे फक्त विध्वंसक टोळकंच जन्माला आले तिथे असे काही म्हणजे शॉकच राव ! साधारणतः नवव्या शतकापासून हे पुस्तक सुरू होते ते मराठेशाहीच्या उत्तरार्धात आपल्या आणून सोडते. लेखकाने संदर्भग्रंथांचा भरपूर उपयोग करून हा ग्रंथ सिद्ध केला आहे म्हणूनच हे चार भाग नक्कीच अभ्यासकाला मार्गदर्शन करतात.



बरीच नवनवीन माहिती अपल्याला मिळते. त्यातील काही इथे देत आहे. मंत्रिमंडळाच्या सभासदांच्या नेमणुकीबद्दल शुक्राचार्य म्हणतात की, फक्त कार्य, चारित्र्य आणि गुण यांना महत्त्व दिले पाहिजे, जाती किंवा कुटुंब याला नव्हे आणि इथेच हिंदवी स्वराज्य आठवले कारण आपल्या राजांनी नेमकी कशी राज्यव्यवस्था तयार केली होती आणि शिवप्रभु आपल्याला सोडून गेल्यावर राज्य कसे टिकले ह्याचा बराच ऊहापोह केला आहे ह्यात ! ज्यामुळे अनेक विषय समृद्ध होत गेले व सरते शेवटी महाराष्ट्रधर्म राहिला ह्याच कारणांमुळे....



ह्यात विजयनगरवर एक प्रकरण आहे, ज्यात कृष्णदेवरायने "आमुक्तमाल्यद" नावाचा जो ग्रंथ लिहिला त्याविषयी बराच वेळा उल्लेख त्यात येतो, तो म्हणतो, राजाजवळ आदेश देण्याचे सामर्थ्य असले पाहिजे आणि प्रजाजनांनी त्याच्या आज्ञांचे पालन करावे व त्याला भिऊन वागावे. ज्जे बात जो पर्यंत रट्टे बसत नाही ना, तो पर्यंत सुधारणा होत नाही ! हे पटलं बुवा.... इथे एक क्षण कोरोना काळ आठवतो, ते lockdown आणि quarantine मध्ये फिरणारे दिवटे ज्यांना पोलिसांनी हाणले होते, बरं असो !



एकंदरीत ही सर्व पुस्तकं खास आहेत, ह्यात दुमत नाही आणि म्हणूच अगदी प्रत्येक भागाचे सविस्तर परिचय करून देत आहे. 




भाग २ (तिसरी आवृत्ती)


विषय : समाज व संस्कृती


मूल्य : ₹ १६०/-



हे पुस्तक पहिल्या भागापेक्षा थोडे किचकट आहे. ह्यामध्ये मध्ययुगीन जागा मोजणी व त्यावर आधारित कर संकल्पना, शिक्षणसंस्था, समाज जीवन व त्यात असणारे सर्व धर्मातील पंथ ह्यावर भाष्य केले आहे. स्त्रियांच्या बाबतीत ह्यामध्ये एक प्रकरण असून खरंच काही ठिकाणी स्त्रिया किती हलाखीचे जीवन जगत होत्या ह्यावर इत्नभूत मांडणी केली आहे. त्यात एक ओळ मनाला भावली, ती अशी होती. "जिथे स्त्रियांचा मान राखला जातो, तिथे देवता संतुष्ट राहतात." खरं आहे कारण आपल्या छत्रपती शिवरायांचे राज्य हे त्याचे द्योतक आहे.



उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे स्त्रियांची परिस्थिती चांगली होती व साहजिकच ह्याचमुळे कंपणाची पत्नी म्हणजे पहिल्या बुक्क राजाच्या सुनेने "मधुराविजयम् व वीरकंपणरायचरितम्" असे दोन ग्रंथ स्वहस्ते सिद्ध केले. अशा कित्येक घटना वाचायला मिळतात. अहो हे कशाला तर मिर्झाराजे जयसिंगसुद्धा पुस्तकवेडा होता, खगोलशास्त्र हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय ! त्या संबंधित त्याने अनेक दुर्मिळ ग्रंथ वाचले होते व जमवले सुद्धा होते, कमाल आहे राव ! मला तर नवीन माहिती ह्याच पुस्तकातून मिळाली. तर हे पुस्तक वाचताना अशी नवनवीन माहिती आपल्याला मिळत जाते.



त्या काळात आलेले विविध पर्यटकांनी घेतलेल्या नोंदीसुद्धा ह्यामध्ये दिल्या असून त्यामुळे हे पुस्तक संदर्भग्रंथ बनला आहे. ज्याला मध्ययुगीन इतिहास आतून समजून घ्यायचा असेल त्याने ही पुस्तक वाचायला हरकत नाही कारण राज्य फक्त युद्धावर नव्हे तर अनेक बाजूंनी सजलेले असते आणि त्यात जर फेरफटका मारायचा असेल तर हे चारही भाग वाचायलाच हवेत. 



भाग ३


विषय : व्यापार व उद्योगधंदे


मूल्य : ₹ १२०/-


हा संपूर्ण भाग व्यापार व उद्योगधंद्यांना वाहिलेला आहे. कमाल आहे ना, आपला इतिहास हा संपूर्ण युद्धाचा आहे पण एका बाजूला विविध प्रकारचे उद्योग राज्य जगवत होते. एकंदरीत व्यापार व उद्योगधंदे हे सर्व राज्यांचे रक्त आहे आणि ते नसेल तर नक्कीच राज्य मूर्च्छित होईल. 



ह्या पुस्तकात देशी, परदेशी व्यापार तसेच रस्ते व त्यांचे संरक्षण ह्यावर इत्नभूत भाष्य केले आहे. काही नवनवीन माहिती ह्यातून आपल्याला मिळते त्यातील कापड व्यापारामुळे बनारस शहर वैभवशाली झाले होते, मुघल काळात लाहोरला १००० कारखाने होते, खाणीतून काढलेल्या सैंधव मिठावर कर होता, १७ मणांमागे एक रुपया असा तो वसूल केला जात असे. आपल्या हिंदवी स्वराज्यातील आपल्या प्रजेचा मिठाचा व्यापार वाचवण्यासाठी महाराजांनी विदेशी सत्तांना मस्त धडा शिकवला. तर असे कित्येक प्रसंग ह्यामध्ये चितारलेले आहेत. खास करून काही दक्षिणेतील व आपल्या समाजातील आडनावं कशी तयार झाली ? ह्यावर पण लिहिलेलं आहे. अगदी भन्नाट आहे हा भाग !


 

इतिहास म्हटले की, युद्ध, युद्ध आणि युद्धच असे ज्यांच्या डोक्यात आहे ना, त्यांनी हा भाग वाचावा म्हणजे इतिहासातील हा कंगोरा कसा महत्त्वाचा आहे, हे समजेल. मुळात कोणी commerce वाला असेल तर त्याला त्याकाळी how to calculate the tax ? ह्यावर हटके माहीती मिळेल. उद्योग म्हटले की, चलन आले आणि चलन आले की, बचत आली आणि ती आली म्हणजे व्याज आले आणि पुढचा भाग नेमका ह्यावरंच आधारित आहे. 




भाग ४


विषय : चलन व पेढीव्यवहार


मूल्य : ₹ १३०/-



ह्या भागात विविध राजसत्तांनी पाडलेल्या चलनांची विस्तृत माहिती दिली आहे. त्यासाठी लागणारे सोने, चांदी व तांबे हे कशा प्रकारे मिळवण्यात येत असे व त्यासाठी येणाऱ्या अडचणी सरते शेवटी जेव्हा चलन व्यवहारात येत असताना येणाऱ्या अडचणी त्यांवर केलेली मात अगदी खुमासदार वर्णन ह्यामध्ये आढळते. त्यातील काही हटके माहिती खाली देत आहे.



गजनीच्या महमुदाने लाहोरला पाडलेल्या चांदीच्या नाण्यांवर हिंदू स्वरूपाची चिन्हे दिसून येतात. सोन्याच्या नाण्यांना "दीनार" म्हणत असत, ह्यामागे सुद्धा जबराट कहाणी आहे. सर्व प्रथम कुषाण राजांनी दीनार नाणी पाडली. ते त्याला "स्टेटर" म्हणत असत आणि हे नाणे रोमच्या नाण्यांवर आधारित होते. रोममध्ये त्या नाण्यांना "दीनारिअस" म्हणत असत, साहजिकच आपली पब्लिक, स्टेटरला दीनार म्हणू लागली. Direct स्ट्रेटड्राइव्ह मारून टाकला. पुढे तुघलकाच्या काळात दीनारला "टंका" म्हणू लागले. औरंगजेबाच्या वेळी त्याच्या राज्याच्या विस्तार पाहता त्याच्या २०० ठिकाणी नाण्यांसाठी टांकसळी होत्या त्यातील ७० टांकसळी तर निव्वळ चांदीची नाणी पाडायच्या, ज्जे बात काय साला श्रीमंती होती ह्याची......



अशी मस्त मस्त माहिती ह्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते. सर्व भाग संदर्भपूर्ण असून अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर असे हे चार भाग भारतीय संकल्पना व संस्था चिटणीसांनी खूप छान गुंफले आहेत. कमाल बात म्हणजे युद्धाचा "यु" सुद्धा त्यात नसून राजसत्तेची बरोब्बर दुसरी बाजू ह्यामध्ये दाखविली आहे. राज्य चालवण्यासाठी कित्येक गोष्टी असतात त्यातील कित्येक कंगोऱ्यांना ह्यात परामर्ष केला आहे. एकंदरीत इतिहास अभ्यासनासाठी हे भाग फार महत्त्वाचे आहेत. सर्वांसाठी हे पुस्तक घबाड आहे राव !


 

काही महाभागांना इतिहास म्हणजे मडी उकरणे वाटतं, त्यांनी हे भाग वाचायला हवेत मग कळेल की, देशाच्या राज्यव्यवस्थेचा नेमका उगम कुठे आहे ते ! प्रत्येकाने वाचावे असे हे भाग आहेत कारण प्रत्येक भागात एक वेगळा विषय नक्कीच भावेल.




1 comment:

INSTAGRAM FEED

@sagar7960