कर्जत गावापासून साधारणतः १० किमी अंतरावर कोंदिवडे गाव आहे आणि ह्या गावात जाण्यासाठी संपूर्ण रस्ता आजही उल्हास नदीच्या काठावरून गेलेला आहे. तिथे जाताना डाव्या बाजूला ढाक बहिरीचा गड दर्शन देतो तर समोर किल्ले राजमाची दिसायला सुरुवात होते. कोंदिवडे गाव सोडले कि, कोंडाणे गाव आपले स्वागत करते आणि आपण सह्याद्रीच्या पायथ्याला पोहचतो. इथूनच सुरुवात होते त्या आडवळणावरील लेणीच्या पायवाटेची ! इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात हा आविष्कार साकारण्यात आला. सह्याद्रीत कोरलेली भाजे व कोंडाणे ह्या दोन्ही लेणी समकालीन असू शकतात, असा अंदाज अभ्यासकांचा आहे. ह्या लेणीतील चैत्यगृहाची कमान पिंपळाकृती कोरलेली असून दोन्ही बाजूला शिल्पपट आहेत. हि लेणी हीनयानपंथीय आहे. चैत्यगृहातील स्तूप काही प्रमाणात भग्न झाला असून त्या काळातील खांबसुद्धा पूर्णतः पडून गेले आहेत. पुरातत्वाने आता नवीन खांब लावलेले आहेत. गजपृष्ठाकार छत आपले लक्ष वेधून घेते. एकेकाळी लाकडी कोरीव कामाने ह्या भिंती झाकल्या असतील, त्याला जवनिका म्हणतात कारण त्याची साक्ष द्यायला भिंतीत एक रांगेत खोबण्या केलेल्या आढळतात. संपूर्ण चैत्यगृहात अगदी स्तूपाभोवती चापाकार असे त्या काळातील अष्ठकोनी खांबांच्या खुणा इथे आजही पाहता येतात. प्रवेशद्वार कमानीच्या दोन्ही बाजूला असलेल्या शिल्पपटातील युगुले त्यांची वस्त्रप्रावरणे व आयुधे पाहताना नजर खिळून राहते. ह्या शिल्पपटातील स्त्रिया नर्तकी असून त्या योद्धाबरोबर नृत्य करताना दाखवलेल्या आहेत. त्यांची केशभूषा, अलंकार आणि शस्त्र पाहताना त्या काळातील बऱ्याच गोष्टींचा अभ्यास इथे करता येतो तसेच चैत्यकमानीत सागवानी लाकूड आजही सुस्थितीत असून ते सुद्धा किमान दोन हजार वर्षे जुने आहे, भन्नाट आहे हे सर्व !
ह्या चैत्यगृहाच्या अगदी बाहेच्या बाजूला एक रेखीव असा यक्ष कोरलेला आहे. त्याच्या बाजूला तो तयार करून घेणाऱ्याचा ब्राम्ही लिपीतील शिलालेख आजही ठसठशीत आहे. "कन्हस अंतेवासिना बलकेन कतम" असा लेख असून त्याचा अर्थ "कन्हाचा शिष्य बालुक याने हे काम केले" असा होतो. (फोटोत लाल चौकडीत दाखवलेले आहे.) आज त्या यक्षाचे मुख भग्न झाले आहे. त्याचे शिरोभूषण व केशभूषा पाहता ग्रीक आणि रोमन शैलीचा प्रभाव त्यावर जाणवतो. अतिशय देखणा असेल हा यक्ष ! हे तिथे प्रत्यक्ष पाहताना वाटते. अलंकृत लेणीवर गवाक्ष, वेदिकापट्टी आणि अतिशय बारीक नक्षी कोरलेली आहे, इथे मेहनत घेणाऱ्या अनामिक हातांना मनोमन वंदन करावेसे वाटते. ह्या चैत्यगृहाच्या पुढे अनेक विहार व त्यात कक्षसुद्धा आहेत. कक्षात दगडी सोपे असून संपूर्ण विहाराला एकेकाळी व्हरांडा होता जो आज भग्न झाला आहे. पहिल्याच विहारात भिंतीवर स्तूप कोरलेला आहे, ह्यावरून चैत्यगृहातील स्तूप कसा असेल ह्याची जाणीव होते. खालील फोटोत पाहू शकता. शेवटी पाण्याच्या दोन टाक्या आहेत व तिथे कोरलेला विहार हे भोजनगृह असावे, असे वाटते. पहिल्या विहाराच्या दर्शनी बाजूवर दोन ओळींचा पुसटसा ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे जो विहार कोरण्यासाठी मदत देणाऱ्याच्या नावाने आहे. "सिधं बरकस हमयस कुचिकापुतस पाठे" असा असलेल्या शिलालेखाचा अर्थ बरकस येथे राहणारा कुचिकाचा पुत्र हमयक्ष याने विहारासाठी दान दिले, असा होतो. बहुधा बरकस म्हणजे गुजरात मधील भडोच असावे, असा अंदाज इथे करता येतो.
हि लेणी राजमाचीच्या घेऱ्यात आहे. "लेण्यांच्या परिसरात गड व गडाच्या परिसरात लेण्या" हे सूत्र इथे सुद्धा आहे. कल्याणच्या बंदरात उतरलेला माल घाटावर घेऊन जाण्यासाठी कर्जतच्या परिसरात अनेक घाटवाटा निर्माण करण्यात आल्या. त्यातील प्रसिद्ध असा कुसूरचा घाट इथेच असून त्याच्या पायथ्याकडून प्राचीन काळी ढाक बहिरीच्या परिसरातून कोंडाणे लेणीकडे जाता येत असे. इथूनच पुढे 'कोकण दरवाजा' म्हणून ओळख असलेला किल्ले राजमाची काही तासांच्या अंतरावर आहे. तिथून वळवण लेणी व पुढे कार्ले - भाजे लेण्यांच्या जोडीकडे जाता येते. ह्याचा अर्थ हा मार्ग अगदी पुरातन होता आणि ह्याच मार्गावर असलेल्या लेण्या म्हणजे विश्रांतीचे थांबे होते. पावसाळ्यात बौद्ध भिक्षु ह्याच लेणीत विसावत असत आणि म्हणून लेण्यांना "वर्षावास" असे सुद्धा म्हणतात. कोंडाणे लेणी सह्याद्रीतील पहिली लेणी असल्यामुळे दगड खराब असल्याचे ज्ञान बहुतेक त्यावेळी झाले नसेल व प्रचंड पावसाच्या माऱ्याने झीज होऊन सरते शेवटी हि लेणी अर्धवट सोडलेली काही ठिकाणी दिसून येते. तरी सुद्धा शंकेची पाल चुकचुकते आणि मनांत विचार येतो की, आक्रमकांकडून स्तूप भग्न केला गेला कि पावसाने झिजला ? ह्याचा अंदाज येत नाही परंतु जे आज शिल्लक आहे ते मात्र अद्भुत आहे. खालील फोटोत पाहू शकता. ह्याच व्यापारी मार्गावरील घाटावर असलेली कार्ला लेणी प्रसिद्ध आहेच व ह्या लेणीत एका शिलालेखात नहपानचा जावई उषवदत ह्याने भिक्षुसंघाला मामल विषयातील "करजिक" नावाच्या गावाचे दान दिले असा उल्लेख आहे. ह्यातील करजिक म्हणजे कर्जत आहे आणि म्हणूनच पुरातन मार्गावरील हे कर्जत नक्कीच ऐतिहासिक ठरत आहे.
प्राचीन व्यापाराचा विचार करता, कर्जतच्या जवळच कल्याण बंदर होते आणि ह्याच परिसरातून घाटावर जायला विविध घाटवाटा इथे होत्या. ह्याच ऐतिहासिक कर्जत मधून भीमाशंकरला जायला पायवाट आहे आणि आजही वर्षभर तिथूनच ह्या श्रद्धास्थानाला भेट द्यायला लोक ये-जा करत असतात. कर्जत ऐतिहासिक आहे आणि ते जाणून घेण्यासाठी मी फेसबुकवर ऐतिहासिक पाऊलखुणांचे कर्जत हे पेज सुरु केले. ज्यावर बऱ्याच पाऊलखुणांची माहिती अगदी फोटोंसकट देत आहे म्हणूनच ह्या पेजला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
असे हे रायगड जिल्ह्यातील कर्जतची ओळख आज फार्महाऊस सिटी होत चाललेली आहे, ज्याची मुळातच खंत वाटते आणि ह्या पाऊलखुणा आज सर्वांना माहीत व्हाव्यात म्हणून हा लेख प्रपंच !
माझा हा लेख मुंबई आवृत्तीतील तरुण भारत ह्या वृत्तपत्रात दिनांक ५ मे २०१९ आला होता, खालील लिंकवर तुम्ही पाहू शकता.
http://epaper.mahamtb.com/index.php?edition=Mpage&date=2019-05-05&page=8
लेख कसा वाटला हे Comment मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
खूप छान माहितीपूर्ण लेख सागर सर
ReplyDelete