पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : देवगिरीचे यादव
लेखक : ब्रम्हानंद श्रीकृष्ण देशपांडे
प्रकाशन : अपरांत
मूल्य : ₹ २५०/-
देवगिरीचे यादव आणि यादवांचे साम्राज्य ह्या विषयी शोध घेत होतो आणि हे पुस्तक भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या कार्यालयात पुण्यामध्ये विकत घेता आले आणि लागलीच वाचनाचा योगसुद्धा जुळून आला. हे पुस्तक संपूर्णपणे यादव साम्राज्याभोवती फिरत राहते मग ते कसे उभे राहिले आणि त्याचा अस्त नेमका कसा झाला ? ह्यावर भाष्य करते. ह्या राज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले तेव्हा त्यांनी उपभोगले वैभव आणि परराज्यातील राजांविषयी असलेले राजकीय हितसंबंध असं बरंच काही विविध अंगानी ह्यामध्ये मांडलेले आहे.
जेव्हा पासून इतिहास हा विषय श्वास बनला तेव्हा पासून जितक्या चर्चा यादवांविषयी अनेकांशी झाल्या त्या सर्व निष्फळ होत्या, हे मला पुस्तक पूर्ण झाल्यावर जाणवले कारण जो तो फक्त खिलजी आक्रमण आणि रामचंद्राची हार ह्यावरच फोकस करत असे. त्यात पण अमुक किंमतीचे सोने नेले, तमुक किंमतीचे वस्त्र नेले असे कित्येक इमले रचून उगाच काहीही फेकत असत. असो ! निदान आता तरी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून स्वतःला ते सर्व clear झाले ह्याचा आनंद आहे.
प्रत्येक पुस्तकात भावणारी प्रकरणं असतात ह्यातील मला भावणारे प्रकरण म्हणजे "हेमाद्री आणि बोपदेव" हे प्रकरण ! अहाहा काय बुद्धिमान आहेत हे दोघेजण ! वैचारिक श्रीमंती म्हणतात ना, ती ह्या दोघांनी रचलेली ग्रंथसंपदा म्हणता येईल, निव्वळ भन्नाट आहेत. त्या काळातील विचार करता, एकंदरीत आपला महाराष्ट्र वैभवाच्या शिखरावर होता आणि त्याला निव्वळ कारण म्हणजे यादव साम्राज्य ! हे नाकारता येणार नाही आणि अशा ह्या शांततामय वातावरणातच तर कलाकृती साकारल्या जातात ज्या आपण यादवांनी दान केल्या मंदिर स्थापत्यात पाहू शकतो पण दृष्टही लागतेच आणि झालेही तसेच खिलजी नावाचा इस्लामी अजगराने हे सर्व गिळंकृत केले. तो इतक्यावरचं थांबला नाही तर रामचंद्राची कन्या जेठाई हिला सुद्धा घेऊन गेला, इथे मात्र चटका लागतो.
ह्या पुस्तकात यादवांविषयी अनेक घटना आणि त्यांच्या त्यावेळी केलेल्या नोंदी दिलेल्या आहेत व लेखकाने सरते शेवटी त्यांना काय वाटते हे सुद्धा दिले आहे. जेणे करून आपले मत तयार व्हायला मदत होते. ह्या पुस्तकाची भाषा किचकट आहे. त्यामुळे ज्यांना कादंबरी वाचायची हौस आहे, त्यांना डोकेदुखी ठरेल पण ज्या इतिहास अभ्यासकांना शिवपूर्वकालीन महाराष्ट्र अभ्यासायचा आहे त्यांच्या संग्रही हे पुस्तक मोलाची भूमिका करेल.
No comments:
Post a Comment