३० एप्रिल २०१७ हा दिवस खास होता. अंबाबाईच्या दर्शनासाठी दरवर्षी प्रमाणे कोल्हापूरला गेलो आणि यावेळी मनांत मात्र काहीतरी नवीन बघायचे म्हणून खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर बसले होते. जे पाहायचे नक्की केले होते. ऐतिहासिक वास्तूचे नाव माझ्या मुखातून जेव्हा निघते, त्यावेळी माझ्या घरातील लोक लगेच तिथे जाण्यासाठी तयार होतात. हेच इतिहासाच्या बाबतीत माझ्यासाठी खूप महत्वाचे प्रोत्साहन ठरते.
कोल्हापुरातून ६० किमी अंतरावर, कृष्णेच्या काठावर वसलेले आणि कर्नाटक सीमेवर असलेले हे खिद्रापूर कोणे एकेकाळी “कोप्पद किंवा कोप्पम” या नावाने प्रसिद्ध होते. खिदरखानाने स्वारी केली आणि त्याने या गावाचे नाव खिद्रापूर केले. या गावाची ओळख म्हणजे तिथे असलेले अतिप्राचीन कोपेश्वर आणि जैन मंदिर ! फार कमी लोकांना परिचित असलेले हे ठिकाण नरसोबाच्या वाडीपासून अवघे ११ किमी आहे पण फार कमी लोक तिथं पर्यंत जातात. बहुतेक लोकांना माहितसुद्धा नाही. नरसोबाच्यावाडीला असलेले फाईव्ह स्टार भक्त निवास इथे नाहीत पण फाईव्ह स्टार कलाकृतीला लाजवेल अशी शिल्प मात्र तिथे हजारो आहेत. कृष्णेच्या काठावर आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेले हे टुमदार गाव निसर्गसंपन्न आहे. या गावातील दोन्ही मंदिरे आज पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
इ.स. ७ व्या शतकात चालुक्यांमधील पुलकेशी द्वितीय राजाने सुरु केलेले हे बलाढ्य बांधकाम १३ व्या शतकातील यादव सम्राट श्रीसिंघणदेव राजाने जीर्णोद्धार करून पूर्णत्वाकडे नेले. मंदिर उभारणी ते जीर्णोद्धार या मध्ये ६०० वर्षांचे अंतर आहे. या वरून या मंदिरावर किती शिल्प असतील आणि त्याच्या सौंदर्याची प्रचिती येते. या मंदिराची स्थापत्यशैली दक्षिणेकडील हळेबीडुशी साम्य दर्शवणारी आहे.
खुरशिलेच्या वरती गज आणि विविध व्याल शिल्पांनी सजलेली संपूर्ण मंदिराच्या जोत्यावर असलेली शिल्पपट्टी, त्यामध्ये प्रत्येक हत्तीवर आपल्या देवदेवता आरूढ आहेत. समोर उभा असलेला होममंडप, पुढे सभामंडप आणि शेवटी गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. आतील सर्व स्तंभरचना पाहून, हे कसे रचले असतील ह्या विचाराने थक्क व्हायला होते. आपल्या महाराष्ट्रातील हे शंकराचे मंदिर जरी असले तरी इथे कुठेही नंदी दिसत नाही. शिवलिंगाच्या बाजूला फक्त उभा शाळीग्राम असून त्याला धोपेश्वर म्हणतात. गर्भगृहात कमनीय बांधा असलेले १८ सौंदर्य लतिका पूजेचे साहित्य घेऊन उभ्या आहेत, पण दुर्दैवाने आज त्यांचे चेहरे व हात भग्नवस्थेत जरी असले तरी सुद्धा त्यातील शिल्पकला मनाला भावते. बेसॉल्टमध्ये असलेल्या या लतिका (खालील फोटोत) पाहून कठीण दगडातसुद्धा सौंदर्याचा साक्षात्कार होतो. इतकी प्रगल्भता ह्या मंदिरावरील शिल्पांत आहे.
मंदिराच्या बाहेरील बाजूस पायथ्यापासून कळसापर्यंत संपूर्णतः शिल्प कोरलेली आहेत. पत्रलेखिका, शुकसारिका, दर्पणसुंदरा, विषकन्या, नागशिल्प, मैथुनशिल्प, स्त्रीवादक, भोंगळा वादक, देवकोष्ठ, नारपट्ट खुरशिला आणि मर्कट त्रास देताना त्याला हात उगारून मारण्यासाठी असलेले शिल्प निव्वळ अप्रतिम आहेत. हे सर्व पाहत असताना हि प्रगल्भ शिल्पकला मनात घर करून राहते. हे मंदिर उभारण्याचे काम सुरु असताना विविध देशातील राजांनी बलाढ्य पुलकेशी राजाला नजराणा पाठवून मैत्रीचे नाते घट्ट केले होते. पुलकेशी राजाबद्दल सामर्थ्य आणि सद्गुणाचे गौरवोद्गार त्याकाळी आलेला चिनी प्रवासी युवन श्वांगने काढले, जे त्यावेळी लिहून ठेवले आहेत. इराणचा राजा खुश्रो दुसरा याने सुद्धा पुलकेशी राजाला नजराणे पाठवले होते. नेमके त्याचवेळी कोपेश्वर मंदिर बांधणारा स्थापत्य विशारद तेव्हा दरबारात हजर होता आणि म्हणूनच या प्रसंगाची आठवण म्हणून इराण आणि आखातातील व्यक्तीशिल्प तिथे कोरलेली आढळतात. मनापासून केलेली मेहनतीत सौंदर्य खुलते, त्याचा साक्षात्कार इथे होतो. जीव ओतून तयार केलेली हि शिल्प जिवंत असल्याचा भास होतो.
नगारखान्यातून आत गेल्यानंतर मंदिराचा होममंडप पूर्णतः गोलाकार आहे. (वरील फोटोत पाहू शकता.) विविध स्तंभांची रचना आणि त्यावर गोलाकार ठेवलेल्या शिळा लक्ष वेधून घेतात. होम-हवन केल्यानंतर धूर जाण्यासाठी वरती मोकळे ठेवले आहे. त्यातून आकाश पाहणे म्हणजे स्वर्गप्राप्ती आहे आणि म्हणूनच या दगडी मंडपाला स्वर्गमंडपससुद्धा म्हणतात. हे मंदिर एकदा पाहून मन भरण्यासारखे नाही. या शिल्पांचा व मंदिराचा इतिहास आपल्याला माहित असेल तर पूर्ण दिवस सुद्धा कमी पडेल, असे हे मंदिर आहे. शिवलिंगावरील अभिषेक केलेले पाणी बाहेर जाण्यासाठी जसे आपल्या सर्व मंदिरांना गोमुख असते त्याच प्रमाणे इथे मात्र पूर्ण मगर कोरलेली असून तिच्या मुखातून हे पाणी तारकाकुंडमध्ये पडते. ह्या कुंडाची रचना चांदणी सारखी आहे. इथे असलेली एकूण एक शिळा तिचे वेगळे अस्तित्व मांडते. येथील दगड हा फक्त दगड नसून देवत्व प्राप्त झालेला, झुंजलेला आणि स्फूर्ती देणारा अखंड स्रोत आहे. आज मगरीचे मुख भग्न झाले आहे. तारकाकुंड मात्र तुम्ही खालील फोटोत पाहू शकता.
निसर्गाने सुद्धा इथे भरभरून दिले आहे. विस्तीर्ण अशी बरीच वडाची झाडे या मंदिराभोवती असून त्यावर येणाऱ्या फळांचा क्रम सुद्धा ठरलेला आहे. जेव्हा एका झाडाला फळे येतात तेव्हा बाकी झाडे रिकामी असतात. एकाचा बहर ओसरला कि, दुसऱ्याचा चालू होतो. त्यामुळे इथे बारा महिने वडाला फळ येत असतात म्हणूनच वटवाघळे आणि पक्ष्यांना हे हक्काचे ठिकाण आहे. पालवीचे सुद्धा तसेच आहे. क्रमाक्रमाने येथील वडाच्या झाडांना पालवी येत असते, आहे कि नाही निसर्गाचा आविष्कार !
ह्या मंदिराच्या जवळच कृष्णा नदी वाहते, तिच्या पलीकडे दक्षिण मोहिमेवर असलेल्या औरंगजेबाची छावणी पडली होती म्हणून त्या गावाला शहापूर म्हणतात. त्याचवेळी या मंदिराला उपद्रव झाला आणि या सौंदर्याने भरलेले हे मंदिर या इस्लामी वावटळीत सापडले आणि जे काही वाचले ते आज आपल्या समोर आहे.
असे हे मंदिर फक्त मंदिर नाही तर विविध शिल्पांनी नटलेले, झुंजलेल्या पराक्रमाची साक्ष देणारे स्फूर्तीचे ठिकाण आहे. कधीतरी नक्की पहावी, अशी हि मुकं वास्तू आहे. कधी कोल्हापुरात गेलात तर नक्की इकडे पावले वळवा कारण पृथ्वीवरील स्वर्ग ह्यापेक्षा दुसरा असू शकत नाही.
काही फोटो इथे देत आहे, जेणे करून अजून काही गोष्टी व्यवस्थित समजतील.
१) अफगाण राजाने पाठवलेल्या नजराण्याची आठवण म्हणून हे अफगाण राजाचे शिल्प खालील फोटोत !
२) इराणचा राजा खुश्रो दुसरा याने पुलकेशी राजाला नजराणे पाठवले होते. त्या प्रसंगाची आठवण म्हणून व्यक्तीशिल्प तिथे कोरलेले आहे. खालील फोटोत ते पाहू शकता.
३) देवकोष्ट
४) पत्रलेखिका
५) विषकन्या
ह्याच गावात अशाच प्रकारचे समकालीन असलेले जैन मंदिरसुद्धा आहे, त्याचा विस्तार जरी छोटा असला तरी कोरीव शिल्प मात्र डोळ्यांचे पारणे फेडतात तर अशी हि भन्नाट लोकांची भन्नाट शिल्पकलेला नक्की भेट द्या.
हा माझा लेख तरुण भारत या वर्तमानपत्रात आडवळणावरील स्वर्ग अशा विषयाने दिनांक ८ जुलै २०१७ ला प्रसिद्ध झाला होता. त्याचा फोटो खालीलप्रमाणे….
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment