टाटायन - गिरीश कुबेर

 





पुस्तक परीक्षण


पुस्तकाचे नाव : टाटायन


लेखक : गिरीश कुबेर


प्रकाशन : राजहंस


मूल्य : ५००/-



हि गाथा आहे, शून्यातून विश्वनिर्मिती करणाऱ्या टाटांची !



तरुणपणात प्रत्येकाला आपल्या आयुष्याची सुरुवात, नोकरी अथवा धंद्यात करावीच लागते त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे कारण हे थेट आपले मार्गदर्शक बनू शकते इतकी ताकद त्यात आहे, हा झाला पुस्तकाचा गाभा तर बाहेरून म्हणाल तर उत्कृष्ट बांधणी, टाटांच्या मनासारखे शुभ्र कव्हर आणि त्यावर रॉयल ब्लू मध्ये जमशेदजींचे बोधचिन्ह ! म्हणजे पाहता क्षणीच हा ग्रंथ मनात भरतो. जसं बाहेर पोलादी चिन्ह आहे तेवढ्याच जोडीची भाषा टाटांच्या साम्राज्याची उकल करताना लेखकाने हळुवारपणे गुंफली आहे.



हे पुस्तक अफलातून आहे कारण आज सगळीकडे असलेल्या Negative वातावरणात एखादी सुखद फुंकर घालून देते. फक्त ती सांगड आपल्याला घालता यायला पाहिजे बस् ! एखादा उद्योग उभा राहताना त्यात सरकार आणि राजकीय मंडळी किती त्रास देतात आणि वेळेला सदृढ अवस्थेत पोहचलेला हा उद्योग एका फटक्यात गिळंकृत सुद्धा केला जातो, Air India च्या बाबतीत तेच झाले. तरी सुद्धा कितीही संकट आली तरी तोंड देत उभा राहीन मी ! ह्या उक्तीला न्याय देतात JRD टाटा ! आणि मग सुरु होतो नवनव्या विश्वाला गवसणी घालणारा प्रवास ! मी मध्यंतरी वाचले होते "संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनीही बडी होगी" बस् इथे ते १००% लागू होते. कारण गुलाब आवडणारा चाचा मग नव्याने आलेले इंदिरा बाईंचे सरकार त्यानंतर देसाई सरकार बापरे किती आडकाठी केली आहे ह्या मंडळींनी त्यात बाकीचे लाल दिव्याचे बागडबिल्ले वेगळे ! तरीही JRD ढळत नाहीत. हे सर्व वाचताना प्रत्येक क्षण आपल्या डोळ्यासमोर लेखक उभा करतो. मग वाटून जाते आपल्या आयुष्यातील संकटं किती छोटी असतात ! अफलातून आहे सर्व हा लेखाजोगा....



गिरीश कुबेर लिखित वाचायला घेतलेले माझे हे दुसरे पुस्तक ! ह्या आधी मी त्यांचे पुतीन वाचले होते तेव्हाच त्यांच्या लेखणीची धार लक्षात आली होती त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता “टाटायन” मागवून घेतले आणि खजाना वाचून रिता केला. मी पहिला जॉब टाटामध्ये केला होता साहजिकच शिस्त तेव्हा लागली,  ती आजही कायम आहे. अगदी ऑफिसमध्ये पेपर कसे ठेवावेत ? तसेच सेट करताना त्यांना स्टेपलर कुठे मारावा ? ऑफिसमध्ये कसे वावरावे ? तिथून ते आपली ये-जाता खुर्ची कशी ठेवावी ? ह्या सर्वांची सवय म्हणजे टाटांचे संस्कार ! ज्यांची आठवण आजही येते.



एका बाजूला देश जेव्हा स्वातंत्रसमर मध्ये झुंजत होता तेव्हा हाच देश आर्थिक बाजूने घडवण्याचे काम टाटा करत होते. "नफा" ह्या शब्दाला आजही टाटांच्या लेखी विशेष किंमत नाही. आपला देश नवनवीन technology मध्ये कसा अग्रेसर राहील त्यासाठी टाटा वाट्टेल ते करतात आणि ह्याचा प्रत्यय येतो जेव्हा संपूर्ण भारतीय बनावटीची टाटा इंडिका कार आपल्या समोर येते. तर पश्चिम बंगाल मधून एका राजकीय बाईच्या हट्टापायी जेव्हा तो प्रांत सोडून जावे लागते तरी सुद्धा टाटा नॅनोची किंमत वाढवली जात नाही कारण तेव्हा रतन टाटा म्हणतात, “शब्द दिला म्हणजे दिला” म्हणून टाटा आज “उपभोगशून्य स्वामी” आहेत, ते उगाच नव्हे आणि मग वाटून जाते टाटा म्हणजे खरे उद्योगपती आणि बाकी सगळे फक्त विस्तारित व्यापारीच....



Motivational वाचायची आवड असणाऱ्यांसाठी हा ग्रंथ घबाड आहे आणि बाकीच्यांसाठी नवनवीन कल्पना सत्यात कशा उतरवायच्या ह्याचे गमक आहे. So सर्वांसाठी बरंच काही देणारे हे साहित्य प्रत्येकाच्या संग्रही हवेच असे हे टाटायन प्रत्येकाने वाचावे. 

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960