पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : सिंधुतील साम्राज्ये : एका नदीची कहाणी
लेखिका : Alice Albinia
मराठी अनुवाद : श्याम नारायण पाठक
प्रकाशक : इंडस सोर्स बुक्स
मूल्य : ₹ ४९९/-
हे पुस्तक, नाही नाही हा ग्रंथ आहे आणि तो ह्या आधी काही दुकानात दिसला होता पण घेऊ की नको ? ह्या दोलायमान स्थितीत मी घेतले नव्हते पण नक्की काय असेल ? ह्या curiosity मध्ये पुन्हा कधी मिळाले तर नक्की घेऊ म्हणून हा विषय ज्वलंत ठेवला, शेवटी हा ग्रंथ मला कोल्हापूरमधील मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये मिळाला. सर्वात पहिले ह्या ग्रंथाच्या लेखिकेला Alice ला एक कडक सलाम ! आता पर्यंतच्या आयुष्यात खूप जणांचे प्रवासवर्णन वाचले पण सर्वोत्तम प्रवासवर्णन म्हणून हेच आहे.
सर्वात आधी दोन प्रकरणं ही आपली भळभळती जखम फाळणी भोवती फिरतात आणि मग सुरू होतो, सिंधूच्या किनाऱ्यावर नेमके कोणाचे साम्राज्य होते ? पण जसं जसं वाचत गेलो तेव्हा अनेक साम्राज्ये फेर धरून आपल्याभोवती नाचत होते. Alice ने जो प्रवास केला आहे ना, तो थक्क करणारा आहे. वेडी माणसं इतिहास घडवतात हो ! हो ! आणि वेडी माणसंच अशा ध्येयाच्या मागे झंजवतासारखा प्रवास करतात. अलेक्झांडर हा भाई १८००० किमी प्रवास करून आला होता आणि ही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत सिंधुचा उगम शोधत होती. २९ डिसेंबरला मी माझ्या मित्रांसोबत उल्हास नदीच्या उगमापासून ते कर्जतच्या कोंडाणे लेणी पर्यंत नदीच्या काठावरून तब्बल २२ किमी अंतर एकाच दिवसात तुडविले होते. त्यामुळे नदी काय चीज आहे, हे ओळखून होतो त्यात हा लय मोठ्ठा पराक्रम वाटला होता पण ह्यात Alice दिवसाला ४० किमी अंतर तुडवत आहे, कमाल आहे राव हिची ! वयाच्या २९व्या वर्षी हिने हा भीमपराक्रम केला आहे आणि हे सर्व इत्नभूत ह्यात वाचता येते. लिखाणाची खुमासदार शैली आहे त्यामुळे कुठेही आपण वाचतोय असे वाटत नाही, प्रत्येक प्रकरणात Alice बरोबर आपण फिरतोय असे वाटते. भन्नाट निव्वळ भन्नाट कलाकृती आहे ही ! कारण साधारणतः बाकी पुस्तकं पुरातनाकडून आजच्या काळात आपल्याला आणतात पण मी पहिल्यांदा असे पाहतोय की, हे पुस्तक आपल्याला आजच्या काळातून ते पुरातनाकडे घेऊन जाते.
Alice चा प्रवास सिंधू नदीच्या उगमाच्या शोधानिमित्त आहे, ती पहिल्यांदा पाकिस्तान - अफगाणिस्तान - चोरटी मार्गाने पाकिस्तानमधील वजीरीस्तानात - अफगाणिस्तान - पाकिस्तान - भारत - पाकिस्तान - भारत - चीन - तिबेट काही ठिकाणी ही ४००-५०० किमी चालत फिरली आहे, हुश्श.... इथेच माझी दमछाक झाली म्हणून Alice ला पुन्हा सलाम ! ह्या प्रवासवर्णनात काही भन्नाट प्रसंग तिने गुंफले आहेत, जे वाचायला मजा येते राव ! Alice स्वतः इथिओपियन शिद्दींचा अभ्यास करण्यासाठी पाकिस्तानमधील बादीन नावाच्या गावात राहिली होती तेव्हा ज्या कुटुंबात ती राहिली ते ४४ लोकांचे कुटुंब होते त्यात तीन सख्खे भाऊ कुटुंबप्रमुख होते पण त्यांची आडनावे वेगवेगळी होती त्याला कारण होते, ज्यांनी ज्यांनी त्यांना गुलाम म्हणून इथे आणले त्यांची आडनावे त्यांनी धारण केली होती, गम्मत आहे राव !
ह्या पुस्तकात मुसाफिर बाबाची कथा आहे, ह्या बाबाचा जन्म झाला तेव्हा त्याचे पप्पा ८६ वर्षांचे होते. बरं असो ! तर ह्या प्रकरणात ह्या बाबाचा गुलामीचा प्रवास आहे त्यात त्याची लग्ने आणि ३० पोरं आणि त्यात पण एकच जगलं पण हा बाबा त्या सिंध प्रांतातील महापुरुष होता, ही त्याची दुसरी बाजू आहे. ह्या महापुरुषाने २५ पुस्तकं लिहिली व काही नोंदी त्याकाळी त्यामध्ये केल्या, गुलामांचा छळ किती भयानक केला जात असे वगैरे वगैरे खरं तर माझ्या अंगावर हे वाचताना काटा आला पण त्यात एक ओळ आढळली जी आपल्या माणसांचा अभिमान दाखवते, ती म्हणजे "हिंदू व्यापारी मालक आपल्या गुलामांना सौजन्याची आणि दयाळूपणाची वागवणूक देतात."
ह्यात एक नवीन माहीती मिळाली, पाकिस्तानमध्ये ४५० एकरीच्या वर जमीन असणे हा गुन्हा आहे. सगळ्यात भारी म्हणजे पश्तून लोकांना मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त रस असतो. लय हसलो राव ! लेखिकेने संदर्भासहित बेधडकपणे विधानं केली आहेत आणि काही ठिकाणी तर पाकड्यांच्या वरात पण काढली आहे खास करून कारगिल विषयावर पाकड्यांच्या छावणीत तिने ह्या येड्यांना वैचारिक चोप दिला होता. ह्या पुस्तकात तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेले अनेक पात्र आहे, ते आपल्याही ओळखीचे झाले आहेत राव ! त्यात सज्जान, तिच्या बरोबर ४०० किमी अंतर तुडवणारा अस्लम, ३६० पेक्षा जास्त पुस्तकं आणि त्यातील काही पुस्तकं "आंबट" विषयावर लिहिणारा खुशाल खान खटक, तिबेट मध्ये भेटलेला युज्जा, सोनमतेरिंग आणि कर्मा लामा ह्या नेपाळ्याचे घर एका नदी जवळच्या उकिरड्यावर होते आणि तो Alice चा दुभाषा होता, ह्याच्या घराचे वर्णन करताना ती म्हणते, त्याची खोली अशी दिसत होती कि, समोरचा कचऱ्याचा ढीग आताच त्याच्या खोलीत नाचून, मग पुढे जाऊन बसला असेल.
सरते शेवटी सिंधूच्या बाबतीत तिबेटमध्ये चिन्यांनी केलेल्या प्रताप पाहून ती ओक्साबोक्शी रडली राव, इथे मात्र touching आहे, म्हणजे तिच्या बरोबर संपूर्ण प्रवास करताना मला मजा आली पण शेवटी शेवटी मात्र भावनिक झालो मी ! नदी..... नदी आहे तिला बंदिस्त नाही करता येत सिंधू लांब राहिली इथे माझ्या उल्हास नदीची अवस्था पाहून आजही डोळे भरतात ! निसर्गावर अत्याचार करूनच विज्ञान लय पुढे गेले आहे, काय बोलणार.....
....आणि मग वाटतं, दोन्ही देशात जसे सिंधूचे पाणी एकच आहे तसे दोन्हीकडील सैन्याची भाषासुद्धा एकच आहे. होरपळतोय सामान्य माणूस......
चला तर मग पुस्तक खास आहे. माझ्या मते, ज्याला खास खास प्रवासवर्णन आणि भन्नाट इतिहास वाचायची आवड असेल त्यांनी बिनधास्त घेऊन हौस फिटवावी कारण हिच्या लिखाणाला संदर्भ आहे, अलंकारिक असे काहीही नाही.
No comments:
Post a Comment