अगाध कलाविष्काराचा उगम - भाजे लेणी

अचानक झालेला बेत संस्मरणीय ठरला. आदल्या रात्री ओंकारला सांगितले आणि सकाळीच भाजे लेणीला जाण्यासाठी तो हजर झाला, वेळेत निघालो मस्त धुकं आणि ऊन यांच्या पाठशिवणीच्या खेळात राज्य बोरघाटावर होते आणि ह्या दोघांना शोधायच्या प्रयत्नात तो मात्र हरवला होता. साहजिकच त्याची मजा बघत आम्ही दोघांनी वडापावावर ताव मारला आणि लागलीच निघालो भाजे लेणीकडे ! आमच्या नशिबाने आज घाट तुंबला नव्हता, हे आमचे भाग्यच !


लोणावळ्याजवळील मळवली स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर भाजे लेणी आहे. कार्ले-भाजे अशी जोडगोळी असलेला हा लेणीसमूह इतिहासात बऱ्याच गोष्टी उलगडतो. साधारणतः बोलताना आपण पटकन कार्ले-भाजे बोलतो परंतु दोन्ही लेण्यांमध्ये बरंच अंतर आहे. दोघांच्या मधून मुंबईपुणे जुना राष्ट्रीय महामार्ग गेला असून त्याला समांतर असा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गसुद्धा गेलेला आहे. दोन्ही लेणी समूहात कार्ले लेणी जास्त प्रसिद्ध असून तिथे एकविरा देवीचे मंदिर आहे त्यामुळे तिथे भक्तांचा सतत राबता असतो. जुन्या महामार्गावरून मुंबईला जाताना उजव्या बाजूला वळल्यावर कार्ले लेणीत आपण पोहचतो तर त्याच मार्गावरून डाव्या बाजूला वळलो कि, थेट आपण अगाध कलाकृतीने सज्ज असलेल्या भाजे लेणीकडे जातो. ह्या लेणी समूहातून किल्ले विसापूर किल्ले लोहगड अशी घाटाची रक्षण करणारी जोडगोळी पाहणे म्हणजे अविस्मरणीय सोहळा आहे. मूळ रस्त्यापासून पायरी मार्ग आहे. पुरातत्व विभागाने उत्तम पायऱ्या बांधल्या असून दमछाक होता आपण १० मिनिटांत भाजे लेणीत पोहचतो आणि काही क्षणातच प्रवासाचा क्षीण दूर होतो. महाराष्ट्रातील हीनयान पंथातील ह्या चैत्यगृहाच्या अभ्यासावरून सर्वात जुनी लेणी म्हणून भाजे लेणी प्रसिद्ध आहे तसेच इतकी मोठी लेणी कुठेही नाही कारण ह्या लेणीमध्ये एक चैत्यगृह असून १७ विहारांमध्ये ६३ खोल्या आहेत त्यामध्ये ७२ दगडी सोपे आहेत. इथे तब्बल १५ स्तूप आहेत. एक स्तूप अध्यात्मिकेसाठी असून छोट्या छोट्या १४ स्तूपांचा एक संच एका बाजूला लेणीमध्ये आहे. पाच आत तर नऊ बाहेर अशी त्यांची मांडणी आहे. अध्यापनासाठी असलेले भिक्षु कालांतराने इथे निवर्तले म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे स्तूप इथे बांधण्यात आले. त्यातील काही स्तूपांवर पाली भाषेत आंपिनिका, धम्मागिरी संघधीना अशी काही नावं कोरलेली आहेत तसेच त्यावर काही शिलालेखसुद्धा आहेत, जे आज अस्पष्ट दिसत आहेत. तिथे राहणाऱ्या भिक्षुकांसाठी भल्या मोठ्या अशा सहा पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. तब्बल ४०० वर्ष इथे बौद्ध भिक्षु राहिले, असे तज्ञांचे मत आहे.




इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात ह्या लेणीची निर्मिती केली गेली. हीनयान पंथातील लोकांनी हि लेणी कोरली. त्या काळी कार्ले लेणी मूळ कार्यालयासाठी तर भाजे लेणीचा उपयोग अभ्यासकेंद्रासाठी केला गेलाप्रवेशद्वारातून आत गेल्यावर पहिले चैत्यगृह दिसते. चापाकर पद्धतीची रचना असलेले हे गृह २७ खांबावर तोललेले आहे. ह्या चैत्यगृहात स्तंभांची रचना ग्रीक रोमन पद्धतीची आहे तसेच छतामध्ये असलेल्या लाकडी तुळ्यावरधमभाग पसादोअशी अक्षरे कोरलेली आहेत. त्यावरून धर्मभाग नावाच्या एका गृहस्थाने हि लेणी कोरण्यासाठी दान दिले होते, असे अभ्यासक म्हणतात. काही खांबांवर नक्षीकाम केलेले असून स्त्री आभूषणं कोरलेली आम्हांला आढळली. आजूबाजूला संपूर्णतः विहार आहेत. त्यातील शांतता आजही मनाला भावते. साधारणतः दुमजली विहारांमध्ये प्रत्येक खोलीत एक बेडसदृश्य आसनव्यवस्था आहे, ज्याला दगडी सोपे असे म्हणतात. ते पाहिल्यावर ट्रेनमध्ये असलेली आसनव्यवस्था आपल्याला आठवते. प्रत्येक विहारांमध्ये त्याकाळी धर्मप्रसारक बौद्ध भिक्षु अध्यापनासाठी राहत असत तसेच त्यांची तहान भागवायला इथे पाण्याची टाके कोरलेली आम्हांला दिसली. काचेलासुद्धा लाजवेल अशी त्या पाण्याची नितळता होती. ह्या लेणीच्या एका कोपऱ्यावर एक मोठी खोली खोदलेली असून त्यातसुद्धा पाण्याचे टाके आहे. हि खोली त्याकाळी जेवण बनवण्यासाठी वापरली जात असे, असे इथे अभ्यास केल्यावर जाणवले. संपूर्ण लेणी अफलातून आहे. गवाक्ष आणि रेखीव शिल्पांनी नटलेली हि लेणी आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देत असते. इथे तबला वाजवणाऱ्या स्त्रीचे शिल्प असून ह्यावरून दोन हजार वर्षांपूर्वी तबल्याच्या शोध भारतात लागला, हे सिद्ध होते तसेच आजूबाजूला नर्तकी आणि मिथुनशिल्पसुद्धा आहेत. एका यक्षिणीचे शिल्प इथे लक्ष वेधून घेते. काही विहारांमध्ये जाल वातायन म्हणजे हवेसाठी आरपार भोकं असलेली खिडकी असून, ते पाहताना आश्चर्य वाटत राहते. दुमजली असलेल्या ह्या विहारांमध्ये पहिल्या मजल्यावर गॅलरीसदृश्य व्हरांडासुद्धा आहे. विहारांच्या बाहेर स्नानगृहाचे अवशेष आज पाहायला मिळतात. पावसाचे डोंगरावरून वाहत आलेले पाणी कोणत्याही टाक्यांमध्ये जाऊ नये ते पाणी दूषित होऊ नये म्हणून लेणीच्यावर पन्हळ खोदलेली दिसून येते तसेच सर्व पाणी एका बाजूला खाच सदृश्य कोरलेल्या पन्हळीतून टाक्यांच्या बाजूने बाहेर सोडलेले दिसून आले. ह्या सर्व गोष्टी २००० वर्षांपूर्वी केलेल्या आहेत, या वरून त्यावेळी त्यांची पर्यावरणपूरक दूरदृष्टी दिसून येते.



ह्या लेणी समुहात सूर्यलेणी अतिशय उत्तम आहे. शिल्पशास्राच्या दृष्टिकोनातून एक उत्तम नमुना म्हणून ती पाहणे म्हणजे अभ्यासकांसाठी पर्वणीच असते. ह्या लेणीच्या प्रवेशद्वारावर शस्त्रधारी द्वारपाल असून त्यांची सालंकृत वेशभूषा म्हणजे शिल्पशास्त्राचा अप्रतिम नमुना ! तसेच बाजूला एक रथ कोरलेला आहे, त्याला सुर्यदेवाचा रथ असे म्हणतात म्हणून ह्या लेणीला सूर्यलेणी म्हणत असावेत. त्या रथात दोन स्त्रिया दाखवलेल्या असून एकीने छत्र तर दुसरीने चामर पकडलेले आहे तसेच रथाखाली एक राक्षस तुडवला जात आहे. दोन स्त्रिया म्हणजे संज्ञा छाया आणि असुर म्हणजे राहू आहे, असे स्थानिक मानतात पण हे सर्व पाहताना आम्हांला ग्रीकांचाहेलिओसतर रोमनांच्याअपोलोदेवतेचा भास त्यात होत होता.


ह्या लेणीच्या भिंतीवर वन्यप्राणी, पौराणिक प्रसंग तसेच छोटे छोटे स्तूप नक्षीकाम म्हणून कोरलेले आहेत. अतिशय सुरेख कोरीवकाम असलेली हि लेणी दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेली आहे. ह्यावर आश्चर्य वाटत राहते. हि लेणी पाहताना त्या काळचे स्थापत्य, संगीत, वस्त्रे, प्रावरणे, आभूषणे, शृंगार आदी कितीतरी गोष्टींच्या स्वरूपाचा बोध यांमुळे होतो. अशी लेणी एकदा तरी पहावी म्हणून हा लेखप्रपंच !


माझा हाभाजे लेणीलेख डिसेंबर रविवार या दिवशी तरुण भारत ह्या वर्तमानपत्रात आला होता, जो तुम्ही खालील लिंकवर टिचकी देऊन वाचू शकता.

 

http://epaper.mahamtb.com/epaper.aspx?lang=2026&spage=Mpage&NB=2017-12-03#Mpage_8

 


गोव्यातील गोवन वार्ता ह्या प्रसिद्ध वर्तमानपत्रात शुक्रवार, दिनांक २ फेब्रुवारी २०१८ ला सौंदर्यशाली भाजे लेणी ह्या नावाने प्रकाशित झाला होता. जो तुम्ही खालील लिंकवर टिचकी देऊन वाचू शकता.


http://epaper.thegoan.net/m5/1527786/Goan-Varta/Govan-Varta#page12/12/1




काही फोटो जोडत आहे जे लेख अधिकरीत्या समजावतील.


 स्तंभावरील स्त्री आभूषणं….




सूर्य लेणीचा द्वारपाल



हजारो वर्षांपूर्वीचा लाकडी ढाचा….



 स्तुपांचा संच



सूर्यलेणी




मंडळी ! लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.

 
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीनुसार लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.

 
© सागर माधुरी मधुकर सुर्वे

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960