पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव : नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी
लेखक : डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मूल्य : ₹ १४०/-
ते साल होते २००१ लादेनच्या टीमने विमानं अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये घुसवली आणि पत्त्याप्रमाणे ती इमारत जमीनदोस्त केली. तेव्हा मी नववीला होतो. आमच्या क्लास टीचर गडणीस मॅडमचा एक अलिखित नियम होता. तास सुरू व्हायच्या १० मिनिटं आधी एका आंतरराष्ट्रीय बातमीवर चर्चा करायची. त्याप्रमाणे मी लादेनची बातमी सांगितली आणि एकाने त्यालाच जोडून नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी खरी ठरली म्हणून सांगितले. तेव्हा ह्या भाईचे नाव पहिल्यांदा ऐकले आणि त्याच दिवसाच्या मधल्या सुट्टीत माझा मित्र केदार आणि मी वाचनालयात गेलो आणि "त्याची" चौकशी केली तेव्हा "हा" एका कोपऱ्यात आम्हांला दिसला पण त्या काळात वाचनाची विशेष आवड नसल्यामुळे फक्त त्याच्या बरोबर स्मितहास्य केले आणि त्याच्याशी वरवर ओळख करून आम्ही निघून गेलो पण तेव्हा पासून ह्याच्या प्रेमात मी होतोच ! मध्यंतरी ओंकार आणि मी ठाण्यात पुस्तकं आणायला गेलो होतो आणि पुन्हा ह्याची भेट झाली लागलीच माझ्या पुस्तकांच्या कॉलनीत one bhk त्याला दिला आणि दोन बैठकीत मीटिंग करून त्याला समजून घेतला, भन्नाट आहे हा !
सन १५०३ ते १५६६ असा नॉस्त्रादेमसचा कार्यकाळ ! त्यात १५४७ ते १५६६ हा सुखाचा काळ आणि ह्याच काळात Centuries ग्रंथाची कलाकृती बहरली. ह्या अवलियाने जवळ जवळ साडे नऊशे भविष्य वर्तवले त्यातील आता म्हणजे २०१९ पर्यंत साडे तीनशे भविष्य खरी ठरली आहेत. ही सर्व भाकिते पॅरिसमधील National Library मध्ये सुस्थितीत जपून ठेवलेली आहेत. ह्यांनी प्रोफेतिक्स द मायकेल नॉस्त्रादेमस या शीर्षकाने प्रकाशित झालेला Centuries नावाचा ग्रंथ लिहिला, ग्रंथ कसला ओ, खंड लिहून काढले आहेत खंड ! त्यात प्रत्येकी चार ओळी म्हणजे चतुष्पाद स्वरूपात तो आहे. ह्यांनी षट्पदीसुद्धा रचल्या पण त्यांचे काम काहीसे अपूर्ण राहिले आणि मृत्यूने त्यांना गाठले.
फ्रांस मधील सेलोन गावात ह्यांचा जन्म झाला आणि त्याच्या दोन्ही आजोबांनी भविष्य वर्तवले की, हा पठ्ठ्या भविष्यवेत्ता होणार ते ही खरंच ठरले म्हणा ! हा मुळातच versatile होता. ग्रीक, लॅटिन, हिब्रू, अरेबिक, संस्कृत आणि तुर्की भाषा हा सहज बोलत व वाचत असे तसेच गणित, खगोलशास्त्र, ज्योतिष, तत्वज्ञान, व्याकरणशास्त्र ह्यात मास्टर होता. ह्याची खासियत म्हणजे क्षणाला पुढे काय होईल, हे झटकन जाणत असे. ह्या पुस्तकात अगदी बऱ्याच देशांतील राजकीय गोष्टींवर प्रकाश टाकला आहे, ज्या नॉस्त्रादेमसने वर्तवल्या होत्या. खास करून फ्रांसच्या दुसरा हेन्री ह्याविषयी केलेले भविष्य वाचताना मन खिळून राहते. पॅरिसला असताना ह्याने कुंडली बघायला लागला आणि ही तोबा गर्दी त्या भोवती जमली, भाई वैतागला. त्यात मजा ही की, कुत्रा हरवला म्हणून एकाने ह्यालाच धरला. त्या बाबतीत सुद्धा ह्याने भविष्य वर्तवले आणि कुत्रा मिळाला.
नॉस्त्रादेमस खरंच नियतीचा बाप होता, त्या काळात ज्या गोष्टींची सुतराम शक्यता म्हणण्यापेक्षा कल्पनासुद्धा करता येणार नाही अशा गोष्टी ह्यानी सहज सांगितल्या आहेत. त्यात पायलट, आकाशातून सोडणारे बॉम्ब, चॉपर्स अशा कित्येक गोष्टी ह्यानी सांगितलेल्या आहेत. काही चतुष्पदींमध्ये मुसोलिनीचे फक्त वर्णन केले आहे पण हिटलरचे तर नाव घेतले आहे, नेपोलियनला तर लय हाणला आहे ह्यानी, कमाल आहे ना ! इस्त्राईल, इजिप्त, खोमेनी, सद्दाम हुसेन, आपले नेताजी सुभाषचंद्र बोस अशा कित्येक बाबींविषयी अगदी सहज भविष्य वर्तवलेले आहे.
नॉस्त्रादेमसने भारताविषयी बरंच काही लिहिलेले आहे. खास करून राजीव गांधी आणि इंदिराजींची हत्या ह्या घटनांचे वर्णन केले आहे. मध्यपूर्वेत इस २०१५ ते २०२० ह्या मध्ये तिसरे महायुद्धाचा रंग स्पष्ट होईल. I think इसिसचा विचार करता ते सुरू आहे, असे मला वाटते. ह्याच काळात भारतात जागतिक कीर्तीचा नेता निर्माण होईल आणि '...... संभवामि युगे युगे' ही श्रीमद् भगवद्गीतेतील उक्ती प्रत्ययाला येईल. नॉस्त्रादेमसने पाच-सहा वेगवेगळ्या चतुष्पदींमध्ये ह्या महान कर्तृत्ववान भारतीय नेत्याचे वर्णन केले आहे. हा नेता भारताला जगातील महासत्ता बनवेल. पुढे नॉस्त्रादेमस म्हणतो की, हा भारतीय नेता महायुद्धात सहभागी होण्यास उत्सुक नसेल परंतु झळ लागली तर हा त्या अतिरेक्यांना सोडणार नाही. (हे मी नाही तर नॉस्त्रादेमस काका म्हणत आहेत, नाहीतर याल अंगावर !) सरते शेवटी हा इस २०२६ नंतर शांतता लाभेल, असे म्हणतो.
तिसऱ्या खंडात चौथ्या चतुष्पदीत चंद्रकोरीचा पराभव जवळ आला असेल, असे म्हणतो. ईशान्य पूर्वेला नुकसान भोगावे लागेल. ह्यावरून आता चीनची काय स्थिती आहे, हे आपण पाहतो. सरते शेवटी स्वतःच्या मृत्यूविषयीसुद्धा ह्याने लिहून ठेवले आणि त्याच प्रमाणे तो २ जुलै १५६६ ला स्वर्गवासी झाला व एका महान पर्वाचा अस्त झाला पण ह्यात सुद्धा मला धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याने नोंद केलेला तांब्याचा पत्रा त्याच्या इच्छेनुसार रेशमी वस्त्रात झाकून त्याच्या गळ्यात टांगला होता आणि त्याचे वाचन थेट १७९२ ला झाले. त्यावर लिहिले होते, "माझं थडगं उकरणारे दोघेही क्रांतिकारकांच्या भरकटलेल्या गोळ्यांचं लक्ष्य होऊन येथेच मरून पडतील" आणि झालंही तसंच ! थडगी उकरून चोरी करणारे दोन भुरटे तिथेच एका शाही चकमकीत चुकून आलेल्या गोळ्यांनी गचकले होते.
तर असा होता नॉस्त्रादेमस !
जमल्यास नक्की हे पुस्तक वाचा कारण अशी लोकं नियतीची बाप असतात बाप......
No comments:
Post a Comment