थॉमस अल्वा एडिसन : स्वतःच्या प्रतिभेने जग बदलणारा किमयागार - कीर्ती परचुरे



पुस्तक परीक्षण

पुस्तकाचे नाव : थॉमस अल्वा एडिसन : स्वतःच्या प्रतिभेने जग बदलणारा किमयागार

लेखक : कीर्ती परचुरे 

प्रकाशन : कनक बुक्स 

मूल्य : १५०/-



पुस्तकाची सुरुवात भन्नाट होते, ती थंडगार सकाळ होती. अमेरिकेतील न्यू जर्सी इथे एडिसनच्या west orange प्रयोगशाळेत काम सुरू होतं. ती प्रयोगशाळा फायरप्रूफ होती पण त्या भव्य प्रयोगशाळेला आग लागली. एडिसनच्या २४ वर्षांच्या चार्ल्सने त्याच्या पप्पांना त्या प्रयोगशाळेत शोधून काढले तेव्हा एडिसन शांतपणे ती जळणारी प्रयोगशाळा पाहत होता. चार्ल्सला पाहिल्यावर एडिसनने तुझ्या आईला पटकन बोलाव, अशी घटना क्वचितच पाहता येते म्हणून सांगितले. एडिसन दुसऱ्याच दिवशी त्या राख झालेल्या प्रयोगशाळेला भेट द्यायला गेला आणि आनंदित होऊन त्याने म्हटले, "सर्व चुका जळून खाक झाल्या सुदैवच म्हणायला पाहिजे...." ज्जे बात.... आणि मग ह्या अशा भन्नाट गोष्टी आपल्या भोवती फेर धरतात तेव्हा मला वाटते की, एडिसन हा यत्र, तत्र आणि सर्वत्र आहे. जेव्हा अंधाऱ्या खोलीत बटन दाबून जे आपण प्रकाशित करतो ना, तो एडिसन आहे. ट्रेनने प्रवास करताना जी शक्ती लागते ना, तोही एडिसनच आहे. असा एडिसन आपल्या आयुष्यात आपल्याला क्षणोक्षणी भेटत असतो.

 
हे पुस्तक मला बदलापूरला साहित्ययात्रेत मिळाले. पुस्तकांच्या ह्या प्रदर्शनात एडिसन दिसला आणि माझा डोक्यात दिवा पेटला. हा आपल्या घरात हवाच कारण ह्या विषयी ऐकून होतो पण ह्याला भेटलो नव्हतो. मागील आठ दिवस त्याच्या बरोबर वावरलो आणि त्याच्याशी रोज कर्जत ते घणसोली प्रवासात भरपूर गप्पा मारल्या. अगदी त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व कहाण्या तो सांगत होता आणि मी ऐकत होतो.


झोपेविषयी त्याने अगदी मजेशीर किस्से सांगितले कारण मागच्या वेळी जेव्हा मला हिटलर भेटला होता, तेव्हा सुद्धा त्याने माझ्या झोपेच्या धोरणात काही बदल सांगितले पण तो शेवटी हुकूमशहा.... हा मात्र शास्त्रज्ञ आहे आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी म्हणजे शिरसावंद्य ! एडिसन म्हणतो की, आठ ते दहा तासांची झोप घेणारे लोक कधीच पूर्ण जागे किंवा गाढ झोपलेले नसतात. मला थोडी झोप पुरते, त्यात मला स्वप्नसुद्धा पडत नाहीत. कमी झोपेवर लोकं खूप मोठं नुकसान झाल्यासारखे बोलतात. मी म्हणेन, नुकसान तर नक्कीच होतं, पण ते संधीचे आणि वेळेचं झालेले असतं. एडिसन बोलत होता आणि मी शांतपणे ऐकत होतो. एडिसनला झोपेचा आणि कपड्यांचा फार कंटाळा होता. २० वर्षात तो त्याच्या शिंप्याकडे फक्त दोन वेळाच माप द्यायला गेला होता. कपडे सैल अथवा घट्ट झाले तर तो diet सुरू करायचा. सही आहे राव ह्याचे !


Patience काय असतात ते हे पुस्तक आपल्याला शिकविते. एडिसनने एकाच दिवसात ५७ पेटंट्स घेण्यासाठी सर्व कागदांची पूर्तता करून त्याच्या वकिलाकडे दिले होते, हा एक रेकॉर्ड झाला असता पण वकिलाने ते ५७ formulas एडिसनच्या स्पर्धकांना परस्पर विकले. एडिसन शांत होता. कित्येक वर्षांनंतर त्याला अनेकांनी त्या मूर्ख वकिलाचे नाव विचारले पण त्याने त्याच्या घरच्यांना त्रास होईल म्हणून सांगायला नकार दिला व शेवट पर्यंत सांगितले नाही. ह्या अशा कित्येक छोट्या गोष्टी माणसाच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवतात, एडिसनच्या बाबतीत ते खरे होते.


कित्येक संशोधन करताना एडिसन आणि त्याची टीम कामामध्ये वाहून गेलेली असायची. असाच x-ray मशीनचा शोध लावताना त्याचा खास मित्र त्या घातक किरणांच्या परिणामामुळे कर्करोगाने दगावला, एडिसनला धक्का बसला त्याने संशोधन थांबवले आणि त्याचे पेटंटसुद्धा घेतले नाही. कोणी विचारले तर x-ray बद्दल माझ्याशी बोलू नका, मला त्याची भीती वाटते म्हणून खिन्न होऊन सांगायचा. एडिसन भावनिक होता. त्याच्या आई गेली तेव्हा तो बोलला कि, तीच माझ्या जगण्याचा उद्देश होती. काहीही झाले तरी हिला कधीच निराश करता कामा नये.


एडिसनच्या कामाचा वेग प्रचंड होता. तो सतत कामात असे आणि म्हणून तो सहज बोलून जातो कि, अपयशाची मला कधीच भिती वाटली नाही कारण मी अपयशी झालोच नाही; उलट हजारो निरुपयोगी मार्ग मी शोधून काढले. एका प्रयोगातून अनेक गोष्टींच्या कल्पना त्याच्यापुढे येत असत आणि त्यावर काम करून कित्येक गोष्टींवर त्याने संशोधन केले. सरते शेवटी जेव्हा तो त्याच्या उत्तरार्धात पोहचला तेव्हा तो बोललं की, आपल्याकडे करण्यासारखे खूप काही आहे, पण जेव्हा त्यासाठी पुरेसा वेळ नाहीये हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा त्या एकाच क्षणी मी निराश झालो होतो. त्यावेळी ह्या भाईकडे १०९३ पेटंट्स होते.
एडिसन एक भन्नाट रसायन आहे. काम करण्याचा त्याचा स्टॅमिना म्हणजे एक कोडं होतं कोडं....! हेच उलगडण्यासाठी १९७८ ला रटगर्स विद्यापीठाने "एडिसन पेपर प्रोजेक्ट" हाती घेतला. एडिसनच्या घरी त्याचे कागद, वह्या, डायरी असे कित्येक त्याचे लिखित साहित्य scan करायचे ठरले त्यासाठी आठ जण कामाला लागले सर्व साहित्य एकत्र केले तेव्हा समजले की, त्या कागदांची संख्या ५० लाख आहे आणि हे सर्व कागद scan करेपर्यंत २०१५ साल उजडेल आणि झालेही तसेच २०१५ साली अडीच लाख कागदांचे तीन खंड प्रकाशित झाले पण काम अजून संपलेले नाही.


एडिसनची दूरदृष्टी अफाट होती. १८७१ ला त्याने उडणारे वाहन म्हणून काही नोंदी करून ठेवल्या होत्या, ज्याला आज आपण विमान म्हणतो. ग्रॅहम बेल टेलिफोनचा जनक आहे पण त्या फोनमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करून तो यशस्वीपणे वापरून दाखवणारा एडिसन आहे. १९१४ ला पहिली electric car तयार करून त्याची चाचणीसुद्धा घेणार होता पण नियतीने वेगळाच डाव मांडला, चाचणीच्या आदल्या रात्री प्रयोगशाळेला आग लागली आणि हा प्रकल्प भक्ष्यस्थानी पडला. तेव्हा पासून आज पर्यंत जगभरात चाललेल्या ह्या प्रयोगाला आता यश मिळाले आणि अनेक कंपन्या EV मॉडेल घेऊन बाजारात आल्या.


असा हा जिद्दी एडिसन १८ ऑक्टोबर १९३१ ला आपल्यातून निदान शरीराने तरी निघून गेला पण आजही मी म्हटल्याप्रमाणे यत्र, तत्र आणि सर्वत्र आहे. खरंच त्याच्या आत्मविश्वासाला आणि संयमाला एक कडक सलाम.....


 

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960