“चौल” जगाच्या नकाशातील एके काळचे भरभराटीचे बंदर ! इजिप्त, ग्रीस, चीन आणि आखातातील देशांकडे याच बंदरातून व्यापार होत असे. त्याकाळी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उदयास आलेले हे बंदर पोर्तुगीजांचे महत्वाचे ठाणे, निजामशाही, आदिलशाही आणि मराठेशाही फार जवळून पाहणारे नगर होते ! असे हे विस्मरणात गेलेले चौल ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना फारचं वेगळे भासले. चौल आज समुद्री पर्यटनासाठी ओळखले जाते. जगाच्या नकाशात त्याकाळी “दक्षिण काशी” अशी महत्वाची भूमिका बजावणारे चौल आज त्याच नकाशात शोधावे लागते, कालाय तस्मै नम:, म्हणतात ते हे असे !
इतिहासात फेरफटका मारताना या महत्वाच्या बंदराचा उल्लेख “पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी” या दस्तावेजात आणि अगदी सुमारे २५०० वर्षांपासून आढळतो. प्रवासवर्णन लिहिणाऱ्या टॉलेमीच्या दस्तावेजात या सातवाहनकालीन बंदराचा उल्लेख येतो आणि आज विस्मरणात गेलेले चौल त्या काळी किती महत्वाचे व्यापारी बंदर होते, याची प्रचिती येते. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेल्या चौलमध्ये वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी त्या काळाचे चौलशी असलेले नाते दाखवते. आक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हि देखील एक जोडगोळी आहे. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा नगर उदयास आले म्हणूनच आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असाच केला जातो. पुराणात गेलो तर चौलचे नाव “चंपावती” तर रेवदंड्याचे नाव “रेवती” असे आढळते पण चौल या नगरीचे पौराणिक नावांशिवाय चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि आता चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एखाद्या गावाला ही एवढी नावे कशी, असा प्रश्न मला पडला आणि त्याचे उत्तर ऐतिहासिक दस्तावेजांतून चौलच्या प्राचीन बंदरात दडलेले आढळले. इतिहासात चौल या नगरीचा प्रदीर्घ कालखंड आणि त्यातच हे प्रसिद्ध बंदर होते, साहजिकच संपर्कात आलेल्या अनेक देशी-विदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या साऱ्यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती आणि उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही विविध नावे जन्माला आली.
अशा ह्या ऐतिहासिक चौल बंदराची ओळख बंदरापुरती होती, असेही नाही तर आज चौलमध्ये आल्यानंतर निसर्गाच्या सौंदर्याची मोहिनी पडतेच परंतु आजही काही वास्तू चौल नगरीची ओळख सांगण्यासाठी पर्यटकांची, अभ्यासकांची वाट पाहत उभ्या आहेत. त्यातीलच सातवाहनकालीन रामेश्वर मंदिर, काहीसा चौल नगरीच्या बाहेर असलेला कलावंतिणीचा वाडा, घुमट टेकडी, हमामखाना, दत्ताचे मंदिर असलेली टेकडी, पोर्तुगीजांनी बांधलेली ती अभेद्य तटबंदी व त्याच्या बाजूचे खंदक, किनाऱ्यावरील बलाढ्य किल्ला व त्याची तितकीच बलाढ्य प्रवेशद्वार अशा बऱ्याच वास्तू आज त्या काळातील साक्ष देत उभ्या आहेत. हे सर्व मी जेव्हा अभ्यास दौऱ्यात पाहिले तेव्हा खरंच त्या आठवणीत हरवून गेलो. येथील रामेश्वर मंदिर हे चौलचे ग्रामदैवत आहे. उतरत्या कौलारू छताचे मंदिर, लांबून घरासारखे वाटते. (खालील फोटोत पाहू शकता) मंदिरासमोर स्वतंत्र नंदीमंडप आहे. तेथे असणारी दिपमाळ आणि रेखीव पुष्करणी या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर टाकत असते. वास्तुशैलीचा हा उत्तम नुमना असून मूळ मंदिराची निर्मिती कधी व कोणी केली ? याची ठोस माहिती मिळत नाही पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात.
हे ऐतिहासिक मंदिरात एक गंमत आहे. या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली पर्जन्य, वायू आणि अग्नी अशी नावे असलेली तीन कुंडे आहेत. दुष्काळ पडला अथवा पावसाने ओढ दिली की, पर्जन्यकुंडावरील फरशी उघडायची. वारा थांबला अथवा वादळस्थिती निर्माण झाली की, वायूकुंड उघडायचे आणि थंडी किंवा गारठा वाढला की, उर्वरित अग्नीकुंड उघडायचे. या गावावर नैसर्गिकरित्या आलेल्या या तीन संकटांचे निवारण करण्यासाठी ही कुंडे महत्वाची होती. खरंच, हे सर्वच तिथे पाहताना खूपच विलक्षण वाटते ! याच्या नोंदी तपासल्या तर पाऊस लांबल्याने आजवर यातील पर्जन्यकुंड १७३१, १८७६ आणि १९४१ मध्ये उघडल्याच्या आणि त्या-त्यावेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते. गावोगावीच्या या श्रद्धा आणि त्यासाठीच्या त्या काळातील लोकांनी केलेल्या या योजना वाखाणण्याजोगे आहेत. आज मात्र काळाच्या ओघात अग्नीकुंड आणि वायूकुंड बुजवले, असे ग्रामस्थ सांगतात. पर्जन्यकुंड मात्र आपल्याला दिसते. तरी सुद्धा त्या काळातील लोकांनी केलेल्या अद्भुत कल्पना मनाला सुखावून जातात.
चौलमध्ये रामेश्वराशिवाय अनेक पुरातन मंदिरे आहेत. यातील समुद्रकिनारी आणि पोर्तुगीजांच्या किल्ल्याजवळील मंदिर म्हणजे सिध्देश्वर मंदिर ! ह्या मंदिरात पोर्तुगीजांच्या काळातील काष्टशिल्प आहे. आज त्या शिल्पाला घंटा टांगल्या आहेत. अप्रतिम कोरीवकाम असलेल्या ह्या शिल्पात पोर्तुगीज टोपीधारी एका चार पायच्या प्राण्याला मारून घेऊन जात आहेत तसेच जंगली प्राण्याची भांडणे आणि त्यांना मारताना असलेले हे शिल्प आपल्याला त्या काळात घेवून जाते. (खालील फोटोत पाहू शकता) मंदिरासमोर चावीच्या आकाराची उथळ विहीर अगदी शोभून दिसते. हे सर्व आता रेवदंड्यातील पोर्तुगीजांच्या किल्ल्याच्या बाजूला आहे.
चौलच्या बाहेरील रस्त्यावर कलावंतिणीचा वाड्याचे अवशेष आहेत. पुरातत्व खात्याकड़े असलेली हि वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे. एके काळी हा वाडा चौलची ओळख होती, असे इतिहासात वाचायला मिळते. हि वास्तू निजामशाही व आदिलशाहीत कितीतरी करमणुकीच्या क्षणांची साक्षीदार असेल. मोठमोठे अधिकारी या वाड्यात येत असतील. कितीतरी लोकांना या वाड्याची मोहिनी असेल. उदयाकडून अस्ताकडे चाललेल्या या वाड्याची आजची स्तिथी खूपच वाईट आहे. या वाड्याची तटबंदी पूर्णतः भग्न झाली आहे. फक्त प्रवेशद्वार आणि त्या समोरील वास्तू आज ठीकठाक अवस्थेत आहेत. आज या वाड्याच्या आत पूर्णतः शेती केली जात आहे. घुंगरांचा आवाज ऐकलेला आणि नाचगाणे पाहणाऱ्या ह्या वास्तूच्या मागे प्रचंड मोठे तळे आहे. बहुतेक ह्याच वास्तूतील कलाकारांसाठी हि पाण्याची व्यवस्था असू शकेल. ऐतिहासिक नजरेतून त्या वास्तूत जेव्हा आपण शांत उभे राहतो. तेव्हाचा थिरकणाऱ्या घुंगरांचा आवाज आणि नाद कानावर पडल्याशिवाय राहणार नाही. अशी हि मुकं वास्तू एकदातरी पाहणे गरजेचे आहे. (फोटोत पाहू शकता.)
त्याच रस्त्यावर एका छोट्या टेकडीवर अशीच एक मुकं वास्तू म्हणजे घुमट टेकडी ! (खालील फोटोत पाहू शकता.) कोणी व का बांधली ? हे सांगता येत नाही. पण त्यावरील बारीक कलाकुसर मात्र अद्भुत आहे. आकाशाशी स्पर्धा करणारे उंच उंच माड आणि त्याच्या कुशीत लपलेले चौल तिथून पाहण्यात एक पर्वणी आहे. समुद्रावरून येणारी दमट गरम हवा मागे उभे असलेल्या दत्ताच्या टेकडीला आदळून पुन्हा जेव्हा घुमट टेकडीकडे येते आणि येताना घुमट टेकडीच्या खाली असलेल्या तळ्यावरून तिचा प्रवास होतो, तेव्हा मात्र ती थंड झुळूक अनुभवण्यासारखी असते. वास्तू छोटी आहे परंतु चौलच्या सौंदर्यात भर घालणारी आहे.
ह्याच रस्तावरून रेवदंड्याकडे येताना आता तिठा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी पोर्तुगीज किल्ल्याचे त्या काळातील महत्वाचे प्रवेशद्वार होते. आजही पोर्तुगाल भाषेत असलेला त्यांचा शिलालेख आणि त्या काळातील त्यांची महत्वाची शिल्पकला उठून दिसते. यामध्ये जागतिक स्वामित्व (आर्मीलरी स्पियर), कोट ऑफ आर्मस आणि तीन भाले एकाच गाठीत बांधून तीस वर्ष सत्ता उपभोगल्याचे शिल्प दर्शनी भागांत लावून स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन केले आहे. असे हे शिल्प आपल्याला त्या काळात घेऊन जातात. (खालील फोटोत पाहू शकता)
पूर्ण किल्ल्यात आल्यानंतर दुसऱ्या गोमुखी प्रवेशद्वाराच्या मागे पोर्तुगीज राजाचा राजमुकुट शिल्प बसवले आहे. त्याकाळी मागे फिरून लवून मुजरा करण्याचे ठिकाण असलेला हा महत्वाचा दरवाजा होता. कितीतरी अधिकाऱ्यांचा मुजरा या मुकुटासमोर झडला असेल पण दुर्दैवाने आज मात्र हे शिल्प वेलींच्या विळख्यात अडकलेले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाने हादरून गेलेली पोर्तुगीज सत्तेची शिल्प आज निसर्ग उखडून फेकण्याच्या तयारीत आहे. हे शिल्प पूर्णतः दगडी असून हे पाहणे म्हणजे पर्वणी आहे. असे शिल्प पोर्तुगीजांच्या किल्ल्यांवर खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते. त्याचा खास फोटो तुमच्यासाठी !
याच किल्ल्यातील चौलची अजून एक प्रसिद्ध वास्तू म्हणजे सातखणी मनोरा ! पोर्तुगीजांच्या या किल्ल्यात सातमजली हा मनोरा त्याकाळी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला. (खालील फोटोत पाहू शकता.) आज त्याचे ५ मजले सुस्थितीत आहेत पण हे सर्व पाहताना समुद्रावर दादागिरी करणारी हि सत्ता छत्रपती शिवाजी महाराजांमूळे हादरली आणि लक्ष ठेवण्यासाठी अतिदक्ष झाली ह्याचे हे द्योतक पुरावा आहे. या मनोऱ्याच्या आजूबाजूला लांब पल्ल्याच्या तोफा पडलेल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस झेलत एकेकाळी सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या या तोफा आज मात्र त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. या तटबंदीवरुन अफाट आणि अथांग समुद्र दिसतो, इथूनच पोर्तुगीजांनी टेहळणीसाठी खास बांधलेला एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असलेल्या टेकडीवर कोर्लई किल्ला दर्शन देतो. आज तिथे दिपस्तंभसुद्धा आहे.
असे हे संस्मरणीय आणि अद्भुत चौल आज फक्त समुद्री पर्यटनासाठी ओळखले जाते. खरं तर प्राचीन ठेवा असलेले मंदिरे आजही स्फूर्ती देतात. शिवरायांच्या दरारामुळे हादरलेली पोर्तुगीजशाही तिथे गेल्यावर समजते. आज प्रसिद्धीच्या झोतात असलेले अलिबागमध्ये गेलात तर तिथून चौल-रेवदंडाकडे पावले वळवा आणि नक्की सातवाहनकालीन रामेश्वर मंदिर आणि इतर वास्तू पहा. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेला ठेवा पहावा आणि इतिहास जागा व्हावा म्हणून हा लेखप्रपंच ! विस्मरणात चौल हा माझा लेख तरुण भारत या वृत्तपत्रांत रविवार, दिनांक २१ मे २०१७ ला फोटोंसकट पूर्ण पानभर आला होता त्याचा फोटो आपण खाली पाहू शकता.
या चौल नगरीचे खाली काही आणखी फोटो खास तुमच्यासाठी !
तटबंदी तोडून तयार केलेला हा रस्ता….
चौलची ओळख असलेले रामेश्वर मंदिर येथील रेखीव पुष्करणी !
पोर्तुगीज किल्ल्यातील सातखणी मनोऱ्याजवळ एकेकाळी दरारा निर्माण केलेल्या आणि आता निपचित पडलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा…
लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीनुसार लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
It was additionally possible to 카지노 rearrange the reels reduce back} the players' possibilities of successful, which was unethical, but many bars had this practice. Just a glance at|check out} the Casino Robots' offers, the place you will find super bonuses - they may let you activate deposit-free slot video games and generate income. To stimulate this course of further, we've taken the time to construct a beautiful slots section among our pages that you just can} have enjoyable and even win some money. By playing in} free slots, you'll get tailored to sorts of|these sort of|most of these} casino video games. The adults among additionally, you will be able to|be capable of|have the ability to} experience the thrill of paid casinos the place success pays off for real.
ReplyDelete