पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : मार्को पोलोचा प्रवास
लेखक : श्री. ह. अ. भावे
प्रकाशक : वरदा
मूल्य : ₹ १००/-
मला प्रवासवर्णनं वाचायला खूप आवडतात आणि त्यात ऐतिहासिक लोकांनी लिहिलेले असेल तर अहाहा ! मग तर दुग्धशर्करा योगच ! तर असा अचानक मला मार्को पोलो भेटला आणि गप्पांच्या ओघात दिवस सत्कारणी लागला, हा भेटायला कारणीभूत ठरलं प्राचीन कल्याण.... असो ! वो बात ही कुछ और है....
मार्को पोलो ह्याची तशी मला रोज आठवण येतेच कारण ह्याच्या नावाने आपल्याकडे टाटांनी मिनीबस काढली आहे so ऑफिसला जाताना एकदा तरी बस दिसली की, डोक्यात इतिहासच भरला असल्यामुळे मार्को पोलो चालला आहे म्हणून पुटपुटायचो. ते कसं आहे, लोकांना दूरवर सुळका दिसतो तिथे आपल्याला गड दिसतो मग त्याचे नाव आणि इतिहास काही क्षण मग flashback मध्ये जगायचे, असा हा आपला खेळ ! बरं जाऊदे मूळ मुद्द्यावर येऊया.
मार्को पोलोचा जन्म झाला आणि त्याचे बाबा कुबलईहानच्या दरबारात नोकरी निमित्त हजर होण्यासाठी घरातून निघाले कारण राजाची त्यांच्यावर मर्जी होती, ते पुन्हा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांची पत्नी देवाघरी गेली होती आणि छोटा मार्को आता १५ वर्षांचा झाला होता मग त्याला घेऊन ते पुन्हा नोकरीसाठी हजर झाले. बस् इथूनच मार्कोचा जगप्रसिद्ध प्रवास सुरु होतो आणि त्याचे अनुभव ऐकताना आपण खिळून बसतो कारण मार्को स्वतः, त्याचे वडील निकोलो आणि त्यांचा भाऊ मफिओ पोलो हे त्रिकुट जितके फिरले आहेत ना, ज्याला आपण पायाला भिंगरी लावलेले मनुष्य म्हणू शकतो. त्यात मार्कोचे फिरणे फक्त फिरणे नाही तर तो प्रत्येक क्षणांच्या नोंदी करत आहे साहजिकच काही वेळा त्या थापा वाटतात पण तो, "तुम्ही मला थापाड्या म्हणाल" हे आधीच सांगतो. हे प्रवासवर्णन वाचायला मजा येते कारण आता हाच प्रसंग पहा ना, एखाद्या प्रदेशात दंगा तर एखाद्या प्रदेशात शांतता हे कसे काय ? केरमान प्रातांत पडलेल्या ह्या प्रश्नाला एका साधूने त्याला मस्त उत्तर दिले की, हा सर्व मातीचा गुणधर्म असतो. ज्जे बात ! पटतंय राव पटतंय....
मार्को पोलो बीजिंगला होता तेव्हा त्याने कुबलईहान सम्राटाचे जेवण वाढणारे लोक रेशमी आणि जरीचा mask वापरतात असे सांगितले आहे कारण त्यांच्या उच्छवासावाटे जंतू अन्नात जायला नको म्हणून, ग्रेट...! mask आता किती महत्त्वाचा आहे, हे आपण जाणतोच. असे एक एक प्रसंग मागोमाग येतात आणि मार्को सांगताना काही दमत नाही. आपण ऐकतच राहतो.
सरते शेवटी मार्को हिंदुस्थानात येतो आणि जगातील सर्वोत्कृष्ट देश म्हणून कौतुकसुद्धा करतो. मी तेव्हाच त्याला म्हटले, ते तर आम्ही आहोतच रे ! असे हे पुस्तक मी एका दिवसात संपवले कारण वाचताना खाली ठेवूच नये असे सतत वाटते आपल्याला ! भन्नाट आहे मार्को आणि त्याचे प्रवासवर्णन !
असं म्हणतात की, प्रवास माणसाला बरंच काही शिकवतो आणि त्यात आलेल्या अनुभवाने माणूस शहाणा होतो म्हणूनच प्रवासवर्णनं नेहमी खास वाटतात. ज्याला प्रवासवर्णन वाचायला आवडतात, त्यांनी हे पुस्तक वाचायला हरकत नाही कारण इतक्या गमती जमती आणि बारीक निरीक्षणे मस्त रचली आहेत. चला तर मग मार्को पोलोला निरोप देऊया.
No comments:
Post a Comment