पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : पाखरमाया
लेखक : मारुती चित्तमपल्ली
प्रकाशक : साहित्य प्रसार केंद्र, नागपूर
मूल्य : ₹ १५०/-
पुस्तक आनंद देणारी हवीत आणि पाखरमाया नेमके त्याच स्वरूपातील आहे, अगदी हलकंफुलकं ! रानवाटा वाचताना जो फिल होता ना, तोच ह्या पुस्तकातून मला मिळाला. हे पुस्तक मला अक्षरधारा ह्या वेबसाईटवर मिळाले आणि त्यात कोणतीही सवलत नाही, ह्या बोर्डखाली, असो ! हौसेला कधी मोल असते का ?
पाखरमाया पुस्तकात मांडलेल्या अनुभवांवरून बराच गदारोळ होत असतो. खास करून वानरांची शेकोटी ! माझ्या मते, तो लेखकाला आलेला अनुभव आहे. त्यात त्यांनी दावा केलेला नाही मग उगाच टार्गेट का करतात काही लोक ? हे पुस्तक मला तरी खास वाटले. ज्यांना अनुभव वाचायला आवडतात त्यांना हे पुस्तक वाचायला काहीच हरकत नाही कारण अनुभवाने माणूस शहाणा होतो. त्यांचा प्रत्येक अनुभव तुम्हांला पटला तर घ्या नाहीतर गुऱ्हाळ न करता सोडून द्या.
मी मुळात सह्याद्रीने भरभरून दिलेल्या आणि निसर्गाने जीव ओतून तयार केलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये राहतो. निसर्गाशी उगाच कागदावर नाळ जुळलेली नाही तर चारही बाजूला पडलेल्या सह्याद्रीच्या वेढ्यात आम्ही धमाल आयुष्य जगतोय आणि म्हणूनच अशी पुस्तक मला खास वाटतात. सकाळी जेव्हा पक्षांची लगबग सुरू असते तेव्हा असंख्य आवाज आपल्या आजूबाजूला येत असतात. त्यामुळे कोण का आवाज देत आहे ? हा प्रश्न हे पुस्तक निकाली लावते. विविध वृक्षांच्या गमतीजमती आणि त्यांवर विसावणारे असंख्य कीटक, पाखरं आणि जीव ह्यां भोवती हे पुस्तक पिंगा घेत राहते. वनमहर्षी मारुती चित्तमपल्लींचा अभ्यास, त्यांना आलेले अनुभव त्यासाठी त्यांनी केलेला प्रवास खरंच वाखण्याजोगे आहे. इतका ध्यास आणि तो ही जंगलासाठी ! अहाहा, खरंच आदर्शवत आहे हे सर्व !
माझं सतत जंगलात येणं-जाणं होत असते. कधी सहज फिरायला तर कधी जुन्या घाटवाटा अभ्यासायला, तर कधी गडकिल्यांच्या वा लेण्यांच्या माध्यमातून पण चित्तमपल्लींसारखी दृष्टी बाळगली तर जंगल खूप काही आपल्याला देईल आणि ती शिदोरी आपले आयुष्य घडवेल. खास करून जंगलाचे निरीक्षण करताना हे पुस्तक कामी येईल.
ह्या सृष्टीत इतके कीटक आहेत की, ते निसर्गाची आणि निसर्ग त्यांची कशी काळजी घेतो. हे वाचताना खूप काही उलगडत जाते. एकंदरीत जो जंगलावर प्रेम करतो त्यांना हे पुस्तक आनंद देईल कारण ते एका वनमहर्षीचे लेखन आहे, हे विसरता कामा नये. अधिक काय तर दाटीवाटीने उभी असलेली झाडं आणि पाखरांची किलबिल ह्यांमधील हितगुज म्हणजे पाखरमाया हे पुस्तक !
No comments:
Post a Comment