मंदिर पंचायतन परिसरातील पार....


 

उल्हास नदीकिनारी वसलेले मंदिर पंचायतनची व त्या परिसराची इत्नभूत माहिती आपण घेतली आहे. त्याच परिसरातील एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. इथे एकूण चार पुरातन व विस्तीर्ण अशी सावली देणारे वृक्ष आहेत. त्यातील तीन वृक्षांना पार बांधलेले असून एक वृक्ष हा गणेशमंदीराच्या मागे असल्यामुळे थोडा आडमार्गाला आहे, साहजिकच त्याला पार बांधलेला नाही. आपल्याला माहिती घ्यायची आहे ती तीन पारांची ! ह्याच पंचायतन परिसरातून दोन पारांच्या मधून गावाचा रस्ता गेल्यामुळे आजच्या काळात जणू काही ते ह्या गावाचे द्वारपाल जय-विजय असल्याचे भासतात. एका बाजूला वड तर दुसऱ्या बाजूला पिंपळ आहे. वटपौर्णिमेला ह्याच वडाखाली पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करण्यासाठी गावातील महिलावर्ग इथे जमतो. असो ! तर आणखी एक पार तिथून काही अंतरावर जरी असला तरी पंचायतन परिसरातच आहे.



इतक्या मोठ्या प्रमाणावर इथे पार का बांधलेले असावेत ? ह्या प्रश्नाच्या खोलात गेलो असता बऱ्याच गोष्टी उलगडतात. ह्या परिसरात कार्तिकी उत्पत्तीच्या दिवशी जत्रा भरते आणि हा परिसर गर्दीने फुलून जातो. सुभेदारांच्या काळात हि जत्रा घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असायची. अगदी गावागावांतून लोकं ह्या जत्रेला येत असत. पाच दिवस चालणाऱ्या ह्या जत्रेत लांब पल्ल्यातील व घोडे विकणारे लोकं इथेच राहत असत. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लोकांना रात्रीच्या झोपेसाठी एक संरक्षित जागा मिळावी म्हणून येथील प्रत्येक झाडाला पार बांधण्यात आले आहेत. काहीसे उंचावर असले म्हणजे रात्रीच्या वेळी अथवा अचानक क्रोधीत झालेल्या घोड्यांच्या टापांखाली कोणी येऊन त्याचा अपघात होऊ नये, असा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. त्यावेळची हि उपाययोजना आज मात्र ह्या पंचायतन परिसराला शोभा आणते. मोठमोठे दगडी चिरे एकावर एक रचून हे पार तयार केलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा दगड कुठून आणला ? त्याला तोड्याचे स्वरूप कोणी दिले ? असे कित्येक प्रश्न मनांत घर करतात आणि खरंच त्या अनामिक हातांना शतशः नमन करावेसे वाटते.



आज जत्रेचे स्वरूप बदलले आणि घोड्यांची जागा विविध पाळण्यांनी घेतली. करमणुकीची साधनं आणि मिठाईच्या दुकानांनी हि जत्रा नटते पण ह्या पारांनी तो काळ व आजचा काळ पाहिला आहे. ऐतिहासिक कर्जतची ओळख म्हणजे हे पार आहेत. असेच अजून एक विस्तीर्ण झाडाला पार बांधलेले आहे पण ते इथे नसून ते गुरव आळीत आहे आणि तेही सुभेदारांच्या वाड्याच्या हाकेच्या अंतरावर ! त्याचा सुद्धा वेगळा उद्देश आहे. 

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960