पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : नदिष्ट
लेखक : श्री. मनोज बोरगावकर
प्रकाशक : ग्रंथाली
मूल्य : ₹ २००/-
नादाला कोणत्याही तर्कात बसवता येत नाही. मग तो नाद वाचनाचा असो की नदीचा ! तर असेच वाचनाच्या प्रवाहात नदिष्ट हाताला लागले आणि त्या पुस्तकाचा स्वतंत्र प्रवाह होता, हे सार उमजले.
लहानपणी माझे आजोबा मला रोज संध्याकाळी नदीवर नेत असत. तिथे बसून छोट्या दगडी नदीत मारताना एक आनंद मिळायचा. पुढे माझ्या बाजूला राहणारे दांडेकर आजोबा सुट्टीत रोज पहाटे आम्हांला पोहायला नदीवर नेत असत आणि नंतर नंतर तर आम्हीच मित्र मित्र भर दुपारी नदीवर पोहत असयाचो. प्रत्येक वेळी नदी वेगळी भासत असे. तेव्हा पासून नदिशी जुळलेली नाळ आजही कायम आहे. ह्याच प्रेमापोटी मी आपल्या उल्हास नदीच्या काठावरून खंडाळा ते कोंडाणे लेणीपर्यंत तब्बल २२ किमी एकाच दिवसात चालत आलो. त्यामुळे नदीला वाहिलेले हे पुस्तक दर्जा आहे दर्जा....
हे पुस्तक नेमके कादंबरीत बसवावे की लेखकाच्या अनुभवांच्या शिदोरीत ! ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही पण संपूर्ण पुस्तक मात्र फक्त नदीकाठावर फिरत राहते, अफलातून आहेत हे सर्व अनुभव ! ह्यात असलेली नदी आहे गोदावरी आणि लेखक दिवसाच्या कोणत्याही प्रहारात नदीवर पोहायला जातो आहे, त्यात नदीचे वेगळेपण त्याला भासते आणि हे सर्व आपण वाचताना आपल्याला मजा येते. ह्यामध्ये त्याला पोहायला शिकवणारे दादाराव, कालूभैया गुराखी, सगुणा अर्धनारीनटेश्वर, भिकारी भिकाजी, सर्पमित्र प्रसाद असे कित्येक जण भेटतात आणि त्यांचे भन्नाट अनुभव पुस्तकाची रंगत वाढवतात. ह्यात रोज भेटणारी नदी अधिकच खुलते. दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टींची सांगड लेखकाने नदीच्या आयुष्याशी घातलेली आहे, ते खास वाटते इथे कुठेही ओढून ताणून संबंध मांडलेले नाहीत. नदी वाहती आहे आणि आयुष्य सुद्धा ! नदीवर माणूस आलेल्या जिकरीच्या प्रसंगाने मरत नाही, पण घाबरला की वाचत नाही. असे कित्येक प्रसंग ह्यात खुबीने रंगवलेले आहेत. पावसाळ्यात कोपलेली नदी आणि एरव्ही आपल्याला सावरून घेणारी नदीमाय ! ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे नदीच्या दोन बाजू आहेत. आयुष्य जगताना जे बाळगावं लागतं त्याचेच ओझे खूप आहे.. जे कमी करता येण्यासारखं आहे तेवढे तरी कमी करावे. ही नदीची शिकवण ! अशी कित्येक वाक्य मनात घर करून राहतात.
एकंदरीत हे पुस्तक मस्त आहे. एखाद्या विषयावर केवढी मोठी कलाकृती उभी राहू शकते. त्याचे हे द्योतक आहे आणि म्हणूनच नदीवर भरभरून प्रेम करणारे आणि नदीशी हितगुज करणारे नदिष्ट म्हणावे त्यांना ! ह्याची खात्री वाटते.
अप्रतिम समीक्षा सर
ReplyDelete