कपालेश्वर ! आपल्या सर्व भक्तांसाठी शिवालय.... आपल्या कर्जत नगरीचे मध्यवर्ती ठिकाण ! राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघायचे झाले तर राजकीय सभासुद्धा कपालेश्वराच्याच अंगणात रंगतात. कित्येक अराजकीय तर कित्येक राजकीय भल्या थोरल्या मंडळींनी हे अंगण गाजवले आहे. नवरात्रात नऊ दिवस गरबा रंगतो, तो ही इथेच ! बाजारात गेलो की, कपालेश्वराच्या घंटेचा नाद ऐकला नाही, असे कधी होत नाही आणि ऐकू गेला नसेल तर तो नक्कीच कर्जतकर नाही. असो ! हाच कपालेश्वर आपल्याला पाहायचा आहे, ऐतिहासिक दृष्टिकोनातून ते ही आपल्या ह्या पेजवर !
मागच्यावेळी जेव्हा आपण पोस्टाच्या आवारात गुदमरलेली विहीर पाहिली, (आजही ती गुदमरलेलीच आहे, हे दुर्दैव !) तर कपालेश्वरापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे तसेच शिवमंदिर स्थापत्याच्या दृष्टिकोनातून पाहता अशा आकाराने छोट्या असलेल्या विहिरांना "तीर्थ" म्हणतात. सगळ्याच गोष्टी अशा एकमेकांमध्ये लिंक आहेत. असो तर.....
मूर्तीशास्त्राचा अभ्यास करताना आणि खास करून विविध शिवलिंगाचा अथवा शिवपीठांचा अभ्यास करताना मिथकांना टाळून चालत नाही कारण स्थानमाहात्म्यचे मूळ त्यातून आलेले असते. मिथकांच्या खोलात जाता येत नाही कारण मिथकसृष्टीचे निर्माते ! त्यांच्या अध्ययनकक्षेत आणि अवलोकनकक्षेत जे जे येते असे, त्याचा उपयोग आपापल्या उद्दिष्टाला अथवा रुचीला अनुसरून करत असतात. त्यामुळे ह्या गोष्टींचे स्पष्टीकरण मागायचे नसते. शिवाच्या बाबतीत जेव्हा मी कपालेश्वराचा अभ्यास करायला घेतला तेव्हा त्याची माहिती मला पहिल्यांदा इसवी सनाच्या १४व्या शतकात रचलेल्या "श्रीकरवीरमाहात्म्यम्" ह्या ग्रंथात आढळली. करवीर दैत्याचे शीर जिथे पुरले आहे, त्या ठिकाणी कपालेश्वर शिवाची आणि कपालतीर्थाची निर्मिती झाली आणि ह्या कपालतीर्थात जो कोणी स्नान करतो, त्याची ब्रम्हहत्येच्या पातकपासून मुक्ती होते, कमाल आहे ना ! (ज्या विहिरीचा आज बळी घेतला आहे ना, ती एकेकाळी कपालतीर्थ असेल, हे ही नक्की)
"शिवनामकल्पकता" ह्या ग्रंथात कपालेश्वराला कंकालनाथ म्हटलेले आहे कारण ब्रम्हाची कवटी त्याच बरोबर कवट्यांच्या अनेक माळा तू कंठात धारण केल्या आहेस म्हणून तुला "कंकालनाथ" नाव शोभते. असे वर्णन दिलेले आहे. मिथक, पुराण व आख्यायिका ह्या जरी असल्या तरी वर म्हटल्याप्रमाणे त्या स्थानमाहत्म्यात महत्त्वाचे स्थान निर्माण करत असतात. असो ! तर असा हा कपालेश्वर आज आपल्या कर्जतच्या हृदयस्थानी आहे. ऐसपैस असलेल्या मंदिरात इतरही देव आहेत पण स्थानमाहात्म्यनुसार कपालेश्वर हा मूळ आहे, त्याचे तीर्थ त्याच्याच बाजूला म्हणजे पोस्टाच्या आवारात आहे पण आज ते संपूर्णपणे बुजवले आहे. इतिहास नेमका असाच गाडला जात आहे. त्या बुजवलेल्या विहिरीला पाहिले की, मनात येते की, ह्या कपालतीर्थाचा अभिषेक कपालेश्वराला झाला असेल ना ! पापमुक्तीसाठी कित्येक भाविक इथे स्नान करून गेले असतील पण आज हे विस्मरणात गेले आहे, त्याची आठवण असावी म्हणून हा लेखप्रपंच !
तर अशी आहे आपल्या कपालेश्वर शिवपीठाच्या नावाची ओळख ! कर्जत ऐतिहासिक आहे आणि ते आपणा सर्वांना माहीत असावे म्हणून हा लेखाजोगा....
No comments:
Post a Comment