कोल्हापूर एक वेगळी रेलचेल आहे. कोल्हापुराने मराठ्यांच्या खुणा जपल्या आहेत. कोल्हापूरची अंबाबाई जशी प्रसिद्ध तशी येथील खाद्यभ्रमंती specially मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी पर्वणीच ! तो तांबडा-पांढरा रसा, ती तिखट तिखट मिसळ, अहाहा ! काय बोलणार ओ, तोंडाला पाणीच सुटते कि, राव !
कोल्हापूर म्हटले कि, आठवते शिवरायांचे पन्हाळातुन पलायन, शंभुराजांचा जीवाभावाचा पन्हाळागड, स्वराज्याची काही काळची राजधानी, ते घोडखिंडीतील बाजींचे युद्ध, शिवा काशीदांची साथ, कोंडाजी फर्जंदांनी शिवरायांवर केलेल्या सुवर्ण फुलांच्या वर्षावाचा सुगंध असणाऱ्या पन्हाळा किल्ल्यातील ती तीन दरवाजांची वास्तू, छत्रपती शिवराय आणि मावळ्यांनी केलेला आणि लक्ष लक्ष सोनचाफ्याने भरून गेलेला तो सोमाळे तलावातील अभिषेक ! अशा कित्येक आठवणी ताज्या होतात, या कोल्हापुरात ! इथली माणसं म्हणजे तिखट तिखट खाऊन मनापासून गोड बोलणारी अगदी मधाळ आहेत. शेवटी इथे चारही बाजूला साखर कारखानेसुद्धा आहेत कि राव ! पण या शहराचे नाव का बरे असे लबाड प्राण्यावरून ठेवले असेल ? थोडी इतिहासात शोधाशोध केली तेव्हा वि. का. राजवाडे सरांचे लिखाण सापडले त्यात ते म्हणतात, कोला म्हणजे सह्याद्रीच्या डोंगराळ भागांतील दोन दऱ्यांमधील प्रदेश आणि पूर म्हणजे गावं ! मोडीत म्हणजे मराठीतचं “ल” या अक्षरयुक्त शब्दाचा उच्चार करताना “ल्ह” असा होतो आणि माझेही कोडे सुटले. झाला कि राव अपभ्रंश, कोलापूरचे झाले कोल्हापूर !
असो ! कोल्हापूर म्हटल्यावर इतिहास जागा होतोच आणि त्यामध्ये महत्वाचा किल्ला म्हणजे पन्हाळा ! राजा भोज नृसिंह याच्या महत्वाच्या खुणा जपणारा हा किल्ला, मी तीन वेळा पाहिला पण मन काही भरत नाही. विस्तीर्ण पसरलेला हा पन्हाळा अभ्यासू नजरेतून कारमधून पहायलासुद्धा चांगले ४-५ तास हवेत.
चला तर करूया पन्हाळ्याची भ्रमंती आपल्या जिव्हाळ्याचा ब्लॉगमार्फत….
सर्व प्रथम पन्हाळ्याचा जोडकिल्ला म्हणजे पावनगड जो आपण किल्ले पन्हाळ्यात चार दरवाज्यांच्या अवशेषातून प्रवेश करताना पाठीवर ठेवतो आणि आपले वाहन पळवतो. पहिल्यांदाच लागतो तो म्हणजे विटा नावाचे शस्त्र हातात घेऊन अचूक वेध घेणारे आणि मृत्यूच्या पालखीत हसत हसत बसणारे, मरणार म्हणून काय झाले तर शिवा काशिद म्हणून नाही तर शिवाजी राजा म्हणून मरतोय असा विचार करणारे आणि काहीसे शिवरायांसारखे दिसणारे आपले शिवा काशिद ! हे आपण नतमस्तक होण्याचे पहिले ठिकाण !
थोडसं पुढे पोहचल्यावर बलाढ्य, आक्रमक, मृत्यूलाही आवाहन देणारे आणि राजा विशाळगडावर पोहचल्यावर देह ठेवणारे वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पूर्णाकृती पुतळा ! त्यांच्या हातातली त्या दोन तलवारी आणि आत्मविश्वास पाहून त्यांना नतमस्तक होऊन पन्हाळ्यावर आपण पोहचतो. इथे सावरकरांच्या ओळी आठवतात, “तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्यूला चला घालू स्वातंत्र्य संग्रमी रिपूवरी भालाssss जीsssर….जीssssर…. रणीरंग पुन्हा येसाचा….” आणि सुरु होतो पवित्र किल्ले पन्हाळागड !
स्वराज्याचे तिन्ही छत्रपती, रणरागिणी ताराराणी यांच्या पावलाने पावन झालेला हा पन्हाळा आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. इथली धूळ मस्तकी लावा पराक्रमाची हि माती म्हणजे आपल्या सारख्या इतिहासवेड्यांचा अंगारा आहे.
सर्व प्रथम पन्हाळ्याची सुरुवात त्या चार दरवाजांच्या वास्तू अवशेषांपासून होते. कार घेऊन आपण जेव्हा पन्हाळ्यावर दाखल होतो तेव्हा मात्र हे अवशेष आपल्याला दिसतात. त्याकाळी हा पूर्वेकडील अत्यंत महत्वाचा दरवाजा होता. १८४४ मध्ये इंग्रजांनी हे दरवाजे पाडले आणि आज वाहनं इथून ये-जा करायला लागली. इथे शिवा काशीदांचा पूर्णाकृती पुतळा आहे. (जो आपण वरील फोटोत पाहिला.) त्यानंतर बाजींचा पूर्णाकृती पुतळा पाहून आपण पोहचतो तीन दरवाजांकडे ! (त्यातील हा खालील फोटोत पहिला दरवाजा)
एका मागोमाग असलेले हे दरवाजे भोज राजा नृसिंह याचे अप्रतिम स्थापत्यशास्त्र दाखवतात. दोन दरवाजे एका मागोमाग असून तिसरा दरवाजा मात्र क्रॉस केलेला आहे. युद्धाच्या काळात हत्ती किंवा ओंडका त्या दरवाजावर सरळ रेषेत आपटता येऊ नये, म्हणून अशा प्रकारचे बांधकाम करत असत. असो ! ह्या दरवाजाच्या खास दोन आठवणी सांगता येतात. पहिली सिद्धीने २ मार्च १६६० ला वेढा टाकला आणि इंग्रजांच्या तोफा आणून मारा केला, जो गोळा पन्हाळगडावर आला आणि जिथे धडकला तो हा दरवाजा ! गोळा धडकल्याच्या आठवणी इथे स्पष्ट दिसतात.(खालील फोटोत पाहू शकता.)
दुसरी आठवण मन सुखावणारी आहे. जेव्हा हा किल्ला सिद्धीच्या वेढ्यानंतर पुन्हा १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंदांनी जिंकून स्वराज्यात सामील केला तेव्हा छत्रपती शिवराय स्वतः पहायला आले होते आणि त्याचवेळी ह्या तीन दरवाजांमधील दुसऱ्या व तिसऱ्या दरवाजांच्या वास्तूमधून सुवर्ण पुष्पवृष्टी त्यांच्यावर केली होती. (फोटोत ती वास्तू पाहू शकता) हे तिथे आठवताना खूप पवित्र वाटते.
हे पाहून आपण अंधारबावमध्ये येतो तिथे सर्वात वरच्या मजल्यावर एक चोरदिंडी आहे. जी किल्ल्याच्या बाहेर जाते. आतमध्ये वास्तू आणि शेवटी खाली गोड्या पाण्याची विहीर असलेले हे बांधकाम बाहेरून मात्र बुरुज दिसतो. सूर्यास्तानंतर गडाचे प्रमुख द्वार तीन दरवाजे बंद झाल्यानंतर आलेला माणसाला ह्या चोरवाटेने आतमध्ये घेतले जात असे. त्यासाठी काही (code language) भाषा असे म्हणजे फळाचे नाव, फुलाचे नाव असे काही त्या दिवसासाठी निवडलेले असे, ते जर त्या माणसाने अचूक सांगितले तर त्याला आत घेतले जात असे. आजच्या काळात ज्याला आपण गेटपास म्हणतो असेच काही ! हि अंधारबाव त्याकाळी खूप महत्वाची असे, सतत जागता पहारा इथे बसवलेला असे. त्याकाळातील ह्या अशा वास्तू ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना एक वेगळाच भास आपल्याला जाणवतो.
अंधारबाव मधील आतील बाजू
अंधारबावमधून आपला प्रवास सुरु होतो तो तेथील तटबंदीवर ! इथे मात्र नजर भिरभिरती ठेवा. दिनांक २ मार्च १६६० ला जेव्हा सिद्धी जौहरने वेढा टाकला तो परिसर इथून पाहता येतात. खालील फोटोत तुम्ही पाहू शकता.
त्यानंतर आपली नजर आणखी दूरवर जाऊ दे. समोर जे पठार दिसते तेच मसईचे पठार ! जुलै १६६० च्या रात्री छत्रपती शिवराय आपल्या मावळ्यांना घेऊन ह्याच पठारावरून पलीकडे विशाळगडाकडे गेले होते. (फोटोत पाहू शकता.)
आता मात्र आपल्या कारमधून अथवा पायी फिरण्यासाठी सज्ज व्हावे लागते. ह्याच वाटेने जाताना मध्येच अतिशय भावनिक मनाने राजदिंडीचे दर्शन होते. ह्या वाटेने पन्हाळ्यातुन दोन पालख्या बाहेर पडल्या. एक होती शिवा काशीदांची तर दुसरी होती छत्रपती शिवाजी महाराजांची. हो हो ! हाच तो मार्ग राजाच्या विजयाचा, हाच तो मार्ग बाजींच्या पराक्रमाचा आणि हाच तो मार्ग शिवा काशीदांच्या हिंमतीचा ! ह्या मार्गाला आपले मस्तक लावावे आणि निघावे पिछाडीच्या बुरुजाकडे !
पन्हाळ्याच्या वेढ्यात जिथे पक्षांना उडायला बंदी होती, तिथून ह्या पिछाडीच्या बुरूजावरून अनंत रामदासी आलेले सांगितले जाते. ह्या बुरुजावरुन मसईचे पठार आणि शिवा काशीदांचे नेबापूर गावाचे दर्शन होते. (फोटोत पाहू शकता) हे सर्व तिथे आठवताना एक मात्र नक्की होते ते म्हणजे हाच वेढा शिवरायांनी फोडला आणि यशस्वी पलायन केले. कधी कधी पलायन करणे म्हणजे घाबरणे नव्हे तर राजकारणात आणि युद्धात युटर्न मारून किती तरी वेळा यशस्वी चाली करता येतात, ह्याचे हे द्योतक उदाहरण आहे.
त्यानंतर गडावरील काही ठिकाणं पाहण्यात आपण दंग होतो. १२०० वर्ष जुने असलेले गडावरील देवी अंबाबाईचे मंदिराचा आता जीर्णोद्धार केला आहे ते पाहून आपण सोमाळे तलावाकडे येतो. गडावरील त्याकाळी तहान भागवणारा आणि आजही तीच जबाबदारी समर्थपणे पार पाडणारा गडावरील हा एकमेव तलाव ! ह्याची खास आठवण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मावळ्यांनी येथील सोमेश्वर मंदिरात लक्ष लक्ष सोनचाफा अर्पण केला होता. फुलून गेलेला तलाव आजही आठवताना मन मात्र फुलून येते.
इथे कोंडाजी फर्जंदांनी युद्धात हरलेल्या शत्रूपक्षाच्या नाईक पदावरील बाबूखानची कबर आहे. इथूनच पुढे दोन समाध्या आहेत. छत्रपती शिवराय, शंभुराजे, राजाराम आणि ताराराणी पाहणारे स्वराज्यातील अतिशय महत्वाचे पद भूषवणारे, राजारामांच्या काळात हुकुमातपन्हा पद घेऊन स्वराज्य वाचवणारे रामचंद्रपंत अमात्य यांची आणि त्यांच्या पत्नीची समाधी पहावी. दोन फुले तिथे वाहावी आणि निघावे सज्जाकोठीकडे !
बाबूखानची कबर
खास दानधर्मासाठी बांधलेल्या वास्तूत बराचवेळा मराठ्यांची गुप्त खलबतं पार पडली होती, असे म्हणतात. इथून गडावर टुमदार छोटसं मंदिर पहायचे. मंदिर आजच्या काळातील आहे पण मूर्ती मात्र रामदास स्वामींनी पाठवलेला चपेटदान मारुतीची आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिर बांधले होते. काळाच्या ओघात ते नष्ट झाले पण आज हे मंदिर नव्याने बांधले आहे. फोटोत समर्थांनी पाठवलेली चपेटदान मारुतीची मूर्ती पाहू शकता.
या नंतर आपण जातो गडावरील बलाढ्य तीन वास्तू म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती ! म्हणाल तर गडावरील धान्यकोठारे, तेथील लोकांच्या म्हणण्यानुसार साडे पाच लाख पोती ओतल्यानंतर जितके धान्य आपल्याला दिसेल तितके मोठे कोठार आहे. धान्य बाहेर काढण्यासाठी दरवाजा जवळ भोक असून वरून धान्य ओतण्यासाठी छतालासुद्धा भोक आहे. हे आपण (खाली दिलेल्या फोटोंमध्ये पाहू शकता.) या विषयी एक आख्यायिका सांगण्यात येते. तेथील वास्तूचे बांधकाम सतत पडत होते, तिथे नरबळी देण्यात यावा असा तोडगा निघाला आणि भोज राजाने गडावरील गंगू तेली हिच्यासकट तिची मुलगी यमुना आणि सरस्वतीला जिवंत पुरायचे ठरले. त्यासाठी तिला विचारण्यात आले आणि तिच्या होकारानुसारच हा निर्णय घेण्यात आला पण तिच्या इच्छेनुसार या वास्तूला तिचे आणि तिच्या मुलींची नावं देण्यात आली. याच वेळेला आपल्याकडे म्हण रुजू झाली ती म्हणजे, “कहा राजा भोज, कहा गंगू तेली” तर असो ! असा आपला इतिहास आणि आपल्या आख्यायिका ! या ठिकाणीच बालेकिल्ला सुद्धा होता, असे म्हटले जाते.
या नंतर गडावरील एकांतात शेवटची घटका मोजणारी, काहीशी लांब असलेली वास्तू म्हणजे “कलावंतिणीचा महल” इथे शिवरायांच्या आधीच्या काळात कोणे एकेकाळी कलावंतीण राहत असे, इथे नाच गाण्याचा कार्यक्रम होत असतं. आज हि घुंगरांचा नाद ऐकलेली वास्तू दुर्लक्षित आहे. इथे आपल्याला पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे इथून समोर पावनगड दिसतो.
कलावंतिणीचा महाल
कलावंतिणीच्या वाड्यातून समोर दिसणारा पावनगड
ज्या तटावरून आपण पावनगड पाहतो तिथून खाली वाकून सुमारे १२०० वर्षांपूर्वीचे तटात मध्येच आडवे टाकलेले एक लाकूड आजही दिसते. खाली फोटोत तुम्ही पाहू शकता, हा फोटो वरून खाली घेतलेला आहे. जे पांढऱ्या रंगात दिसते ते लाकूड आहे. भोज राजाने लिहिलेले “समरागिणीसूत्रधार” ग्रंथात गड बांधणी विषयी बऱ्याच काही गोष्टी उलगडल्या आहेत.
आता मात्र वेळ राखून ठेवावा कारण गडावरील आपल्यासाठी अतिशय पवित्र वास्तु म्हणजे संभाजी महाराज जिथे राहिले, छत्रपतींची शेवटची भेट जिथे झाली, “छत्रपती आपल्याला सोडून गेले”, हे ज्या वास्तूने ऐकले, जिथे हंबरडा फुटला असेल, ती हि पवित्र वास्तू ! इथे मात्र उंबरठ्याला नमस्कार केल्याशिवाय खरा इतिहास वाचक नक्कीच आत पाऊल ठेवणार नाहीत. ह्या वास्तूने बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. इथे पहिल्या मजल्यावर प्रचंड शांतता असते आणि त्या शांततेत अतिशय थंड हवेची झुळूक येजा करत असते. इथे मात्र इतिहास आठवताना मन भरून येते.
तर असा हा मनातून इतिहासाचा पान्हा फोडणारा, कोल्हापुराची शान, तीन छत्रपती आणि रणरागिणी ताराराणी पाहणारा, चिवट मराठेशाहीचा हिसका सिद्धीला दाखवणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरुप विशाळगडाकडे पाठवणारा बलाढ्य, आक्रमक पन्हाळागड ! कधी कोल्हापुरात गेलात तर हा किल्ला नक्की बघा. आज पन्हाळा थंड हवेचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट आणि बऱ्याच मोठ्या लोकांचे फार्म हाऊस आज गडात आहे. कालाय तस्माय नमः !
पन्हाळगडाचे आणखी काही फोटो खास वाचकांसाठी….
१२०० वर्ष जुने असलेले गडावरील देवी अंबाबाईचे मंदिर
गंगा कोठार – आतील बाजू
दारुकोठार
सज्जाकोठी
शेवटी आपल्याला इतिहास माहित असेल तर थंड हवेच्या ठिकाणात नक्कीच ऊर्जा मिळेल कारण शिवराय म्हणजे जगातील सर्वोच्च परिमाण आहे.
लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीनुसार लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment