कर्जत - दहिवलीतील विठ्ठल मंदिर

 




आपल्या कर्जत मधील दहिवली गावातील हे मंदिर म्हणजे ह्या गावाचे लाडके दैवत आहे. आपल्या उल्हास नदीच्या काठी रम्य परिसरात जुन्या मंदिरांचा जो संकुल आहे त्या संकुलात सर्वात मोठे मंदिर म्हणून ह्या मंदिराची ख्याती आहे, हा परिसरच ऐतिहासिक आहे. ह्या मंदिरासमोर मेढींचा चिरेबंदी वाडा असून आजूबाजूला जुन्या झाडांना पार बांधलेले आहेत. विविध चित्रकार येथील परिसराचे चित्र काढण्यासाठी सतत येत असतात. ह्याच परिसरात कार्तिक वद्य एकादशी ते अमावास्येपर्यंत जत्रा भरते. फार पूर्वीच्या काळी ही जत्रा घोड्यांची विक्रीसाठी प्रसिद्ध असायची. आज मात्र तसे काही नाही. पाळणे, मिठाई आणि करमणुकीच्या साधनात ही जत्रा गर्दीने फुललेली असते. उल्हास नदीच्या काठावर असलेला हा मंदिर संकुल आणि ह्या पुरातन वास्तू पाहायला एक वेगळीच मजा आहे. बऱ्याच जुन्या चित्रपटांचे शूटिंग इथे झाले असून आजही हे ठिकाण स्फूर्तिदायक आहे. आषाढीला कित्येक गावांमधून ह्या मंदिरात विठुरायाच्या दर्शनाला पायीवाऱ्या येतात. 



विठ्ठल मंदिरात जायला दगडी चिरेबंदीचे प्रवेशद्वार असून आतमध्ये दोन मंदिरं आहेत. आतमध्ये समोरच विठुरायाच्या मंदिराचा प्रशस्त सभामंडप आहे तर उजव्या बाजूलाच टुमदार राममंदिर आहे. डाव्या बाजूला अतिशय पुरातन अशी मोठी दिपमाळ असून आजही ती तग धरून आहे. ही दिपमाळ ह्या मंदिरांचे प्राचीनत्व सिद्ध करते. संपूर्ण काळ्या बेसॉल्टमध्ये रचलेली प्रशस्त दिपमाळ अफलातून स्थापत्यशैलीचा नमुना आहे. कुठून आणला असेल हा दगड ? 

ह्या मंदिराच्या उत्तेरकडील म्हणजे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भिंतीत इस १७९२ चा देवनागरी शिलालेख आहे. त्यामध्ये ''पार्वतीबाई पिंपळवटकर, गोत्र वशिष्ठ, शके १७१४ (इस १७९२) वैशाख शुद्ध १३, मंगळवार, मुलगा भिकाजी, नातू थीसोबा, दहिवलीचे रहिवासी." असा मजकूर आहे. आज ह्या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. कधी कर्जतला फिरकलात तर नक्कीच ह्या मंदिर संकुलाला भेट द्या.


त्याचे काही निवडक फोटो खास वाचकांसाठी !



विठ्ठल मंदिरा शेजारील रामाचे मंदिर 





खास आकर्षण दगडी दीपमाळ 




No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960