एक कल्पक जगाचा विचार : स्टीव्ह जॉब्झ - प्रशांत पितालिया



पुस्तक परीक्षण

पुस्तकाचे नाव : एक कल्पक जगाचा विचार - स्टीव्ह जॉब्झ

लेखक : प्रशांत पितालिया 

प्रकाशक : रिया 

मूल्य : ₹ २५०/-



आता पर्यंतच्या आयुष्यात कार्व्हर, लिंकन, हिटलर आणि स्टीफन हॉकिंग वाचून झाले पण हा स्टीव्ह जॉब्झ मात्र हटके वाटला, मनाला भावला आणि नकळत डोळे पाणावले. सुरुवातीला ह्याला मी अबोल समजलो, पण अबोल लोकांच्या मनात जगावेगळे बोल असतात. बोलण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा कामाचा वेळ वाढवून जगभरात स्वतंत्र ओळख निर्माण करतात, त्यातील स्टीव्ह एक !

 
हे पुस्तक वेध घेतं त्याच्या जन्मापासून ते कॅन्सरशी झगडण्यापर्यंत ! त्याचे पप्पा सिरियन होते तर आई अमेरिकन ! या दोघांच्या वयाच्या २३व्या वर्षी बाळ स्टीव्ह जन्माला आला आणि लागलीच दत्तक म्हणून जॉब्झ कुटुंबाकडे सोपवला गेला. दत्तक पुत्राला पॉल जॉब्झसारखे बाबा मिळाले, हा टर्निंग पॉईंट ठरला. स्टीव्ह प्रचंड खोडकर आणि हट्टी होता पण त्याचे पप्पा त्यावर रागावले नाही, सावत्र मुलावर न रागावणं म्हणजे कमाल आहे ना !

 
स्टीव्हचा आत्मविश्वास आणि आयुष्याविषयीचे planning आपल्या मनात घर करते. हेच सूत्र आपल्या आयुष्यात कॉपी केले तरी बरेचसे प्रश्न सुटतील, हे हि नक्की ! स्टीव्ह म्हणतो, आयुष्यातील पहिले ३० वर्षात सवयी लागतात तर पुढील ३० वर्षात जडलेल्या सवयींचा परिणाम दिसतो. स्टीव्ह खास वाटतो मला ! त्याला कारण त्याचा आत्मविश्वास आणि अहंकारशून्य राहणीमान ! स्टीव्हच्या आयुष्यात तीन घटना महत्वाच्या होत्या ज्यामुळे स्टीव्हवर दुरगामी परिणाम घडले.


१) शाळेने त्याला काढून टाकणे. 
२) स्वतःचे अपत्य असलेल्या apple कंपनीने काढून टाकणे. 
३) आणि कॅन्सर


स्टीव्ह अभियंता नव्हता तर अभियंतांना आवाहन देणारा होता. प्रचंड आत्मविश्वास असलेला हा मनुष्य ७० च्या दशकात २०२० चे स्वप्न पाहत होता. त्याला कारण, त्याने मांडलेला महत्वाचा विचार ! "प्रत्येक दिवस हा शेवटचा समजून जगा." ह्या मंत्राने तो जगत होता आणि अफाट शक्तीने तो कामात गढून जात होता. रोखठोक बोलणारा स्टीव्ह निर्णयसुद्धा त्याच आवेशात घ्यायचा म्हणून त्याच्या स्टाफला तो खटकायचा. इथे दोन गोष्टी नमूद करतो, त्यातील हि एक.... २००५ ला स्टीव्ह आणि कुक जपानला जात होते तेव्हा अचानक चालता चालता मागे वळून कुकला कंपनीच्या CEO पदावर नियुक्त करत आहे, म्हणून सांगून मोकळा झाला. हा कुकला सुखद धक्का होता तर बाकीच्यांना आश्चर्याचा.... या नाराजीत कितीतरी लोकांनी apple सोडली पण स्टीव्ह डगमगला नाही आणि आपला निर्णय कसा बरोबर हे शेवटी नियतीने दाखवून दिले.


दुसरी गोष्ट तीही अशीच तडकाफडकी....
पेप्सी कंपनीचा अध्यक्ष जॉन स्कूलीला जेव्हा apple मध्ये अध्यक्षपदासाठी प्रस्ताव दिला तेव्हा स्कूली प्रस्ताव स्वीकारायचा कि नाही ? ह्या विचारात होता तसेच ह्या प्रस्तावाविषयी त्याला असुरक्षित वाटत होते. तेव्हा स्टीव्ह जे बोलला ते स्कूली आयुष्यभर विसरला नाही. तो म्हटला, "तुला आयुष्य साखरेचे पाणी विकण्यात घालवायचे आहे कि, इतरांच्या आयुष्याला बदलण्यात घालवायचं आहे, ते तू ठरवू शकतोस." खल्लास ! स्टीव्हचा स्ट्रोक त्याच्या वर्मी बसला आणि स्कूलीने स्टिव्हचे आवाहन स्वीकारले. पुढे ह्याच्यांत वाद इतके विकोपाला गेले कि, स्टीव्हला apple सोडायला लागली पण स्टीव्ह कच्चा खेळाडू नव्हता साहजिकच स्टीव्ह U turn मारून आला तोच हिमालयाएवढा आत्मविश्वास घेऊन, हो ! स्टीव्ह master होता, लढवय्या होता.


सरते शेवटी Tricks & Technique च्या दुनियेत कोणाच्याही हाताला न लागणारा हा रोखठोक स्टीव्ह कॅन्सरच्या हाताला मात्र लागला. इथे उपचार करून न घेण्याचा त्याच्या हट्टीपणा भोवला आणि प्राथमिक स्टेजला लक्षात आलेला कॅन्सर उपचाराअभावी वाढत गेला. तरी सुद्धा धीराने तोंड देणारा स्टीव्ह मनाला भावतो. स्टीव्ह पूर्णपणे शाकाहारी होता. तरुणपणी भारतात आलेला स्टीव्ह अध्यात्मिक गोष्टींत रमला. खोडकर स्टीव्ह शांत झाला, हि आहे जादू भारतमातेत ! 
स्टीव्हला धर्मात मुळीच रस नव्हता. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या कोड्यात स्टीव्ह कधी अडकला नाही पण जेव्हा स्टीव्हला कॅन्सर झाला आहे, हे कळले तेव्हा मात्र त्याने त्याचा मित्र; जो भारतात त्याला भेटला होता, त्याचे नाव लॅरी ब्रिलियंट ह्याला कॉल केला आणि आजही तू ईश्वराला मानतो का ? असे भाबडेपणाने त्याने विचारले. स्टीव्हविषयी हा प्रसंग आपल्या मनाला चटका लावतो.


हे पुस्तक एकदा वाचले कि, बरेच मार्ग नव्याने दिसतात. यश मिळविण्यासाठी आता पासून स्टीव्ह महत्वाचा ठरणार आहे, हे समजते. असो ! तर माझ्या पुस्तक कॉम्प्लेक्समध्ये लिंकनच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये ठेवणे योग्य नाही वाटणार. इथे एक राजकीय चाल खेळावी लागणार, धर्मांध औरंग्याच्या बाजूला ठेवून पाहूया कारण औरंग्या धर्मवेडा तर स्टीव्ह धर्माला फाट्यावर मारणारा ! दोघांत जुंपली तर मात्र जागा बदलावी लागेल, त्यात पण हा थेरडा औरंगजेबंच खोड्या करेल. स्टीव्ह चांगलाच आहे, तूर्तास wait & watch.........


 

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960