दिनांक ६ जून जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ ला संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी घटना घडली. शिवराय खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज झाले. ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. न भूतो न भविष्यती असा सोहळा पार पडला. मराठ्यांना राजा मिळाला. हिंदू धर्माला रक्षणकर्ता मिळाला. प्रजाहितदक्ष राजा आज छत्रपती जाहला. हि सामान्य बाब नव्हती. इस्लामी वावटळीत स्वराज्याचे कमळ उमलले होते. हि लढाई होती जीवन मरणाची ! आणि आपल्या राजाने ती जिंकली होती. देव, देश आणि धर्म सर्वच काही वाचवले होते. हा सोहळा आमच्यासाठी शक्तिदायक आहे.
आज ३४३ वर्ष लोटली तरीही आमचा राजा आम्हांला स्फूर्तिदाता ठरत आहे. शिवरायांनी रुजवलेले विचार आज आपण कितीपत पाळतोय याचे आत्मचिंतन करणे, अत्यंत महत्वाचे आहे. राज्याभिषेक हि घटना आपल्या राजाच्या कर्तृत्वाचा कळस आहे. आज त्या सोहळ्याला गटबाजीचे स्वरूप आले आहे. तिथीप्रमाणे आणि दिनांकाप्रमाणे असे वादाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रायगडावर हजारो शिवभक्त मुजरा करायला उपस्थित असतात. हि फुललेली गर्दी पाहून नक्कीच तेव्हाचा रायगड माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. महाराज नक्की तुम्ही हे पाहत असाल ना ! काय वाटत असेल तुम्हांला याचा मी वेध घेण्याचा प्रयत्न करत होतो. शांतपणे हा वेध घेताना खूप काही गोष्टी मनाला भावल्या. साहाजिकच आज तुम्हांला भेटायची इच्छा झाली आणि योगायोगाने आपली भेट झाली. खूप बोलायला मिळाले, ह्याचा आनंद वाटला. त्या वाघ दरवाज्याजवळील एकांत न विसरण्यासारखा होता. जिथे आपण चर्चा केली. भगव्या गर्दीने फुललेला रायगड, खणखणनाऱ्या त्या नंग्या तलवारी, ढोलताशांचा गजर, घोषणांचा पाऊस, धुक्याचा खेळ आणि ह्या सोहळ्यासाठी पावसाने दिलेली विश्रांती पाहून तुम्ही सुखावलेले भासले, मला आनंद वाटला.
महाराज ! आज असा होतो राज्याभिषेक तुम्ही त्यावेळी दोन केले होते आज आम्ही तीन राज्याभिषेक करतो. तिथी आणि दिनांकाचे ग्रहण आज सुटलेले नाही. एकी म्हणाल तर नक्की कशात हेच उमजत नाही. तुमच्या राज्याभिषेकाच्या वेळी जी शिस्त पाळली जात होती ती आम्ही हेन्री ऑक्झिडेनच्या डायरीत वाचली. त्यावेळी लाखभर माणसांनी फुललेला रायगड आणि त्यांची व्यवस्था खरंच, सर्वच वाखाणण्याजोगे होते. महाराज आज यामध्ये नेमकी गडबड झाली आहे. आज राज्याभिषेक झाल्यानंतर हा आपल्या राजधानीचा गड गुदमरतो. प्लास्टिक पिशव्यांमध्ये हरवून जातो. विविध संस्था आणि कित्येक लोक ते उचलून पुन्हा वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. महाराज आज गडावर आडोश्याला पण त्यापेक्षा तुमच्या रत्नशाळेजवळ काही लोक प्रातर्विधी करून जात आहेत. काय बोलणार ? आणि काय करणार ? महाराज, तुम्ही त्यावेळी केलेले पाण्याचे नियोजन आज ढिसाळ झाले आहे. अहो ! त्यावेळी गडावर पाण्याची कमतरता नव्हती आज तेच चित्र उलट झाले आहे. एकदंरीत समजत नाही आम्हांला; तुमचे अप्रतिम नियोजन समजून घेण्याची आमची इच्छाशक्तीसुद्धा नाही. अहो ! अशा गोष्टीत आम्हांला वेळ नाही. जाणता राजा म्हणून भलत्यालाच लोकं डोक्यावर घेत आहेत, खरं तर हि तुलना होऊ शकत नाही आणि त्यात तुम्हांला लावलेले विशेषण आम्ही दुसऱ्याला लावू शकत नाही कारण माझ्यासाठी तुम्ही जगातील सर्वोच्च परिमाण आहात. साहजिकच कानात गरम तेल ओतावे इतका त्रास होतो जेव्हा जेव्हा लोक हे विशेषण कोणालाही वापरतात.
महाराज, मी तर रायगडावर एकाला तुमच्या राजसदरेजवळ तंबाखू मळताना पाहिले होते, खूप वाईट वाटले पण आजच्या जमान्यात काही बोलायची सोय नाही, लगेच आईचा उद्धार हि मंडळी करते. महाराज आज नक्की राजकारण इतके फोफावले आहे कि, तुमच्या नावाचा उपयोग करून बऱ्याच ठिकाणी हि राजकीय मंडळी दिशाभूल करत आहे. महाराज काळ बदलला आहे. हे सर्व करत असताना at Raigad feeling happy लिहून check in करण्यासाठी सुळसुळाट झाला आहे. जसे काय तुम्ही FB वरून आशीर्वाद द्याल, अशा तोऱ्यात हि भक्त मंडळी वावरत आहे. आज या फुललेल्या गर्दीत शिवचरित्र वाचलेली माणसे हरवली आहेत. फार थोडी लोकं आहेत जे आज विचारांचा राज्याभिषेकासाठी गडावर येतात आणि मनापासून अभिवादन करून निमूटपणे निघून जातात. महाराज आज हरवला आहे मावळा जो जीवास जीव देत होता. आज शिवरायांचा मावळा म्हणून फेसबुकवर like मिळवण्यासाठी तुमच्या बरोबर सेल्फी मारताना दिसत आहेत. महाराज आज शक्तीप्रदर्शनासाठी ह्या सोहळ्याचा उपयोग केला जात आहे. बऱ्याच गोष्टी खुपतात पण बोलू शकत नाही. गडाच्या बाहेरील गोष्टींवर बोलायचे झाल्यास कोकणातील शेतकरी सोडला तर स्वराज्यातील बाकी शेतकरी आज संप करत आहेत. तुम्ही सैन्याला सांगितले होते कि, भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये परंतु आज देठासकट भाजी रस्त्यारस्त्यांवर फेकून प्रदर्शन केले जात आहे. हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून फोटो काढले जात आहेत. फोटोत हि मंडळी छान असे स्मितहास्य करत आहेत. हि आंदोलनाची भाषा आज माजलेल्या रस्त्यावरून प्रवास करत आहे. हि प्रवृत्ती नक्की कसली हेच समजत नाही. काही बोलणार तर तुमच्याकडे शेती आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे, म्हणजे शेतकऱ्यांवर बोलायला स्वतःची शेती पाहिजे परंतु गोहत्यावर बोलायला तुमची गाय नसली तरी चालेल. तर असा हा कठीण काळ आला आहे. अशा परिस्थितीतून आम्ही कसे बाहेर पडणार, तुम्ही धर्म वाचवला होतात, तुम्ही त्यासाठी लढला होता. “दिन-दिन” घोषणेला “हर हर महादेव” भिडला होता. आज धर्माचा अभिमान इथे फार कमी लोकांना आहे कारण धर्मावर उघडपणे बोलले तर धर्मतेढ दृष्टिकोनातून आम्हांला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. घरावर भगवा झेंडा लावला तर विशिष्ठ पक्षाचा म्हणून शिक्का मारून मोकळे होतात. अहो ! माझ्या घरी तुमचा फोटो पाहून माझा पक्ष ठरवणारे विचारजंत तर मला कितीतरी भेटतात.
महाराज, आज आपला गड अभ्यास दौऱ्यासाठी नाही तर पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. असे कितीतरी सोहळे होत राहतील त्यात तुम्हांला आम्ही एकत्रसुद्धा दिसू पण आम्ही कुठेच एकत्र नाहीत. कारण ६ जून दिनांकाप्रमाणे राज्याभिषेक म्हणून तिथीवाले येत नाहीत तर तिथीच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणून दिनांकवाले येत नाहीत. दोन्हीकडे आम्ही हजारोंच्या संख्येत असतो पण एकत्र कधीच नसतो.
असो ! महाराज कधी पासून मीच बोलतोय तर असा आहे आपला गड, सोहळा आणि आपली माणसे !
निघतो महाराज तुमची शांतता मला खूप काही सांगून गेली. तुमचा आशीर्वाद सदैव असावा कारण तुम्ही आमची स्फूर्ती आणि श्वास आहात.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment