विठ्ठल मंदिर पंचायतनाच्या प्रांगणातील व्यासपीठ....

 



दहिवलीतील विठ्ठल मंदिर आणि मंदिर पंचायतनविषयी समूहावर आपण माहिती घेतली. आत त्याच परिसरातील एक महत्वाची आणि कलाकारांच्या  जिवाभावाची वास्तू दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याचाच आढावा आपल्या ह्या प्रस्तुत लेखात घ्यायचा आहे. ती वास्तू म्हणजे ह्या पंचायतन परिसरातील व्यासपीठ होय. गावातील कलाकारांचे माहेरघर म्हणजे हे व्यासपीठ ! इथे गावातील कलाकार आपली कला सादर करत ग्रामस्थांची वाहवा मिळवत असत.

ह्या वास्तूची एक वेगळी खासियत आहे. विचारात पडलात ना, चला समजून घेऊया. 



व्यासपीठ ह्या शब्दाची फोड केली तर व्यासांचे पीठ असे होते. इतिहासाच्या भाषेत "व्यास" हे एक सुवर्णपान आहे आणि खरंच त्यांच्या नावाने असलेल्या वास्तूला कर्जतकरांनी खरा आदर दिलेला आहे तर आता ह्यात खासियत काय ? असा प्रश्न तुम्हांला पडेल तर असे आहे की, ह्या व्यासपीठावर कोणतेही राजकीय टिकाटिप्पणी होणारे कार्यक्रम आजतागायत पार पडलेले नाहीत साहजिकच ह्या व्यासपीठाचा खरा आदर आम्ही कर्जतकरांनी ठेवलेला आहे. ह्या व्यासपीठावर ज्या कलाकारांनी काम केले त्यातील बरेचसे कलाकार आता दूरदर्शन मालिकांमध्ये व चित्रपटांत काम करत असतात. मराठीतील प्रख्यात दिग्दर्शक कै. श्री. दत्ता धर्माधिकारी यांचे बंधू कै. श्री. अनंत धर्माधिकारींनी दिग्दर्शित केलेली कित्येक दर्जेदार नाटकं ह्याच व्यासपीठावर कार्तिकी उत्पत्ती एकादशीच्या जत्रेत देवदीपावलीच्या दिवशी कर्जतकरांना पहावयांस मिळाली होती. हे व्यासपीठ कै. श्री. वासुदेव अनंत मुळे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे. 



हे व्यासपीठ फक्त व्यासपीठ नसून गावातील कित्येक लोकांच्या नाळ इथे जुळलेल्या आहेत. फक्त कार्यक्रमासाठीच ह्याचा वापर होतो, असे नव्हे तर संध्याकाळी इथे गावातील कित्येक महिला व वयोवृद्ध मंडळी काही क्षण बसायला येतात. गप्पा, खलबतं आणि कितीतरी सुख दुःखाच्या चर्चा होतात. हे व्यासपीठ प्रत्येकाला सामावून घेते. सुट्टीत दुपारच्या वेळेत कित्येक मुलं क्रिकेट खेळण्यासाठी इथे जमतात तेव्हा ह्या व्यासपीठाचा स्टंप होतो. त्यात सुद्धा आनंदाने हे व्यासपीठ सामील होते.



आज ह्या परिसरातील हे व्यासपीठ पाहिले की, खरंच ह्या रंगशिलेला ह्या पंचायतनातील देवतांचा नक्कीच आशीर्वाद आहे असे वाटत राहते. 



तर असे हे ऐतिहासिक परिसरातील अवघ्या गावाला करमणूक करणाऱ्या ह्या वास्तूला विसरून कसे चालेल ? त्यासाठी आपल्या पेजमार्फत हा लेखप्रपंच ! 



आपले कर्जत ऐतिहासिक आहे फक्त ती दृष्टी हवी बस् तर !

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960