मागच्या पोस्टमध्ये आपण विठ्ठल मंदिराची माहिती घेतली. आता आजूबाजूचा परिसर पाहूया.
विठ्ठल मंदिराच्या ह्या परिसरात अगदी उल्हास नदीच्या काठापर्यंत चारपाकी कौलारू स्थापत्यशैलीत टुमदार असे "मंदिर पंचायतन" वसले आहे, उल्हास नदीच्या संपूर्ण प्रवासात तिच्या काठावरील हे एकमेव मंदिर पंचायतन आहे. अगदी भन्नाट आहे हा परिसर ! ह्याच परिसरात बांधीव व्यासपीठ आहे. समोर छोटासा बगीचा त्याच्या बाजूला बलाढ्य असा दगडी चिरेबंदीचा मेढी वाडा आहे तसेच इथे सर्व वयोवृद्ध झाडांना पार बांधले आहेत. चला तर मग मंदिर पंचायतन पाहूया.
ह्या मंदिर पंचायतनमध्ये मारुतीराया, चिंतामणेश्वर (शिवशंकर) आणि गणपती बाप्पाचे मंदिर आहे तर विठ्ठल मंदिर प्रांगणात विठुराया आणि बाजूला रामराया, लक्ष्मण व सीतामाईचे मंदिर आहे. (मागील पोस्टमधील फोटोत पाहू शकता.) असे एकूण पाच मंदिराचा हा संकुल आहे म्हणून ह्याला प्राचीन काळात “मंदिर पंचायतन” असे म्हणतात. ह्या पंचायतनमध्ये एक जुनी आणि काहीशी वार्धक्याने झुकलेली संपुर्ण दगडात रचलेली दिपमाळ आहे तसेच गणपती मंदिराच्या बाजूला प्राचीनत्व सिद्ध करणारी छोटी वास्तू आहे. जुनी लोकं मंदिर आहे म्हणतात, पण मला तर ती समाधी वाटते कारण तिच्या स्थापत्यात वृंदावन दिसते. (फोटोत पाहू शकता.) आपल्या महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी असे मंदिर पंचायतन आढळते. ह्या आमच्या पंचायतन परिसरात कार्तिक वद्य एकादशी ते अमावास्येपर्यंत मोठी जत्रा भरते. ह्याच भूमीवर सुभेदार पिंपुटकरांबरोबर उमाजी नाईकांची छोटी झटापटीची लढाई झाली होती, अशी आख्यायिका आहे. कमाल आहे ना, लढाई माणसांमध्ये दुरावा निर्माण करते तर जत्रा माणसांना एकत्र आणते आणि असे क्षण पाहणाऱ्या ह्या वास्तू आहेत आणि जागासुद्धा तीच आहे.
ह्या पंचायतनमध्ये मारुतीरायाचे छोटे मंदिर आहे जे दिसायला टुमदार आहे, ह्या बाबतीत आम्ही भाग्यवान आहोत कारण बऱ्याच गावांमध्ये चपेटदान मारुती असतो परंतु आमच्या इथे रामसेवक मारुती आहे. संजिवनी पर्वत घेऊन उड्डाण भरलेला ! "संत्राणे उड्डाण" म्हणत त्याचे दर्शन घेऊनच भक्त रामाच्या दर्शनाला जातात. त्या मंदिराच्या समोरच पिंपळ आहे तर त्याच्या बाजूला वड आहे. वटपौर्णिमेला हा वड दोऱ्यात नटलेला असतो. संपूर्ण गावातील महिला भक्तिभावाने इथे पूजा करायला येतात. ह्याच वडाच्या बाजूला एका दगडात कोरलेला पुरातन नंदी होता. जबरदस्त अशी शिल्पशैलीत नटलेला हा नंदी आज मात्र ह्या परिसरात कुठेच दिसत नाही. कित्येक पिढ्या त्याने इथं उभं राहून पाहिल्या असतील पण आज हा नक्की कुठे गेला ? कोणी नेला ? कि कोणी कोणाला दिला ? ह्याचा मला तरी काही ठावठिकाणा लागला नाही पण अगाध कलाकृतीला आजची पिढी मुकली, हे नक्की !
ह्या दोन्ही पारांच्या मधून गावाचा प्रमुख रस्ता गेलेला आहे. जणू काही आमच्या गावाचे ते जय-विजय आहेत. काय जबरदस्त इतिहास पाहिला असेल नाही, ह्या झाडांनी ! तर अशाप्रकारे आज आपण मंदिर संकुल परिसर फिरलो. मी म्हटले ना कि, आपले कर्जत ऐतिहासिक आहे फक्त ती ऐतिहासीक दृष्टी हवी बस् !
खास वाचकांसाठी फोटो....
पंचायनातील रामसेवक मारुती मंदिर
No comments:
Post a Comment