पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : भारतीय कलेचा इतिहास
लेखिका : संध्या केतकर
प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
मूल्य : ₹ २००/-
इतिहासाला बऱ्याच बाजू असतात. त्यात आपल्याकडे युद्धाची बाजू जास्त अभ्यासली जाते त्यामुळे विविध राजसत्ता नांदताना त्यांनी विकसित केलेल्या अनेक विविध कला बराच वेळा दुर्लक्षित राहतात. ह्या पुस्तकात लेखिकेने त्याच बाजूवर प्रकाश टाकलेला आहे.
सिंधू संस्कृतीपासून हे पुस्तक सुरू होते ते मध्ययुगात आणि तेही अगदी अलीकडे म्हणजे २०व्या शतकापर्यंत आपल्याला बोट धरून आणते. हे पुस्तक वाचनीय आहे कारण इतिहासाच्या ह्या बाजूमध्ये अनेक नवीन गोष्टी आपल्याला कळतात. खास करून मंदिर स्थापत्य, अहाहा ! माझ्यासाठी अगदी आवडता विषय, ह्यात झालेले बदल अभ्यासताना एका वेगळ्या दुनियेत वावरण्याचा अनुभव येतो. त्यानंतर मुघल काळात तयार झालेल्या मशिदी, पीर आणि दर्गे त्यातही बरेच बदल झाले तेही इथे अभ्यासता येतात. पळून गेलेला हुमायून जेव्हा १५ वर्षांनी परत आला तेव्हा त्याने आणलेले पर्शियन स्थपतींनी उभ्या केलेल्या वास्तूंमुळे भारतात पर्शियन कला पसरली. त्याचा पुत्र अकबर हा मात्र आत्मनिर्भर स्कीमचा पाया रचणारा ठरला कारण त्याने आपल्या प्रजेतील उत्तम कारागिरांना प्रोत्साहन दिले. (ह्यामुळे तो काय महान ठरत नाही, ह्याची नोंद घ्या.) असो !
कला टिकावी व नवनवीन गोष्टी त्यात विकसित व्हाव्यात म्हणून त्या त्या वेळी राजसत्तांनी कसा आधार दिला ? हेही त्यात मांडलेले आहे. औरंगजेबाच्या काळात ह्याच कलांना उतरती कळा लागली आणि कित्येक कलाकार देश सोडून गेले हा कलेवर झालेला आघात होता, तो न भरून येणारा होता. पुढे पुन्हा कलाविष्कार घडत गेले. ह्यातून शनिवारवाड्याच्या परिसरात सवाई माधवराव पेशव्यांनी महाराष्ट्रातील पहिले कलाविद्यालय सुरू केले होते. अशा अनेक गोष्टी आपल्या ज्ञानात भर घालतात. खंत एकच आहे ती म्हणजे ह्यात असलेले छायाचित्रांखाली माहिती नाही. सदर एक ओळ जरी तिथे टाकता आली असती तर माझ्या सारख्या वाचकांचे अनेक प्रश्न सुटले असते. बाकी म्हणाल तर हे पुस्तक वाचनीय आहे कारण सोप्या भाषेत विविध कला समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.
आज अनेक ठिकाणी फिरताना तिथल्या वास्तू साद घालत असतात, बेसिक ज्ञानामुळे शिल्पशास्त्र अथवा मूर्तिशास्त्राच्या अनेक बाजू समजतात पण ह्या पुस्तकामुळे वास्तूरचना उलगडेल हेही नक्की ! एकंदरीत कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतिहासात कलेची विशेष रुची असणाऱ्यांसाठी हे पुस्तक खूप काही देऊ शकेल.
No comments:
Post a Comment