वटपौर्णिमा सणाला दहिवलीतील विठ्ठल मंदिर पंचायतन परिसरात वडाच्या पूजनासाठी अनेक महिला येत असतात, त्या पाराविषयी माहिती आपण आधी घेतली होती. दहिवली गावाचे जय-विजय म्हणजे म्हणजे ते दोन पार ! तर वटपौर्णिमेला केंद्रस्थानी ठेवून एका नवीन ठिकाणाची माहिती घेऊया.
दहिवली गावाची दक्षिण सीमा (towards Kondivade village) जिथे संपते तिथे एक वड आहे आणि त्याची खासियत म्हणजे पुराणातील वडाच्या पूजेसाठी असलेल्या सर्व गोष्टींनी युक्त असा तो आहे. ह्याचा अर्थ हाच वड खरा पूजेचा आणि बाकी खोटे, हे असले काही मला मांडायचे नाही फक्त मला त्याची ऐतिहासिक दृष्टिकोनातून माहिती द्यायची आहे.
कौटिल्य म्हणतो त्या प्रमाणे जिथे शाल्मली असेल तिथे गावाची सीमा असावी. एखादा जुना वृक्ष पाहून तिथे अधोरेखित करावे. अगदी त्याच प्रमाणे ह्या वडाच्या थोडं पुढे काही अंतरावर शाल्मलीचा वृक्ष माळरानावर उभा आहे आणि अलीकडे असलेल्या ह्या वडाजवळ गावची वेस संपते.
मूर्तीशास्त्राच्या अभ्यासानुसार गावातील वेशीवर वडाखाली क्षेत्रपालाच्या मूर्ती असतात आणि हे क्षेत्रपाल तिथे राहून गावाचे रक्षण करतात अशी लोकभावना आहे. फोटोत दिसणारा वड नेमका आमच्या गावाच्या दक्षिण वेशीवर आहे आणि त्याच्याच खाली तांदळा स्वरूपातील क्षेत्रपाल आहेत. भन्नाट ना ! बरं मूळ मुद्द्यावर येऊया. "उत्तराध्ययत चुणी" नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे. त्यातील वड आणि वटपौर्णिमा ह्याविषयी केलेले लेखन अतिशय महत्त्वाचे आहे. त्यात असे सांगितले आहे की, वटवृक्ष हा अनेक बऱ्यावाईट देवतांचे राहण्याचे ठिकाण आहे. वटवृक्षावरील यक्ष स्त्रियांच्या चारित्र्यावर लक्ष ठेवतात आणि कधी कधी कुमारी स्त्रियांना ते भोगतात माझ्या मते, ह्या झाडाविषयी "भूत झोंबणे" हा प्रकार आमच्या गावाकडे मी बऱ्याच वेळा पाहिला आहे. बरं असो विषयांतर नको. मध्ययुगीन वटपौर्णिमा व वडाचे पूजन म्हणजे यक्षपूजा होय. स्त्रियांच्या चारित्र्यावर नजर ठेवणारा यक्ष हाच जन्मोजन्मी नवरा मिळो अशा भीतीपोटी प्रार्थना करणे म्हणजेच वटसावित्रीची पौर्णिमेची पूजा होय. असे भारतीय मूर्तिपूजेचा इतिहास ह्या ग्रंथात म्हटले आहे.
गाथा सप्तशतीमध्ये बऱ्याच गाथा वडाविषयी माहिती देतात. त्यात एक गाथा "वटयक्ष" असे संबोधन करते आणि त्यात वृक्षाखाली स्थापन केलेल्या क्षेत्रपालांच्या विषयी माहिती देते. एकंदरीत ह्या ग्रंथामुळे ह्या सणाचे प्राचीनत्व कळते.
वडाची पूजा प्राचीन आहे फक्त त्यात सत्यवान सावित्रीची कथा गुंफण्यात आली आणि समस्त सौभाग्यवतींच्या पुजाविधीतील एक अविभाज्य भाग बनली. तर असे आहे ऐतिहासिक दृष्टिकोनातून वटपौर्णिमेचे महत्त्व !
माहिती कशी वाटली हे comment section मध्ये अथवा sagarblog4@gmail.com ह्यावर मेल करून नक्की कळवा.
- सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment