विजयनगर उदयास्त - रॉबर्ट सेवेल - अनुवाद : जयंत कुलकर्णी

 



पुस्तक परीक्षण


पुस्तकाचे नाव : विजयनगर उदयास्त


लेखक : रॉबर्ट सेवेल


अनुवाद : जयंत कुलकर्णी 


प्रकाशक : कॉफीहाऊस


मूल्य : ₹ ४५०/-



मी अद्याप हंपीला गेलो नाही कारण मनी एक ध्यास बाळगला होता की, तेथील इतिहासाची इत्नभूत माहिती वाचून नोट्स काढून मगच दौरा करू त्यामुळे कित्येक वर्षे पुस्तकांच्या शोधात घालवली आणि ह्या पुस्तकाने माझी शोधमोहीम पूर्ण केली आता वेध हंपी दौऱ्याचे....


फिनो नुनिष, डोमिंगो पाईश आणि फिरस्त्या ह्यांच्या नोंदी म्हणजे ही बखर; आता हे पुस्तक ! एक भन्नाट अनुभव देऊन जाते. आता बखर म्हटली की थोडी निरसता असतेच पण ते सर्व मान्य करून वाचायला सुरुवात केली आणि साधारणतः दहाव्या प्रकरणानंतर ह्या ग्रंथाने गारूड करून टाकले. त्या काळातले इतके बारीक निरीक्षण करून हे पुस्तक लिहिले आहे की, वाचताना आपण तिथेच अगदी विजयनगरच्या दरबारात आणि त्या परिसरात फिरत असल्याचा भास होतो. बाकी कित्येक प्रवाश्यांची त्रोटक वर्णने त्यात आपल्याला आढळतात. येड्या तुघलकाने आणि क्रूरकर्मा खिलजीने केलेल्या त्या काळातील हिंदूंच्या कत्तलींचा आढावा घेत हा ग्रंथ विजयनगरच्या वेशीवर घेऊन येतो आणि मग सुरू होतो सबकुछ विजयनगर पट.... 


हिंदू राजांनी उभे केलेले हे साम्राज्य आणि त्यांचा दरारा इतका होता की, अब्दूर रझाक नामक एक पर्शियाचा राजदूत म्हणून कालिकात व विजयनगरला तैनात होता. त्यानी सुद्धा केलेली काही वर्णने ह्यात आपल्याला वाचायला मिळतात. विजयनगरची संपत्ती, वास्तुकला, उभी केलेली मंदिरं, देवांचा अंगभोग, रंगभोग आणि समृद्धीने भरभरून वाहणाऱ्या बाजारपेठा आणि व्यापार, अहाहा ह्याचे वर्णन वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. खास करून महानवमी व दसरा, दिवाळी आणि कानडी वर्षाचा पहिला दिवस हे तीन सण म्हणजे विजयनगरमधील येणाऱ्या पर्यटकांचे त्या काळातील खास आकर्षणे होती. श्रीमंतीचे प्रदर्शन इतक्या मोठ्या प्रमाणावर केले जायचे तेव्हा माझ्या मनात एक क्षण वाटून गेले की, दृष्ट नाही लागणार का ???? आणि माझी शक्यता खरी ठरली. मुसलमानी आक्रमक शाह्या एकत्र आल्या आणि विजयनगरचा अस्त झाला. तालिकोटच्या लढाईत रामराया जिवंत सापडला आणि हुसेन निजामाने त्याचा शिरच्छेद केला तेव्हा रामराया नव्वदीत होता. इथे राजकीय शिष्टाचार बासनात गुंडाळून ठेवला आणि शिरच्छेद केलेले शीर सैन्यामध्ये नाचवण्यात आले. इतके कमी की काय रामरायचे शिराचे शिल्प विजयनगरमध्ये सांडपाण्याच्या नालीला लावण्यात आले, ह्याचे वर्णन वाचताना अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. लढाईत शिरच्छेद ठीक पण पुढची कृती म्हणजे मृत्यूची घोर विटंबना होती. फिरस्त्याने ह्या घटनेविषयी अजून एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे, तो म्हणतो की, रामरायाचे खरे मस्तक दरवर्षी तेलात आणि लाल रंगात माखवून कर्नाटकातील अहमदनगरच्या पाक मुसलमानांच्या दर्शनास ठेवले जाते आणि ही प्रथा २५० वर्षे सुरू आहे, हे लिहिले आहे इस १८२९ मध्ये ! खरंच हा नीचपणा आहे मुसलमानांचा !


ह्या लढाईनंतर विजयनरची लूट झाली अगदी खणत्या लावून मुस्लिमांनी लूट केली, देवळे पाडली आणि देव फोडला होत्याचे नव्हते केले. लेखक म्हणतो की, ह्या लुटीनंतर सैन्यातील प्रत्येक मुसलमान श्रीमंत झाला कारण सुलतानाने लूट सैनिकांकडे ठेवण्याची सूट दिली होती.


ह्या पुस्तकात प्रत्येक राजांची कारकीर्द आहे त्यांनी केलेल्या राजकीय चाली आणि बांधलेली देवळे सर्वच काही आपल्याला वेड लावते. जेव्हा जेव्हा मी श्रीमद् रायगडला जातो आणि राजदरबारात मी शिवप्रभूंपुढे उभा राहतो तेव्हा मला नेहमी वाटते. समोर उदय पावलेल्या सोनसिंहाची जडणघडण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात अगदी कोवळ्या वयात जेव्हा राजे विजयनगरचे उध्वस्त सिंहासन पाहत होते तेव्हाच झाली असेल आणि मनी शिक्कामोर्तब होते की, ह्या युगपुरुषाचा खरा जन्म विजयनगरच्या त्या उध्वस्त सिंहसनावरचं पुन्हा झाला. ज्याला खरंच विजयनगर अभ्यासायचे आहे त्याने हे पुस्तक जरूर वाचावे.


सर्वच काही खास आहे पण ह्या पुस्तकाची बांधणी आणि पृष्ठ दर्जा थोडा मार खातो आहे. ह्याच्या पृष्ठाला header आणि footer नाहीत. प्रत्येक पृष्ठात भरघोस शब्द बसवल्यामुळे थोडी गिचमीड वाटते. अधेमधे व्याकरणात्मक चुका आहेत, ज्याचा त्रास मला तरी झाला पण बाकी घटना, माहिती आणि संदर्भ हे मात्र भन्नाट आहे त्यामुळे साहजिकच हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. 


No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960