संपर्क

“शिवराय” चार बलाढ्य अक्षरे किंवा एक बलाढ्य शब्द ! स्फूर्तीचा अखंड झरा आणि इतिहास वाचला तर मार्गदर्शनाचा मूळ स्रोत ! दुर्दैवाने आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या महाराष्ट्रातील तरुण पिढी style icon म्हणून पुढे आणत आहे. राजाची राजचिन्हे आज style म्हणून वापरली जात आहेत. चंद्रकोर लावून चौकात उभे राहून नाही तिथे डोळे भिरभिरत आहेत. बोटांत राजमुद्रा घालून त्याच बोटांत सिगारेट पकडली जात आहे, जगदंब जॅकेट घालून बारमध्ये बसत आहेत, हे सर्व कितीपत बरोबर आहे ? ह्याचा विचार आपणच करणे गरजेचे आहे. राजचिन्ह वापरून समाजात आचरण असे पाहिजे कि, पाहूनच शिवरायांचा जयजयकार होईल.


आज छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणताही संदर्भ न देता, काहीही खोटा इतिहास पसरवला जात आहे. यामध्ये ग्रेड नसलेल्या संघटना जरा जास्तच आघाडीवर दिसत आहेत. विशिष्ट जातीला शिव्या देऊन काहीतरी खोटा इतिहास सांगून समाजातील काही लोकांमध्ये बुद्धीभेद करून आपल्या हिंदूंमध्ये दुफळी माजवली जाग आहे. शक्य तिथे अशा लोकांपासून आपण स्वतःच लांब राहणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या राजांचा मान जर आपणच नाही ठेवला तर दुसरे कसे ठेवतील ? हा साधा विचार हि लोक जाणूनबुजून करत नाहीत.

व्याख्यानानिमित्त मी बऱ्याच ठिकाणी फिरत असताना बरेच लोक मला भेटतात आणि विचारतात कि, इतिहासात रुळून काय होणार ? त्यांना नेहमी सांगतो कि, वर्तमानात जगताना, भविष्याचा वेध घेत असताना इतिहास माहित असेल आणि त्यात छत्रपती शिवरायांचा इतिहास माहित असेल तर प्रगतीचा मार्ग सोपा होता कारण जगातील सर्वोच्च परिमाण छत्रपती शिवराय आहेत. साडे तीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या ह्या जागतिक कीर्तीच्या राजाच्या विचारांचा अभ्यास ज्यांनी केला ते आज सर्वोच्च पदावर विराजमान आहेत, हि ओळख आहे आपल्या छत्रपतींची ! पण दुर्दैवाने आपण इतिहास वाचत नाही. मला खूप लोक सांगतात कि, ते जाडजूड शिवचरित्र वाचायला घेतल्यावर आम्हांला झोप येते. कठीण आहे ना ! साडे तीनशे वर्षांपूर्वी ज्यांनी शत्रूची झोप उडवली आणि त्यांचे चरित्र वाचतांना जर झोप येत असेल तर काय म्हणणार या लोकांना ?

त्याकाळी हिंदूंना एकत्र आणणारे आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवराय जगातील पहिले राजे आहेत. धडधडीत हिंदवी स्वराज्य, भगवा झेंडा, जय भवानी, हर हर महादेवाच्या गजरात शिवरायांनी गडकिल्ले काबीज केले. हिंदू धर्म टिकवला आणि हे करत असताना त्यांनी कुठेही स्वतःचे नाव दिले नाही. येड्या मुघलांसारखे गावांना स्वतःचे नाव देण्याचे टाळलं. स्वतःच्या हौसेसाठी मोठ्ठाले राजवाडे न बांधता प्रतिकूल परिस्थिती आपला धर्म टिकवला, हि साधी बाब नव्हे आणि आज आपले लोक काय करतात तर शिवजयंतीला त्यांच्याच मिरवणुकीत दारूच्या नशेत तर्र  होऊन “जय भवानी, जय शिवाजी” बोंबलत फिरत आहेत. पालखीत असलेले शिवराय हे चित्र पाहता, कितीतरी दूर निघून गेले आहेत, हे मात्र त्यांना समजत नाही.

देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टी त्याकाळी संकटात होत्या. इस्लामी वावटळीत मंदिरे नेस्तनाबूत केली जात होती. धर्म बाटवला जात होता, स्त्रियांची अब्रु लुटली जात होती, घरातील कर्त्या पुरुषाला इराणच्या बाजारात विकले जात होते. प्रतिकार करणाऱ्याला गावाच्या वेशीवर मुंडके छाटून उलटे लटकवले जात होते. या भयानक परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी व विविध त्यांच्या सरदारांनी व मावळ्यांनी जीवाचे रान करून हे इस्लामी संकट परतावून लावले. इतके सर्व करूनही आज आपल्या समाजातील लोक औरंगजेबाची बाजू घेऊन वाद घालतात, कमाल आहे ना ! खरंच, यांचा DNA चेक करायला हवा. 

असे हे शिवराय अखंड स्फूर्तिचे स्रोत आहेत. ह्या लेखामार्फत आज पहिल्यावहिल्या ब्लॉगचा शुभारंभ करत आहे. 

जय शिवराय !

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960